देवदूतांचे देवाघरी जाणे दुःखदायी

    दिनांक :13-Aug-2020
|
देशात कोरोना विषाणूने उग्र रूप धारण केले आहे. दररोज 50 हजारांहून अधिक लोकांना कोरोना आपली शिकार बनवत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाखांचा वर पोहोचला आहे. कोरोनाबाधितांच्या यादीत भारत लवकरच दुसऱ्या स्थानी पोहचेल अशी शक्यता आहे. कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आपण यश मिळवले असले तरी दररोज मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. दुर्दैवाने कोरोनावर विजय मिळवण्यासाठी जे डॉक्टर जिवाचे रान करीत आहेत, ते देखील कोरोनाला बळी पडत आहेत.
  
doctors_1  H x
 
कोरोनाविरिद्धच्या लढाईत पहिल्या फळीत लढणारे व रुग्णांना पुनर्जन्म देणारे २०० हुन अधिक डॉक्टर कोरोनामुळे शहीद झाले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोनामुळे मृत्यमुखी पडलेल्या डॉक्टरांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार देशात २०० डॉक्टरांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यात मृतांपैकी १७० डॉक्टरांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक होते. मरण पावलेल्या डॉक्टरांपैकी ४० टक्के डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर्स होते. एकूणच देशाची काळजी वाढवणारी ही आकडेवारी आहे. म्हणूनच सरकारने याकडे गांभीर्याने पाहायला हवे. ज्यांना आपण देवदूत म्हणतो, त्यांचे असे देवाघरी निघून जाणे मोठे दुःखदायी आहे.
 
 
भारतातच नाही तर, जगात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाण वाढत आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूची माहिती देणारे डॉ. ली वेनलियांग यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला होता. डॉक्टरांचे असे अकाली जाणे ही धोक्याची घंटा आहे. कारण सर्वसामान्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारे डॉक्टरच मृत्यूच्या दाढेत अडकत चालले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी योध्ये बनले आहे आणि तळहातावर शीर घेऊन ते लढत असताना त्यांचा जीव धोक्यात जाणे क्लेशदायक आहे. आधीच भारतात डॉक्टरांचे प्रमाण खूप कमी आहे. दोन हजार रुग्णांमागे एक डॉक्टर अशी डॉक्टरांची संख्या आपल्याकडे आहे इतर देशांच्या मानाने ती खूप कमी आहे. जर डॉक्टरांचे असे अकाली जाणे सुरूच राहिले तर त्याचा परिणाम देशातील आरोग्य व्यवस्थेवर होऊ शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने सुरक्षितता प्रदान करणारे उपकरणे डॉक्टरांना मुबलक प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या आरोग्याची काळजी घेतली तरच रुग्णांचे आरोग्य उत्तम राहू शकते.
 
श्याम बसप्पा ठाणेदार
९९२२५४६२९५