रानभाज्यांचा महोत्सव नेमका कुणासाठी?

    दिनांक :13-Aug-2020
|
- विभागाचे अधिकारी, कर्मचारीच ग्राहक, सामान्य जण अनभिज्ञच!
भंडारा,
करायला गेलं, तर बरचं काही आहे. नाहीतर बरचं काही असतानाही काहीच केल्या जात नाही. आता कृषी विभागाचेचं बघा ना? लोकांची ओढ ज्याकडे आहे, अशा योजना, उपक्रम येतात खरे, पण ते ज्यांच्यासाठी राबविले जायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत कधीच पोहचत नाही. आता वरिष्ठांकडून आल्याने पांढèयाचे काळे कागदं करुन सोपस्कार आटोपले जातात. परंतु खरचं, हेतू साध्य होतो का? हे कोण पहाणार? आता रानभाज्या महोत्सवाचेचं घ्या. जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महोत्सव झाला खरा पण ग्राहक कोण तर कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी! सामान्य लोकांना तर याचा मागमूसही नाही. हो, जर विभागाला केवळ कुळाचारच करायचा असेल तर सामान्यांच्या विचारांचे त्यांना काय पडले?
 
rajbhaji festival_1  
 
लोकांना काय हवं, हे हेरुन उपक्रम राबविण्याचा प्रथा सध्या आली आहे. मगं ते फॅशन मध्ये असो किंवा एखाद्या वस्तूची जाहिरात करताना असो. तसा कृषी विभाग लोकांच्या जवळचाच म्हणून ओळखला जातो. सामान्यतः ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. मात्र आता शहरातील लोकांनाही सेंद्रीय आणि अन्य गोष्टी जरा फायद्याच्या वाटू लागल्याने तेही याकडे वळले आहेत. हे लक्षात घेता, कृषी विभागानेही त्याला अनुरुप असेच उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरु केला. मगं आंबा महोत्सव असो किंवा तांदूळ महोत्सव. हे दोन्ही महोत्सव कृषी विभाग आवर्जुन दरवर्षी भरवतो. परंतु त्याचा सामान्यांपर्यंत किती फायदा पोहचतो, हे त्यांनाच माहिती.
 
 
आता लोकांचा कल रानभाज्यांकडे आहे. म्हणून की काय? वरिष्ठांचे फर्माण आले आणि कृषी विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी रानभाज्या महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला. तशी संकल्पना आणि हेतू अत्यंत स्तुत्य असाच होता. परंतु शासकीय यंत्रणेसाठी या दोन्ही गोष्टी फारशा महत्वाच्या नसतात. त्यांना पांढèयाचे काळे कागदं करुन सोपस्कार पूर्ण केल्याचे तेवढे समाधान हवे असते. रानभाज्या महोत्सवाचेही तसेच झाले. उद्घाटनाला कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी. भाज्या घेऊन आलेले निवडक असे शेतकरी आणि ग्रामीण लोक. पण खरेदी करायला कोण तर तेच अधिकारी आणि कर्मचारी! एखादा भटकलेला सामान्य माणूस जर तिथे दिसलाच तर महोत्सव सार्थकी लागला, असे म्हणता येईल. पण हे तेव्हाच होईल, जेव्हा सामान्य माणसाला याची माहिती असेल. दोन चार दिवसात जिल्हयात असे महोत्सव तालुक्याच्या ठिकाणी झाले. अधिकाèयांचे फित कापताना फोटो निघाले आणि महोत्सव झाला. सोपस्कार पार पडले आणि यंत्रणेचा कुळाचार पूर्ण झाला. परंतु साध्य न झालेल्या हेतूचे काय? ज्यांच्यासाठी हा खटाटोप केला जातो, त्यांनाच जर माहित नसेल तर होणारा खर्च कशासाठी हाही प्रश्नच पडतो?आणि शासनाचे उपक्रम केवळ औपचारीकता म्हणूनच जर उरकवायचे असतील तर ते बंद खोल्यांमध्येही भव्यदिव्य होऊ शकतात.