अ‍ॅन्टिजेन चाचणी ही अंतिम नाही

    दिनांक :13-Aug-2020
|
- आरटी-पीसीआर चाचणी विश्वसनीय
- चाचणीतील घोळाचे कारण समजून घ्या
- मनपाच्या आरोग्य अधिकार्‍याचे आवाहन
नागपूर, 
अ‍ॅन्टिजेन चाचणी ही केवळ रुग्णांवर पाळत ठेवण्याच्या उपयोगाची आहे. या चाचणीचा अहवाल अंतिम नसतो. ही चाचणी सकारात्मक आली तरी रुग्णाला कोरोना झाल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही. तसेच, टेस्ट नकारात्मक आल्यास रुग्णाला कोरोना नाही, असे गृहीत धरता येत नाही. कोरोना निदानासाठी केवळ आरटी-पीसीआर चाचणीच विश्वसनीय आहे, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी आज दिली.
 

antigen test_1   
 
पत्रपरिषदेत बोलताना डॉ. सवई म्हणाले, कोविड 19 विषाणूचा संसर्ग झाला अथवा नाही, हे तपासण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या आहेत. अ‍ॅन्टिजेन आणि आरटी पीसीआर चाचणी. सध्या कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी केली जात होती. त्याच्यामध्ये रुग्णांच्या लाळेचा नमुना घेतला जातो आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करून निदान करतात. मात्र ह्या चाचणीचा निकाल येण्यास 24 ते 28 तासांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी व्हावा याकरिता अ‍ॅन्टिजेन चाचणी वापरली जात आहे. त्याच्यामध्येही रुग्णांचा लाळेचा नमुना घेतला जातो. या नव्या टेस्ट किटमुळे अवघ्या तासाच्या आत कोरोनाचे निदान होत आहे. या चाचणीत एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास, त्या व्यक्तीची आरटी-पीसीआर टेस्ट होणार नाही. मात्र, जर या टेस्टमध्ये एखादी व्यक्ती कोरोना नकारात्मक असेल, तर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे. कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक क्रियाशील होते. या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकारकशक्ती बहाल करणार्‍या पेशी (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती बहाल करणार्‍या पेशी (अँटीबॉडीज) चाचणी सकारात्मक येते, त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
आरटी पीसीआर टेस्ट ही निदानाचे निश्चितीकरण करणारी चाचणी आहे. याला गोल्ड स्टॅण्डर्ड फ्रंटलाईन टेस्ट फॉर डायग्नोसीस ऑफ कोव्हिड 19 असेही म्हटले जाते. अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये लक्षणे असतानाही नकारात्मक आलेल्या व्यक्तीने निश्चितीकरण करण्यासाठी आरटी पीसीआर चाचणी करून घेणे आवश्यक आहे. बाधित व्यक्तीच्या शरीरात पुढील 60 दिवसांपर्यंत विषाणूंचे अस्तित्व असू शकेल व तो पुढेसुद्धा कधीही बाधित येईल. परंतु, लक्षणाच्या दोन दिवस अगोदर व लक्षणांच्या पाच दिवसानंतर असे सात दिवस व्यक्ती ही विषाणूचा संसर्ग देऊ शकते. तद्नंतर त्याला पुढील तीन दिवसांत लक्षणे नसल्यास तो विषाणूचा संसर्ग त्यांच्याकडून इतरांना होऊ शकणार नाही. त्यामुळे लक्षणे नसलेल्या बाधित व्यक्तींना दहा दिवसांनतर घरी सोडण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या काही व्यक्तींकडून सांगितले जात आहे की, अ‍ॅन्टिजेन टेस्ट एका रुग्णालयात नकारात्मक आली. दुसरीकडे केली तर ती सकारात्मक आली. त्यामागचे खरे कारण हे आहे. पहिल्यांदा जर अ‍ॅन्टिजेन टेस्ट केली तर नकारात्मक आली असेल तर दुसरी टेस्ट बाधित असेल. दुसरी टेस्ट म्हणजे आरटी पीसीआर टेस्ट केलेली असेल. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही डॉ. सवई यांनी सांगितले.