देगणी द्या, पण मास्क अन् सॅनिटायझरची!

    दिनांक :13-Aug-2020
|
- एका गणपती मंडळाची परिस्थितीनुरुप मागणी
भंडारा,
श्रावण आला आणि सण, उत्सवांना सुरुवात झाली. हे होत असतानाच कोरोनाची तिव्रताही वाढू लागली. पण् सण, उत्सव तर साजरे करायचे. मगं भव्य दिव्य न करता, उत्सवाचे स्वरुपही लहान झाले. आता दहा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. खर तर हा उत्सव सार्वजनिक मात्र यावेळी सार्वजनिक उत्सवालाही कोरोनाने घरगुती करुन टाकले. मगं काय, उत्सवासाठी मागीतली जाणारी देणगीही न मागण्याचा निर्णय मंडळांनी घेतला. यातच देणगी द्यायचीच असेल तर पैशाच्या स्वरुपात न देता मास्क आणि सॅनेटाझर च्या स्वरुपात द्या, असे दुरदृष्टीचे आवाहन एका मंडळाने लोकांना केले आहे. आलेले साहित्य कोरोना नियंत्रणासाठी घराघरापर्यंत पोहचविण्याचा संकल्प या मंडळाने केला आहे.
 
navbajarang_1   
 
भंडारा शहरातील कित्येक वर्षांपासून श्री गणेशाची स्थापना करणाèया बजरंग सार्वजनिक गणपती मंडळाने हा लोकहिताचा संकल्प केला आहे. मंडळाला अनेक वर्षाची परंपरा आहे, सोबतच अनेक सामाजिक कार्यात मंडळाचा सहभाग अग्रक्रमाने असतो. दरवर्षी मोठा देखावा आणि त्यातून लोकप्रबोधनाचे संदेश मंडळाकडून साकारले जातात. मात्र यावेळी देखावा नाही किंवा आलिशान शामियाना सुद्धा नाही. हनुमान मंदिरात गणेशाची स्थापना केली जाणार आहे आणि तिही अत्यंत साध्या पद्धतीने. खर तर गणपती उत्सवात देणगी मागणारे आणि देणारे बरेच असतात. अनेकांना आग्रहाने ती मागितली जाते. परंतु यावेळी कोरोनाचे सावट पहाता गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेत या मंडळांने देणगी न मागण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्यांना देणगी द्यायची असेल, अशांना निराशा येऊ नये म्हणून अनोखा संकल्प मंडळाने केला आहे. पैशाच्या स्वरुपात देणगी न देता मास्क किंवा सॅनिटायझर च्या स्वरुपात ही देणगी घेतली जाणार आहे. भक्तांनी पैसे न देता या वस्तू मंडळाकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून या वस्तू गरजूंना घरपोच देण्याचा संकल्पही मंडळाने केला आहे. परिस्थितीनुरुप घेतल्या जाणाऱ्या निर्णयांपैकी हा एक नक्कीच लोकहिताचा असाच निर्णय म्हणावा लागेल. आज सर्व जण कोरोनाच्या संकटात आहे. मास्क आणि सॅनिटायझर जिवनावश्यक वस्तू झाल्या आहेत. अनेकांजवळ त्याची खरेदी करण्यासाठीही पैसे नसतात, अशावेळी एका मंडळाकडून नागरिकांना केलेले आवाहन लोकांना संकटाच्या काळी खरा मदतीचा हात ठरणार आहे. या मंडळाचा हा आदर्श इतरांनीही घेतल्यास काही प्रमाणात का होईना, लोकांना आधार दिला जाऊ शकेल.
सार्वजनिक उपक्रमातून जनसेवेची हिच खरी वेळ
सध्या कोरोनाचे संकट गडद आहे. परंतु प्रथेप्रमाणे सण,उत्सव साजरे करण्यावाचून आपण राहू शकत नाही. सण साजरे करतानाही सामाजिक भान ठेवण्याची ही वेळ आहे. यावेळी आम्ही अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करुन देणगी देणा-यांना कोरोनाशी लढा देण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्क, सॅनिटायझर स्वरुपात देणगी देण्याचे आवाहन करीत आहोत. या वस्तू गरजूंपर्यंत पोहचविण्याचा निर्णय असून समाजातील सज्जनशक्तीने यासाठी पूढे यावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अजय ब्राम्हणकर यांनी तभाशी बोलताना सांगितले.