स्वातंत्र्यानंतर प्रथमच विद्यार्थ्यांविना होणार ध्वजारोहण

    दिनांक :13-Aug-2020
|
रिसोड,
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन समारंभ 15 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. परंतु, शाळांमध्ये स्वातंत्र्याच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांविना ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. कोरोनाच्या पृष्ठवभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये, अशा सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना प्राप्त झाल्या आहेत.
 
indian flag_1   
 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व खाजगी व सरकारी शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण रखडले असले तरीही शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय झालेला नाही. भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन 15 ऑगस्ट 2020 रोजी साजरा केल्या जाणार आहे. परंतु, या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मात्र विद्यार्थी उपस्थित राहणार नाहीत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच विद्यार्थ्यांविना ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तशा प्रकारच्या सूचना शिक्षण विभागामार्फत शाळांना प्राप्त झाले आहेत.
 
 
ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळास्तरावर सकाळी 08:35 पूर्वी घेण्यात यावा. शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यक्ष व शाळा समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. शाळास्तरावर सदर कार्यक्रमात सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे, सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सनिटायझरसह स्वच्छतेची काळजी घ्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना प्राप्त झाले आहेत.