72 वर्षांनंतर सामूहिक झेंडा वंदनाची परंपरा होणार खंडित

    दिनांक :13-Aug-2020
|
नरेंद्र सुरकार
सिंदी (रे.),
देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर 15 ऑगस्ट 1948 पासून स्थानिक गांधी चौकात सुरू असलेली सामूहिक झेंडा वंदनाची परंपरा कोरोनाच्या संकटामुळे बाधित होण्याची चिन्हे आहे. यंदा शनिवारी सकाळी होणारे झेंडा वंदन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गडद झाले आहे. गांधी चौकात विद्यार्थी, शिक्षक तसेच आम नागरिक ध्वजारोहणासाठी उपस्थित राहत होते. मात्र, यावर्षी संचारबंदी लागू असल्याने शाळा बंद आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1948 रोजी प्रथम झेंडा फडकवण्याचा मान केवलचंद पडोळे यांना मिळाला होता. स्थानिक गांधी चौकात सुरू झालेली सामूहिक झेंडावंदनाची ही परंपरा कोरोनाचा संकटामुळे बाधित होण्याची चिन्हे आहेत.
 
 
flag_1  H x W:
 
मागील अनेक वर्षांपासून एक चांगली परंपरा शहरात पहावयास मिळत होती. या परंपरेला कोरोना रोगाच्या प्रादुर्भावने ही परंपरा खंडित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात 5 विद्यालये, 4 प्राथमिक शाळा व 3 कॉन्व्हेंट या सर्व शाळांचे विद्यार्थी, विविध संस्थाचे पदाधिकारी व नागरिक गांधी चौकात एकत्रीत येऊन झेंडावंदन करतात. त्यानंतरच आपापल्या शाळेतील व विविध संस्थेतील झेंडावंदन करण्याची पारंपरिक प्रथा या शहराची आहे. झेंडावंदनाकरिता नपचे पदाधिकारी सुद्धा प्रामुख्याने उपस्थित राहतात. हा झेंडावंदनाचा कार्यक्रम शहर काँग्रेस कमेटीचा वतीने आयोजित होत असला तरी कित्येक वर्षांपासून अनेक समाजसेवक व विविध पक्षाचे राजकीय नेत्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले आहे. 25 वर्षापूर्वी पोलिस प्रशासन, महसूल व कृषी विभागतील अधिकारी व कर्मचारी सुद्धा झेंडावंदनासाठी गांधी चौकात उपस्थित होत असत.
 
 
 
शहरातील गणमान्य नागरिक तथा माजी नगरसेवक अशोक पेटकर आणि विजय देवतळे यांचा जन्म स्वातंत्रदिनी 15 ऑगस्ट 1947 चा आहे. या दोघांपैकी अशोक पेटकर हयात आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे आजपर्यंत दोन्ही व्यक्तींना या सामूहिक झेंडावंदनाचा मान मिळाला नाही. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व संचारबंदी असल्याकारणाने अद्यापही शाळा सुरू झाल्या नाही. त्यामुळे यावर्षी या झेंडावंदनाचा कार्यक्रम सामाजिक दुराव्याचे पालन करत गर्दी न करता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा लागेल किंवा शासन निर्देश देतील त्याप्रमाणे झेंडावंदनचा कार्यक्रम करावा लागेल त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेली सामूहिक झेंडावंदनाची प्रथा यावर्षी खंडित होण्याची शंका वर्तवली जात आहे.
 
 
 
1948 च्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात किशनलाल पडोळे ( जाट) यांनी तिरंगा फडकावला. त्यावेळी स्वा. सै. विश्वासराव तसेच देवकाबाई देशमुख, रमेशचंद्र देवतळे, आत्माराम डेकाटे, पुणाजी काळबांडे, नानासाहेब टालाटुले, कपुरसिंग राठोड, नारायण आंजिकर, कृष्णहरी साठे, राघोबा हिंगणेकर, गोविंदराव औचट, डोमाजी कोहळे, काशीनाथ चव्हाण, आदींची उपस्थिती होती, असे वृद्ध नागरिक सांगतात. ध्वजारोहनानंतर बालकांना साखर वाटण्यात आली होती, असेही सांगण्यता आले. स्व. देशमुख दाम्पत्याचा स्वातंंत्र्यानंतरचा पहिला आंतरजातीय विवाह होता. त्यांना महात्मा गांधीजींनी प्रेरित केले होते म्हणून ते या सोहळ्याचे खास आकर्षण होते. गांधी जिल्ह्यात तो पहिला आंतरजातीय विवाह होता. देवकाबाई मागासवर्गीय समाजातील तर देशमुख कुणबी व विधुर होते, असे सांगण्यात येते.