अन् पोलिसांनी हाणून पाडला नक्षलवाद्यांचा बेत

    दिनांक :13-Aug-2020
|
- रस्त्यावर पेरून ठेवलेली विस्फोटके निरस्त
गोंदिया,
सालेकसा तालुक्यातील धनेगांव ते मुरकुटडोह दरम्यानच्या रस्त्यावर नक्षलवाद्यांनी भुसुरंगस्फोट घडवून आणण्यासाठी पेरुन ठेवलेले साहित्य निकामी करुन पोलिसांनी नक्षल्यांचा घातपाताचा बेत हाणून पाडला.
 
naxal_1  H x W: 
 
धनेगांव-मुरकुटडोह मार्गावर जीवे मारण्याच्या उद्देशाने स्फोटके पेरुन ठेवल्याची गुप्त माहिती नक्षल ऑपरेशन सेल विभागाला मिळताच पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वात ११ ऑगस्टरोजी शोध मोहिम राबविण्यात आली. सी-६० सालेकसा येथील २ कमांडो पथक, बीडीडीएस पथक, नक्षल ऑपरेशन सेल गोंदिया व पोलिस ठाणे सालेकसा येथील अधिकारी, पोलिस कर्मचारी यांनी धनेगाव ते मुरकुटडोह रस्त्यावर शोध माहिम राबविली. दरम्यान दलदलकुही स्प्रिंग पॉइंटच्या जवळ संशयास्पद वस्तू आढळून आल्याने बीडीडीएसच्या (स्फोटक निरोधक पथक) साहाय्याने पाहणी करण्यात आली. पाहणीत स्पोटक साहित्य (आईडी) पेरुन ठेवल्याचे दिसून आले. पथकाने स्पोटक निकामी करुन बाहेर काढले असता त्यामध्ये सिल्वर रंगाचा अ‍ॅल्युमिनियम बेस एक्सप्लोझिव्ह, इलेक्टिक डेटोनेटर, जर्मन डब्बा कंटेनर अंदाजे ५ ते ६ किलो, स्पिलंटर, इलेक्टिड्ढक वायर, बॅटरी असे स्फोटक साहित्य नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने पेरुन ठेवल्याचे आढळून आले. सदर साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सालेकसा पोलिस करत आहेत.
 
 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांच्या नेतृत्वात देवरी एसडीपीओ प्रशांत ढोले, सपोनि प्रमोद बघेले (नक्सल ऑपरेशन सेल), सालेकसा पोलिस स्टेशनचे सपोनि राजकुमार डुंनगे, बीडीडीएस पथकाचे सपोनि संदीप चव्हाण, सी-६० कमांडो पथक सालेकसा, बीडीडीएस पथकाचे अधिकारी, कर्मचारी यांनी केली.