नोव्हेंबरपर्यंत इतर देशांना रशियाची लस

    दिनांक :13-Aug-2020
|
-प्रारंभी  देशात लसीकरण
मॉस्को, 
पुढील नोव्हेंबर महिन्यापर्यंत रशिया जगातील अन्य देशांना आपल्या देशात उत्पादित कोरोना लस पुरवू शकेल, असा दावा रशियन प्रत्यक्ष गुंतवणूक निधीचे प्रमुख किरील दमित्रिव यांनी केला आहे. मात्र, अद्याप चाचणीचा तिसरा टप्पा बाकी असल्याने तज्ज्ञांनी ही लस सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे.
 
 
rissian Vaccine_1 &n
 
मागील मंगळवारी कोरोना विषाणूवर यशस्वी लस तयार केल्याची घोषणा रशियाकडून करण्यात आली. येत्या ऑक्टोबरमध्ये आपल्या देशात मोठ्या प्रमाणात नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात येईल. कोरोनावरील ही लस भारतासह मेक्सिको, इंडोनेशिया, सौदी अरब, ब्राझील आदी 20 देशांनी खरेदी करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. मात्र, रशियन लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जगभरातील तज्ज्ञ ही लस यशस्वी झाल्याचे मानत नाहीत. चाचणीचा निकाल लागल्यानंतरच ठोस माहिती समोर येईल, अशी विविध मते अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत.
 
 
दुसरीकडे किरील दमित्रिव यांनी स्पष्ट केले की, लस सुरक्षित असल्याचे सिद्ध करण्यासाठी आम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आकडेवारी तसेच माहिती प्रकाशित करू. रशियामधील लोकांना लस देण्याचा कार्यक्रम हळूहळू सुरू होईल. देशात तयार झालेल्या लसीवर आपला पूर्ण विश्वास असून, मी स्वतः ही लस घेतली आहे. शिवाय कुटुंबातील लोकांनाही लस देण्यात आली आहे.
 
 
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, रशियाकडून आपल्या लसीबाबत कोणतीही वैज्ञानिक आकडेवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्या देशातील लस घेतलेल्या नागरिकांकडे असेल. लशी सकारात्मक वा नकारात्मक परिणाम पाहूनच अन्य देश त्याबाबत निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत आहेत.