पाण्याच्या टाक्यांवर कलाकृतींचे कुंचले

    दिनांक :13-Aug-2020
|
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
अमृत पाणी पुरवठा योजनेंतर्गत चंद्रपूर शहरात बांधण्यात आलेल्या नवीन पाण्याच्या टाक्या आता सौंदर्याचे प्रतिक झाल्या आहेत. शहराला पाणी पुरविणार्‍या या टाक्यांना महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पारंपारिक पद्धतीने रंग न देता कल्पकतेने रंगवले. चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
brush_1  H x W:
 
चंद्रपूर महानगराची पुढील 50 वर्षांची पाणीपुरवठा मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिका प्रशासनाच्या पुढाकारातून अमृत अभियानांतर्गत स्वयंचलित पाणीपुरवठा योजना येत आहे. संपूर्ण शहरात नवीन जलवाहिनीचे जाळे उभारण्यात येत असून, विविध भागात पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. या टाक्यांना पारंपारिक पद्धतीने रंगरंगोटी न देता कल्पकतेने रंगवले.
 
 
 
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ 2021 अंतर्गत चंद्रपूर शहर महानगर पालिकेतर्फे सातत्याने काम सुरु आहे. या स्वच्छता स्पर्धेत अनेक शहरांना मागे टाकत चंद्रपूर शहराने उल्लेखनीय कामगिरी केली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराचे महत्व जपण्याच्या दृष्टीने तसेच नव्या पिढीला आपल्या शहराच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्वाची ओळख असावी, यादृष्टीने शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचे काम मनपाने हाती घेतले.
 
 
 
इमारत बांधताना चांगले साहित्य, बांधकाम, मार्गदर्शन, देखरेख मिळाल्यास उच्च प्रतीची गुणवत्ता प्राप्त होते. या गुणवत्तेबरोबर योग्य रंगाची, चित्रांची साथ मिळाल्यास ती इमारत नयनरम्य होते. हीच बाब प्रकर्षाने लक्षात घेऊन मनपातर्फे या नवीन टाक्या पारंपारिक पद्धतीने न रंगवीता ‘हटके‘ रंगविण्यात आल्या आहेत. अतिशय सुंदररित्या रंगविले जात असल्याने दूरवरूनही या टाक्या अगदी ठळक उठून दिसतात.