उत्तरप्रदेशात आता श्रीकृष्णाचीही भव्य मूर्ती

    दिनांक :13-Aug-2020
|
- सैफई गावात होत आहे उभारणी
लखनौ, 
अयोध्येत एकीकडे श्रीराममंदिराचे भूमिपूजन पार पडले असतानाच आता भगवान श्रीकृष्णाची भव्य मूर्ती उभारण्याचे कामही जोरात सुरू आहे. मुख्य म्हणजे ही मूर्ती उभारण्यास समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुढाकार घेतला आहे.
 

shrikrshna_1  H 
 
जन्माष्टमीच्या निमित्ताने अखिलेश यादव यांनी आपल्या समाजमाध्यम अकाऊंटवरून एक छायाचित्र आपल्या चाहत्यांसोबत सामायिक केले आहे. यामध्ये ते पत्नी िंडपल सोबत एका मूर्तीसमोर उभे असलेले दिसत आहेत. अखिलेश यादव यांच्या गावी म्हणजेच सैफई गावात ही मूर्ती उभारली जात आहे.
 
 
‘जय कान्हा जय कुंजबिहारी, जय नंद दुलारे जय बनवारी, श्रीकृष्ण जन्माष्टमी की सबको अनंत शुभकामनाएं’ असे अखिलेश यादव यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. जवळपास पूर्ण झालेली ही मूर्ती सुमारे 51 फूट उंच आहे. या मूर्तीचे वजन 60 टन आहे. सैफईच्या एका शाळेच्या प्रांगणात ही मूर्ती उभारण्यात आली आहे. महाभारतातील कुरुक्षेत्रात उभ्या असणार्‍या श्रीकृष्णाचे एक रूप या मूर्तिद्वारे दिसणार आहे. यामध्ये श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शन चक्रही दिसत आहे.
 
 
यदुवंशाचे मानल्या जाणार्‍या श्रीकृष्णाच्या मूर्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी अखिलेश यादव प्रयत्नरत आहेत. ‘सगळेच विष्णूचे अवतार आहेत. आम्ही प्रत्येकाची पूजा करतो’ असे त्यांनी अनेकदा जाहीरपणे म्हटले आहे.
 
 
उत्तरप्रदेशात श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पार पडला. गेल्या काही वर्षांपासून भाजपाकडून दिले जाणारे आश्वासन आता पूर्ण झाले आहे. या पृष्ठभूमीवर अखिलेश यादव यांनी हाती घेतलेल्या कृष्णमूर्ती उभारणीच्या कार्याची समाज माध्यमांमध्ये चर्चा होत आहे. याच दरम्यान बहुजन समाज पार्टीने परशुरामाची मूर्ती उभारण्याची तसेच परशुराम जयंतीला सरकारी सुटी देण्याची मागणी केली आहे.