चंद्रपूरच्या बहिणीची राखी पंतप्रधानांकडे रवाना

    दिनांक :13-Aug-2020
|
- आ. मुनगंटीवार यांनी बांबू कारागीरांना दिलेला शब्द पाळला
- मुनगंटीवारांच्या हस्तलिखित पत्रासह पंतप्रधानांना राखीची भेट
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
चंद्रपूरातील बांबू कारागीर मीनाक्षी मुकेश वाळके यांनी तयार केलेली बांबू शलाका राखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी 11 ऑगस्टला पाठवली आहे. या राखी सोबत आ. मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांना एक हस्तलिखित पत्र प्रेषित केल्याने या राखीच्या भेटीला भावनिक कंगोरा प्राप्त झाला आहे.
 
 
rakhipm_1  H x
 
चंद्रपूर येथे माजी अर्थ व वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र स्थापित करण्यात आले आहे. यातून हजारो कुशल बांबू कारागीर निर्माण होऊन रोजगार निर्मिती झाली. यातील एक बांबू कारागीर मीनाक्षी वाळके यांनी 10 ते 12 गरजू आदिवासी व बुरुड समाजाच्या लोकांना रोजगार देत, आपली कला सर्वदूर पोहोचविण्यात यश मिळविले. टाळेबंदीच्या काळात 10 हजार राख्या तयार करून देशभर विक्री केल्या. इतकेच नव्हे, तर मिनाक्षीने दिल्लीत 2019 ला पार पडलेल्या अमेरिकेच्या ग्लोबल इनोव्हेंटिव्ह एक्सचेंज व युनायटेड नेशन समीटच्या सौंदर्य स्पर्धेसाठी बांबू क्राउन तयार केले. जगातील हा पहिला प्रयोग होता.
 
 
आ सुधीर मुनगंटीवार यांनी मिनाक्षीचे कौतुक केले. त्यावेळी मिनाक्षीने बांबू शलाका राखी पंतप्रधान मोदींजींना पाठविण्याची इच्छा बोलून दाखवली. त्या अनुषंगाने महापौर राखी कंचर्लावार व मीनाक्षी वाळके यांचे हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना आ सुधीर मुनगंटीवार यांचे हस्तलिखित पत्र व शलाका राखी बंद लिफाफ्यात प्रधान डाकघर येथील प्रवर अधीक्षक ए. एन. सुशीर यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी ही राखी स्पीड पोस्टने 2 दिवसातच पंतप्रधानांना पोहोचती करण्याचे आश्वासन सुशीर यांनी दिला आहे.
 
 
‘भाऊ’ असावा तर असा! 
अगदी शेवटच्या दिवशी पायपीट करीत बांबू संशोधन केंद्रात जाऊन प्रवेश घेतला. भाऊंमुळे बांबू कारागीर झाली. त्यामुळे आणखी 10 गरीब महिलांना रोजगार देता आला. आ. मुनगंटीवारांच्या वाढदिवसाला मोदींजींना राखी पाठविण्याचा संकल्प सांगितला. त्यांनी तो लगेच मान्य केला आणि माझे कौशल्य अधोरेखित करणारे पत्र पंतप्रधान मोदींजींना लिहिले आणि ते रवाना झाल्याची पोस्ट पावतीसुद्धा मला मिळाली. खरंच भाऊ असावा, तर असा अशी प्रतिक्रिया मीनाक्षी वाळके यांनी याप्रसंगी नोंदविली.