राष्ट्रीय ध्वज घ्या तुम्ही, आनंद मिळेल तुम्हाला

    दिनांक :13-Aug-2020
|
- विद्यार्थ्यांनी केली राष्ट्रीय ध्वजासाठी तयारी
- सकाळपासूनच निघतील, चौकाचौकात दिसतील
नागपूर,
एका हाती राष्ट्रीय ध्वज आणि दुसर्‍या हाती पिशवी. शाळेचा गणवेश घातलेला विद्यार्थी आज शहरातील चौकाचौकात दिसेल. त्याच्या नजरा ये-जा करणार्‍या प्रत्येकाकडे असतील. त्याच्या जवळील कागदी राष्ट्रध्वज घ्यावे येवढीच त्याची अपेक्षा. किंमतही फार नाही. यासाठी तो आठवड्याभर्‍यापासून तयारी करतो. असे विद्यार्थी शहरभरात मोक्याच्या ठिकाणी दिसतील. यंदा कोरोनाच्या पृष्ठभूमीवर गेल्या वर्षी सारखा उत्साह नसला तरी शालेय साहित्य आणि इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी गरीब, गरजू विद्यार्थ्यांनी तयारी मात्र, केली आहे.
  
flag_1  H x W:
 
राष्ट्रीय ध्वज आयुष्यापेक्षा अधिक प्रिय आहे, अमुचा. स्वर्गापेक्षाही अधिक प्रेम आहे, अमुचे. क्रांतीची ज्योत सतत हृदयात आहे, अमुच्या. पृथ्वीतलावर स्वर्ग कुठे असेल तर तो आहे, तिरंग्यात अमुच्या. अशा उर्जेनी ओतप्रोत असलेले विद्यार्थ्यांना लोक काय म्हणतील याची तमा नाही. आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल तर त्याची सुरुवात ही नेहमी लहान कामापासून करावी लागते. याची जाणीव असलेले विद्यार्थी ध्वज घेवून निघतात. अन्‌ आत्मविश्वास शक्तीच्या बळावर पायथ्यावरून शिखरावर पोहचा येते त्यामुळे ते प्रयत्न करणे सोडत नाही. असे म्हणतात खर्‍या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते. तो राष्ट्रीय ध्वज दिवसभर विक्री करून आयुष्यात काहीतरी नवीन शिकण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न करतो. तिरंगा असलेले असंख्य राष्ट्रीय ध्वज आणि असंख्य विद्यार्थी आपली पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेले असतील. त्यांच्या जवळून नक्कीच विकत घ्या. तुम्हाला आनंद मिळेल.
 
 
शनिवार 15 ऑगस्ट. स्वातंत्र्याचा उत्साह. राष्ट्रीय सण. या दिवशी प्रत्येक शाळेत राष्टगीतानंतर राष्ट्रीय ध्वज फडकवायला जातो. यावेळी हजारो विद्यार्थी सलामी देतात. तर दुसरीकडे गरजू आणि गरीब विद्यार्थी कागदी राष्ट्रध्वज घेवून चौकाचौकात थांबतात. लोकांची त्यांना प्रतीक्षा असते. 14 आणि 15 हे दोन दिवस त्यांच्यासाठी खुप महत्वाचे असतात. या उत्साहाचा आनंद काही विद्यार्थी शाळेत घेतात. तर यांना शहरातील रस्त्यावर भटकावे लागते. पाचवी ते दहावी पर्यंत अनेक विद्यार्थी राष्ट्रीय ध्वज तयार करण्याचे काम करतात. त्यापासून मिळालेल्या पैशावर शालेय साहित्य, गणवेश आणि इतर शालेय गरजा पूर्ण करतात. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन दिवशी हमखास असे विद्यार्थी आपल्याला ठिकठिकाणी पहायला मिळतील.
 
 
विद्यार्थ्यांना या दिवसाची प्रतीक्षा असते. संपूर्ण तयारी एक आठवड्यापासूनच करतात. फार पूर्वी बांबु खरेदी करून त्यापासून लहान लहान काड्या तोडणे. आता रेडिमेट काड्या आणि कागदी ध्वज दुकानात मिळतात. बांबुच्या काडीला कागदी तिरंगा चिटकविण्याचे काम करतात. 14 आणि 15 ऑगस्टच्या सकाळपासूनच ते घराबाहेर पडतात. कार, दुचाकी आणि पायदळ जाणार्‍यांना गळ घालतात. काही पटकन घेतात. काही पाहून न पाहल्या सारखे करतात तर काही झिटकारतात. सकाळी 6 वाजेपासून घरुन निघालेले 10 वाजेपर्यंत घरी पोहोचतात. तर काही दिवसभर रस्त्यावर असतात. राष्ट्रीय ध्वज विकून शिक्षण घेणारे आणि आज चांगल्या पदावर असलेले बरेच लोक असतील. कारण संघर्ष गरीबांनाच करावा लागतो.