अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगितीस देण्यास नकार

    दिनांक :13-Aug-2020
|
- साहिल सय्यद प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय
नागपूर,
कुख्यात गुंड साहिल सय्यदचे अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या महानगरपलिकेद्वारे सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नकार दिला.
 
nagpur high court_1  
 
मंगळवारी विभागाअंतर्गत झिंगाबाई टाकळी येथील बाबा फरीदनगर जवळील बगदादीया कॉलनी येथे साहिल सय्यदने भूखंडावर अवैधरित्या कब्जा करून बांधकाम केले आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे कारण देत मंगळवारी महानगरपालिकेने 10 ऑगस्ट रोजी साहिल सय्यदसह इतरही अतिक्रमण धारकांना चोवीस तासाच्या आत बांधकाम पाडण्यासाठी नोटीस जारी केली होती. मात्र, चोवीस तासाच्या मुदतीनंतरही बांधकाम पाडण्यात आले नसल्याने 11 ऑगस्ट रोजी महानरगपालिकेने अतिक्रमण हटाव कारवाई सुरू केली. याविरुद्ध साहिल सय्यदचे वडिल खुर्शीद अली सय्यद यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बांधकामासंदर्भात मनपाद्वारे 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात यावी तसेच बांधकाम पाडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी याचिकेद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे.
 
 
याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत मनपाद्वारे अनधिकृत बांधकाम हटविण्याची सुरू असलेली कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला.
सर्व 288 भूखंडावर कारवाई करा
सतरंजीपुरा बडी मशीद संस्थेच्या झिंगाबाई टाकळी येथील 16 एकर जागेवर टाकण्यात आलेल्या व अनधिकृत असलेल्या सर्वच 288 भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याची 8 आठवड्यात योग्य ती कारवाई करा असेही उच्च न्यायालयाने महानरपालिकेला आदेश दिले आहे.