अतिसौम्य व लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित आता गृहविलगिकरणात

    दिनांक :13-Aug-2020
|
- डॉ. अजय डवले यांची पत्रकार परिषदेत माहिती
तभा वृत्तसेवा
वर्धा,
कोरोना बाधित रुग्णांना लक्षणानुसार आणि योग्य उपचारासाठी रुग्णालयामध्ये ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तथापि, केंद्र व राज्य शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना सकरात्मक रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार आणि घरातील योग्य सुविधेनुसार गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात आज 13 रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते.
 
 
corona_1  H x W
 
कोरोना संशयित असलेल्या रुग्णासाठीच्या योग्य व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सुचना यापूर्वी निर्गमित झाल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने सर्व संशयित व सकारात्मक रुग्णांना रुग्णालयामध्ये विलगीकरणासह योग्य व्यवथापनाव्दारे आजाराचे संक्रमण खंडित करण्याविषयी सुचित केले आहे. प्रचलित मार्गदर्शक सुचनेनुसार, रुग्णांना वैद्यकीयदृष्टया आढळून आलेल्या लक्षणानुसार लक्षणे नसलेले/सौम्य वा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकृत करण्यात येते. 7 जुलैच्या राज्य व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना सकारात्मक रुग्णांना त्यांचे घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा असल्यास त्यांचे संमतीनुसार घरी अलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल असे डॉ. डवले यांनी सांगितले. 24 तास 7 दिवस काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. त्या व्यक्तीचे वय 25 ते 50 असावे.
 
 
 
गृहविलकरणात ठेवलेल्या व्यक्तीस लक्षणे सुरू झाल्यानंतर 10 दिवसांनी आणि 3 दिवस ताप नसल्यास गृहविलगीकरणतून मुक्त करावे. त्यानंतर रुग्णाला 7 दिवस गृहविलगीकरणात राहण्याबद्दल व प्रकृतीचे स्वयंपरीक्षण करण्याबद्दल सल्ला द्यावा. गृह अलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य पथक रुग्णाच्या घरी भेट देवून, पडताळणी करुन गृहविलगीकरण संपल्याचे निर्देश देतील, असे ते म्हणाले.