बंगळुरूतील हिंसाचारात एसडीपीआयचा हात

    दिनांक :13-Aug-2020
|
- संघटनेच्या चार सदस्यांना अटक
- कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची माहिती
बंगळुरू,
बंगळुरूच्या काही भागात मंगळवारी रात्रीपासून बुधवारच्या पहाटेपर्यंत सुरू असलेल्या हिंसाचारामागे सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा (एसडीपीआय) हात असल्याची माहिती आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे त्यामुळे लवकरच अधिक माहिती उघड होईल, असेही ते म्हणाले. एसडीपीआयशी संबंधित चार दंगलखोरांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
 
 
Bangalore violence_1 
 
दरम्यान, के जी हळ्ळी व डी जे हळ्ळी परिसर बुधवारपासून शांत आहे आणि कोणतीही अनुचित घटना घडली नाही, तपास प्रगतिपथावर आहे. नवनवीन माहिती पुढे येत आहे. मी तुमच्यासमोर आताच सर्व काही उघड करू शकत नाही. पण, येत्या काही दिवसात मी माध्यमांना निश्चितच संपूर्ण माहिती देईन, असेही बोम्मई म्हणाले. आतापर्यंत गोळा झालेल्या माहितीनुसार तसेच व्हिडीओ फूटेजनुसार या दंगलीत एसडीपीआयची प्रमुख भूमिका असल्याचे समोर येत आहे. आम्ही त्या संदर्भात अधिक माहिती संकलित करीत आहोत तसेच सखोल चौकशी करीत आहोत, असे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.
 
 
यापूर्वीच एसडीपीआयच्या अनेक पदाधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. एसडीपीआय जिल्हा सचिव मुजम्मिल पाशासह फिरोज, अफराज पाशा आणि शेख आदिल अशा चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या भूमिकेचा सखोल तपास केला जात आहे, असे गृहमंत्री म्हणाले.
 
 
दंगलखोरांकडून वसूल करणार नुकसानभरपाई
दरम्यान, बंगळुरूमध्ये मंगळवारी संध्याकाळपासून उसळलेला हिंसाचार पूर्वनियोजितच होता, तो घडवून आणला गेला, असे याआधीच कर्नाटकचे मंत्री सी. टी. रवी यांनी म्हटले होते. बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. उत्तरप्रदेशप्रमाणेच कर्नाटक सरकारही जातीय हिंसेदरम्यान नष्ट झालेल्या संपत्तीच्या नुकसानीची वसुली दंगलखोरांकडून करणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी नवीन नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या िंहसाचारानंतर उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने देघील अशाच पद्धतीने वसुली केली होती.
 
 
110 दंगलखोरांना अटक
दरम्यान, बंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलकेशीनगर येथे झालेल्या हिंसाचारात 50 पोलिस कर्मचार्‍यांसह अनेक जण जखमी झाले असून 110 जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणार्‍या नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तो कॉंग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा भाचा आहे.
 
 
सोशल मीडियावरील भावना भडकविणार्‍या या कथित पोस्टनंतर मंगळवारी रात्री सुरू झालेला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीचा प्रकार बुधवारी पहाटेपर्यंत सुरूच होता. काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे निवासस्थान आणि डी जे हळ्ळी पोलिस ठाणे दंगलखोरांचे लक्ष्य ठरले. मंगळवारी रात्री हिंसक जमावाने पोलिस ठाण्याला आग लावली. तेथील पोलिसांची आणि अन्य खाजगी वाहने त्यांनी पेटवून दिली.
 
 
आमदार मूर्ती आणि त्यांच्या बहिणीच्या मालकीच्या अनेक वस्तूंची जमावाने तोडफोड केली. एक एटीएमही फोडण्यात आले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले. यातील एकाची ओळख पटली असून त्याचे नाव यासिन पाशा असे आहे. त्याचे वडील अफझल यांनी मात्र आपला मुलगा निरपराध असल्याचा दावा केला आहे.
 
 
मुख्यमंत्र्यांकडून हिंसाचाराचा निषेध
दरम्यान, आमदार मूर्ती यांचे निवासस्थान आणि पोलिस ठाण्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले. तर, दंगली घडवून कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचवणार्‍यांची मुळीच गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा कर्नाटक पोलिसांनी दिला आहे. आमदार मूर्ती यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांनी मुस्लिम समुदायाला शांततेचे आवाहन केले आहे.