वाघाच्या दहशतीने थांबली शेतीची कामे

    दिनांक :13-Aug-2020
|
- तोहोगाव शेतशिवारात वाघाचा वावर
- वाघाचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलन
तभा वृत्तसेवा
गोंडपिपरी,
जंगलव्याप्त तालुक्यात वन्यप्राण्यांनी गावखेड्यात शिरकाव केला आहे. दिवसाढवळ्या वाघांचे दर्शन होत असल्याने तोहोगाव परिसरातील शेतकामे थांबली आहेत. त्यामुळे डरकाळी फोडणार्‍या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी तोहोगाववासियांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात वनविकास महामंडळाच्या अधिकार्‍यांकडे निवेदन दिले आहे.
 
 
tiger_1  H x W:
 
दरम्यान, तोहोगाव परिसरातील वाघहल्ले रोखण्यासाठी मध्यंतरीच्या काळात विभागीय वनव्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय समिती गठित करण्यात आली. मात्र, ही समिती अल्पावधीतच देखावा ठरू लागली आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण, तोहोगाव परिसरातील नागरिक वाघाच्या दहशतीत सापडले आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी तोहोगाव येथील दिनकर ठेंबरे या इसमावर वाघाने हल्ला करून ठार मारले. हा वाघ तोहोगाव परिसरात ठिय्या मांडून आहे. वाघाची रात्री-बेरात्री गावाकडे आगेकुच सुरू आहे. दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
 
 
सद्या शेतीचा हंगाम सुरू आहे. रोवणीची कामे आटोपली. मात्र, निंदण, खुरपणे व अन्य शेतकामांवर शेतकर्‍यांना जावेच लागते. पण, वाघाच्या भितीने या गावातील ग्रामस्थांना शेतात जाणे बंद केले आहे. त्यामुळे ऐन हंगामात वाघाच्या भितीने शेतीची कामे खोळंबली आहेत. येत्या 15 ऑगस्टपर्यंत वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनाधिकार्‍यांना निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात माजी उपसरपंच फिरोज पठाण, रमेश मोरे, आशिष मोरे, शुभम ठेंगरे, रवींद्र गौरकार आदींचा समावेश आहे.