‘त’वरून ताकभात; पार्थमार्गे दादांना संदेश!

    दिनांक :14-Aug-2020
|
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासूनच महाराष्ट्राचे राजकारण नको तितक्या वेळा ढवळले जात आहे. कधी भाजपा-सेनेतील आरोप-प्रत्यारोप, कधी शिवसेनेेतील लाथाळ्या, कधी वाचाळवीर संजय राऊत यांची वटवट, कधी सरकारमध्ये सहभागी झालेल्या घटक पक्षांमधील ओढाताण, कुरघोड्या, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांमधील अंतर्गत धुसफूस, यामुळे राजकीय वातावरण सारखे तापलेले असते. आता पुन्हा एकदा जाणते म्हणून ज्यांचा गवगवा केला जातो, त्या शरद पवारांनी, नातू पार्थबाबत केलेल्या टिप्पणीतून अजितदादा आणि पक्षातील विरोधकांचे कान टोचल्यामुळे राजकीय वातावरणात उष्ण झाल्याचे जाणवू लागले आहे.
 

parth pawar-sharad pawar_ 
 
शरद पवारांनी अगदी शेलक्या शब्दांत पार्थचे कान टोचल्यामुळे, पवार कुटुंबातील बेदिली नव्याने पुढे आली आहे. यापूर्वीही राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा सरकारस्थापनेवरून संदिग्धता होती, त्या वेळी शरद पवारांनी त्यांचे पुतणे अजितदादांना डावलून आपली कन्या सुप्रिया सुळे यांचे घोडे दामटत, त्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी बसवण्याची तिरसक चाल खेळली होती. यासाठी भाजपा श्रेष्ठींशीही त्यांनी संधान साधले होते. अजितदादांनी हत्तीसारखी बलदंड चाल करीत त्यांच्या तिरकस चालीतील हवा काढून टाकत त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले, ही बात अलाहिदा.
 
 
अलीकडेच अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा विसंगत मते व्यक्त केल्याने राजकारणातील विश्लेषकांचे कान टवकारले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहून पार्थ अशी भूमिका कशी घेऊ शकतो, असे प्रश्न त्यामुळे उपस्थित झाले होते. काहींनी तर पार्थची पावले भाजपाच्या दिशेने चालल्याचाही निष्कर्ष काढला होता. सुशांतिंसह राजपूत याच्या मृत्यूनंतर, या प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे करण्याची मागणी पार्थने केली होती. त्याचप्रमाणे याबाबत गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडेदेखील या मागणीचा पाठपुरावा केला होता. राममंदिराच्या समर्थनार्थ ‘जय श्रीराम’ म्हणत एक खुले पत्रही त्यांनी लिहिले होते. पार्थ यांच्या याच भूमिकांमुळे शरद पवार अस्वस्थ झाले आणि त्यांनी त्याची जाहीरपणे निर्भर्त्सना केली. एकवेळ राममंदिराबाबतची भूमिका खपवून घेतली जाऊ शकते, पण सुशांतिंसह प्रकरणात थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचे नाव घेतले जाऊ लागल्यामुळे तर पवार अस्वस्थ नाहीत ना? ज्या पक्षासोबत सत्तेची खुर्ची उपभोगतोय्‌, त्या पक्षाच्या एका मंत्र्याविरुद्ध संशयाचा धुराळा नको म्हणून तर पवारांनी पार्थची कानउघाडणी केली नसावी? की तिसर्‍याच कुठल्या कारणासाठी पवारांनी पार्थला शेलक्या शब्दांत झटका दिला?
 
 
पवार कुटुंबात शरदरावांना मोठा मान आहे. युवावस्थेपासून राजकारणाच्या गल्लीबोळात वावरलेल्या शरद पवारांनी अनेक टक्के-टोणपे खाल्ल्यामुळे, कुटुंबात आणि पक्षातही त्यांच्या शब्दाला मोठा मान आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर ते पावसात भिजल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला पन्नाशी गाठता आली आणि त्यातच त्यांचे मोठेपण बघितले गेले. दुसरीकडे, भाजपाने युवा नेत्याच्या नेतृत्वात 105 जागा एकहाती िंजकल्या, त्याबाबत कुणी बोलायलाही तयार नाहीत.
 
 
एकीकडे शरदराव वडीलधार्‍याची भूमिका बजावताना ‘आपला तो बाळ्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट’ या रूपड्यातही वावरताना राज्यातील जनतेने बघितले आहे. अजित पवारांना डावलून सुप्रियाला संधी देण्यासाठी त्यांनी खेळलेल्या चाली, या राज्यातील जनतेला चांगल्याच माहिती आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी समारोहात सुप्रिया सुळे तिन्ही पक्षांच्या आमदारांची सरबराई करताना दिसल्या. उपमुख्यमंत्री असताना अजितदादांचे अस्तित्व न जाणवण्याइतकी परिस्थिती त्या वेळी होती. आपल्याला डावलले जात असल्याचे ध्यानात आल्यानंतरच दादांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या बैठकीतून बाहेर पडून देवेंद्र फडणवीसांशी संधान साधले होते. हा सारा खेळ शरदरावांनी सुप्रियाच्या, पक्षातील ‘सुप्रीमसी’साठीच खेळला होता. आताही ‘लेकी बोले सुने लागे’ या न्यायाने शरद पवारांनी पार्थच्या नावे दादांचेच कान टोचण्याचे काम केले आहे. त्यांची ही चाल दादा कशी आणि कुठे रोखतात, यावरून पवार कुटुंबातील संघर्षाची दिशा ठरणार आहे.
 
