रस्ता बांधकाम कंपनीचा 39 लाखांचा दंड कायम

    दिनांक :13-Aug-2020
|
- दारव्हा तहसीलदारांची कारवाई
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
रस्त्याच्या कामासाठी अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 39 लाखांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली होती. कंपनीने समाधानकारक खुलासा सादर न केल्याने हा दंड कायम ठेवण्यात आला. तहसीलदार संजय जाधव यांनी कारवाई केली. दारव्हा-कुपटा मार्गासाठी कुंभारकिन्ही प्रकल्प क्षेत्रातून 1 हजार ब्रास अतिरिक्त उत्खनन करून वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पंचनामा करून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आता दंड कायम करण्यात आला. ही सर्वात मोठी कारवाई असून या दणक्यामुळे कंपनीचे धाबे दणाणले आहे.
 
 
khanij_1  H x W
 
ईगल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून दारव्हा-कुपटा मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण, डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामाकरिता कंपनीने महसूल उपविभागीय अधिकार्‍यांकडून कुंभारकिन्ही प्रकल्प क्षेत्रात उत्खननाची परवानगी घेतली. परंतु परवानगीपेक्षा जास्त उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार संजय जाधव यांच्या सूचनेवरून मंडळ अधिकार आणि तलाठ्याने पंचनामा करून अहवाल सादर केला. त्यानुसार या ठिकाणाहून परवानगीपेक्षा 1 हजार ब्रास जास्त गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे उघड झाले. तहसीलदारांनी कंपनीला दंडाची नोटीस बजावली. यावर कंपनीने लेखी स्वरूपात खुलासा सादर केला. परंतु कंपनीने मांडलेली बाजू समाधानकारक नसल्याने 39 लाख रुपयांचा दंड कायम ठेवला आहे.
आता दंड वसुलीकडे नागरिकांचे लक्ष
तहसीलदारांनी अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या कंपनीला तब्बल 39 लाख रुपये दंड ठोठावला. परंतु हा दंड वसूल होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण तलाठी, मंडळ अधिकार्‍यांनी केलेला पंचनामा आणि कंपनीचा खुलासा हे दोन सबळ पुरावे महसूल विभागाकडे आहेत. त्यामुळे अपिल होईल की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.