जिल्हा रुग्णालयाची अनास्था, पोलिसाचा मृत्यू

    दिनांक :13-Aug-2020
|
- नगरसेविकाचे पती मो. अझहर यांचा आरोप
बुलडाणा,
जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नगरसेविकाचे पती मो. अझहर मो. ऐजाज यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री व संबधितांना निवेदनातून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
 
buldhana district hospita 
 
चिखली येथील राहाणारे व खामगाव पोलिस दलात कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी अब्दूल सलाम अब्दूल ईकरम हे गेल्या १५ दिवसापासून सुटीवर होते. काल रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांची प्रकृती ठिक नव्हती. श्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना चिखली येथून बुलडाणा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.परंतू डॉक्टरांनी व्हेंटीलेटर उपलब्ध करुन दिले नाही,असा आरोप मो. अझहर यांनी केला आहे. दरम्यान त्यांना रुग्णाला अकोला येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णवाहीका देण्याची मागणी केली तर रुग्णवाहीका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. ६ हजार रुपये देवून एका खाजगी रुग्णवाहीका बोलावली असता त्यामध्ये ऑक्सिजनची नळी नसल्याने रुग्णालयात नळीची मागणी केली मात्र ती सुद्धा देण्यात आली नाही. पर्यायाने खाजगी रुग्णालयातून नळी आणावी लागली. रुग्णवाहिकेतून रुग्ण घेऊन जात असतांना वरवंड गावाजवळ रुग्णाचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यानंतर परत बुलडाणा येथे मृतदेह आणण्यात आला. शवगृहात मृतदेह ठेवण्यासाठी देखील रुग्णालय प्रशासनाने सहकार्य केले नाही, असाही आरोप मो. अझहर यांनी केला आहे. दरम्यान १० ऑगस्ट रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातलगांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी मो. अझहर यांनी सदर दिरंगाई माजी आम. दिलिप कुमार सानंदा यांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी येथे भेट दिली. रुग्णालय प्रशासनाच्या या अनास्थेमूळे संबधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी मो. अझहर यांनी यावेळी केली आहे.