व्होक्हार्टला महापालिकेचा दणका!

    दिनांक :13-Aug-2020
|
- कोरोना रुग्णांकडून उकळलेले 9.50 लाख केले परत
नागपूर,
राज्य शासनाने निश्चित केेलेल्या दरापेक्षा अधिकचे शुल्क घेणार्‍या शंकरनगरातील व्होक्हार्ट रुग्णालयाला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका दिला. काल रात्री या रुग्णालयाने 9.50 लाख बाधित रुग्णांना परत केले.
 
wockhardt hospital_1  
 
शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालय म्हणून व्होक्हार्ट रुग्णालयात उपचार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयाचे उपचार शुल्क राज्य शासनाने निश्चित केले आहे. या दरापेक्षा अधिक शुल्क खासगी रुग्णालयांना घेता येत नाही. मात्र, या रुग्णालयातील बाधितांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे अतिरिक्त शुल्क आकारल्याची तक‘ार केली. यानंतर आयुक्त मुंढे यांनी प्रथम संबंधित व्होक्हार्ट रुग्णालयाला नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले. मात्र, रुग्णालयाच्या स्पष्टीकरणात समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने तुकाराम मुंढे यांनी तात्काळ अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश दिले. यासाठी दोषी रुग्णालयाला दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा कडक कारवाईचा इशारा देण्यात आला.
 
 
व्होक्हार्टला पालिकेने दिलेल्या नोटीसमध्ये अनेक मुद्यांवर आक्षेप घेतले आहेत. यात पालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या दराने 80 टक्के बेड आरक्षित न ठेवणे आणि पहिल्यांदा येतील त्यांना प्रथम या नियमाप्रमाणे उपलब्ध करून न देणे असा महत्त्वाचा ठपका ठेवण्यात आला आहे. पालिकेने या नोटीसमध्ये 4 रुग्णांच्या लाखो रुपयांच्या बिलांचा उल्लेख आहे. व्होक्हार्टने नोटीस देऊनही ही रक्कम परत न केल्याचे यात नमूद करण्यात आले होते. तुकाराम मुंढेंनी अतिरिक्त शुल्क घेणार्‍या नागपुरमधील व्होक्हार्ट रुग्णालयाला 2 दिवसांमध्ये संबंधित रुग्णांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल रात्री रुग्णालयाने रुग्णांचे 9.50 लाख अतिरिक्त शुल्क परत केले.