चित्रपटाच्या चित्रीकरणाला सध्यातरी विलंबच!

    दिनांक :13-Aug-2020
|
- मालिकांचे चित्रीकरणही सुरुय नियमानुसार
नागपूर,
विविध चॅनल्स वरील दैनंदिन मालिका आणि चित्रपट हे सर्वच गटातील नागरिकांच्या मनोरंजनाचे साधने आहे. परंतु, यंदा कोरोनासारख्या महामारीने संपुर्ण जगात एकच धुमाकुळ घातल्यामुळे टाळेबंदीचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला. त्यामुळे सर्वांसोबत मालिकांचे व चित्रपटांचे चित्रीकरणही क्षणात थांबले. मात्र, आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. तरीही चित्रपट निर्मितीला सध्यातरी आणखी काही काळ विलंबच लागणार आहे, असे मत चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
 
filming_1  H x  
 
राज्यात काही दिवसांपुर्वी कोरोनाने एकच धुमाकुळ घातला. यामुळे बाजारपेठांसह सर्वच क्षेत्र क्षणात बंद झाली. परंतु, अधिक काळ हे क्षेत्र बंद झाल्याने अनेकांवर आर्थिक संकट कोसळली. त्यामुळे हळुहळू शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. याच पृष्ठभुमीवर निमयानुसार सर्व क्षेत्र सुरु झाली. तर प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या मालिका आणि इतर कार्यक्रम शासनाने आखून दिलेल्या नियमानुसारच सुरु झाले आहे. मात्र चित्रपटसृष्टी अजूनही बंदच आहे. यामुळे कोरोना येण्यापुर्वी ज्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबले. त्यामुळे प्रचंड नुकसान या क्षेत्राला झाले असून चित्रपट व्यावसायिकांना देखील याचा फटका निश्चितच बसला आहे. परंतु, जीवापेक्षा काहीच मोठे नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
 
हे वर्ष केवळ स्वत:ला जपण्यासाठीच
कोरोनामुळे चित्रपट सृष्टी ही देखील प्रभावित झाली आहे. परंतु, जीवापेक्षा काहीही महत्वाचे नाही. तुम्हाला कुटुंबांसोबत दोनवेळेचे जेवायला मिळत आहे, हीच तुमची मिळकत आहे. छोट्या गावातून काही तरी बनायच्या उद्देशाने युवक-युवती शहरात या क्षेत्रात येतात. परंतु, कोरोनामुळे हे सर्वच बंद झाल्याने अनेकजण निराश होतात, आणि आत्महत्यासारखे पर्याय स्वीकारतात हे अत्यंत चुकीचे आहे. जीवनात यश-अपयश येतच असते. आत्महत्या करने चुकीचे आहे. तसेच आईवडीलांनी देखील अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. आता कोरोनामुळे आता सर्व थिएटर्स जवळपास बंदच आहे. आता नियमांचे पालन करीत मालिका सुरु झाल्या आहे. परंतु, चित्रपटगृहच बंद असल्याने चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास अजूनही आणखी वेळ लागणार आहे. हे वर्ष केवळ जगण्यासाठीच आहे. आरोग्य जपणे गरजेचे असल्याचे मत चित्रपट निर्माती समृद्धी पोरे यांनी व्यक्त केले.
 
चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी थांबावेच लागणार
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सध्या मालिकेचे चित्रीकरणच सुरु आहे. माझ्याही चित्रपटाचे काम सध्या थांबले आहे. येत्या काळात चित्रपट चित्रीकरणाचे काम जरी करायचे असेल तर कोरोनाचा प्रभाव पाहता तो मुंबई बाहेरच करावे लागणार आहे. चॅनलच्या मालिका इनडोअर असल्याने त्याचे काम नियमानुसार सुरु आहे. शिवाय त्यांचे चित्रीकरणही मुंबई बाहेर सुरु आहे. चित्रपट महामंडाळाने चित्रीकरणासाठी परवानगी दिली आहे. परंतु, चित्रपटाचे शुटींग हे बाहेर करावे लागत असल्याने सर्व सेटअप लावणे अशक्य आहे. शिवाय आता थिएटरही बंद असल्याने चित्रपट क्षेत्राला अजून काही वेळ थांबावेच लागणार असल्याचे मत चित्रपट निर्माता दिनेश काळे यांनी व्यक्त केले.