 
पार्थने सुशांतिंसहच्या मृत्यूच्या चौकशीबद्दल केलेले वक्तव्य आणि राममंदिराबाबत दिलेली प्रतिक्रिया इतकी गांभीर्याने घेण्याचे कारण म्हणजे, सत्ताधारी पक्षात सारेकाही व्यवस्थित नाही, हेच दाखविणारे आहे. आमचे सरकार पाच वर्षे टिकेल, असे छातीठोकपणे सांगणारे शरद पवार, तीन पायांच्या या सरकारच्या स्थैर्याबाबत आश्वस्त नाहीत, हेच यातून दिसून येते. मुंबई पोलिसांच्या बदल्या, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या, अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनासंबंधीची शिवसेनेची भूमिका, पालघरमध्ये दोन साधूंच्या झालेल्या हत्येच्या चौकशीवरून सरकारमधील बेवनाव दिसून आला. तिन्ही पक्षांत एकवाक्यता असल्याचे सांगायचे आणि छोट्या मोठ्या कुरबुरी सुरूच ठेवायच्या. दस्तुरखुद्द कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, सरकारमध्ये आमच्या विचारांना काही िंकमत नसल्याचे सांगत असतील, तर मग राज्यातील जनतेने बघायचे तरी कुणाकडे?
 
 
एकीकडे आमच्या कुटुंबात सारेकाही व्यवस्थित आहे, असे म्हणणारे शरद पवार पार्थविरुद्ध ‘‘तो परिपक्व नाही, त्याच्या बोलण्याला कवडीची िंकमत नाही,’’ असे वक्तव्य करून, त्याचा पाणउतारा कसे करू शकतात? पार्थ काही दूधपिता बच्चा नाही. लोकसभेत ज्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्याच्या गळ्यात मावळच्या उमेदवारीची माळा घातली, त्या वेळी तो अतिशय परिपक्व आणि लोकभावना ओळखणारा होता आणि आता एकाएकी तो अपरिपक्व कसा झाला, हे न समजण्याइतकी जनता आंधळी नाही, हे शरद आजोबांनी ध्यानात घ्यायला हवे. आता पुतण्याच्या मदतीला त्याचा मुलगाही आला आहे. त्यामुळे आजवर चाललेली ‘आजोबा’गिरी नातूही खपवून घेईल, असे गृहीत धरल्यास स्वप्नभंगाशिवाय हाती काहीही यायचे नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्थच्या सभांमध्ये आजोबांनी लावलेली उपस्थिती अनिच्छेतूनच होती, याचेही पुरावे आता मिळू लागले आहेत. पार्थ निवडून आल्यास नवीन सत्ताकेंद्र निर्माण होण्याची भीती त्यांना वाटत होती. म्हणूनच त्याने लोकसभा लढू नये, अशी आजोबांची भूमिका होती. पण, अजित पवारांनी पार्थच्या उमेदवारीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्याने त्यांचा नाईलाज झाला. त्या वेळीच पवार कुटुंबातील धुसफूस प्रकर्षाने पुढे आली होती. शरद पवारांना अंमलबजावणी संचालनालयाची नोटीस आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्याविरोधात वातावरण तापविण्यास सुरुवात केली होती. पण, त्या आंदोलनातील हवा काढून अजित पवारांनी, आम्हीही कच्च्या गुरूचे चेले नाही, हे दाखवून दिले. अजितदादांनी त्याच दिवशी राजीनामा देणे, देवेंद्र फडणवीसांसोबत हातमिळवणी करणे आणि अजितदादांचे बंड मोडून काढण्यात शरद पवारांनी घेतलेला पुढाकार, यातूनही घराण्यातील सत्तासंघर्ष किती टोकाला गेला, हे राज्यातील जनतेने अनुभवले.
 
 
पार्थबाबत एवढी कडवट भाषा वापरणारे आजोबा, दुसरा नातू रोहित याच्याबाबत मात्र अतिशय सावध विधाने करतात. त्यांना तो याच्यापेक्षा परिपक्व वाटतो. आपले ऐकले जाते म्हणून दादांच्या मुलाला काहीही बोलायचे, त्याचा अपमान करायचा, ही बाब त्यांना खरेतर शोभत नाही. पार्थदेखील आता लहान राहिलेला नाही. उद्या तोदेखील ‘अरे ला कारे’ म्हणून प्रत्युत्तर देऊ शकतो. आपल्या स्वतंत्र कार्यपद्धतीची चुणूक पार्थने दाखवून दिलेली आहे. पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यात त्याने घेतलेला पुढाकार लपून राहिलेला नाही. पक्षाची नाचक्की नको म्हणून पुढे त्याने माघार घेतली. पार्थबाबतच्या विधानानंतर पवार कुटुंबाच्या झालेल्या बैठकीत उपरोल्लेखित मुद्दे चर्चिले गेले असले, तरी त्याबाबत कुणीही दुजोरा देणार नाही. पण, राजकारणात ‘त’वरून ताकभात ओळखणार्‍यांनी पार्थमार्गे दादांना दिलेला संदेश सहज वाचला आहे!