पोलिस दलातील बदल्यांचा मुहूर्त लांबणार

    दिनांक :14-Aug-2020
|
- मंत्रालायातील सुत्रांची माहिती
- बदल्यांबाबत पोलिस महासंचालक कठोर भूमिकेत
- राज्य सरकारची चिंता वाढली

तभा वृत्तसेवा
प्रविण राऊत
मुंबई,
राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांचा बार फुटल्यानंतर आता पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यात इच्छुक असलेल्या सर्व स्तरातील महत्वाकांक्षी मध्यस्तींचा आणि इच्छुक उमेदवारांचा थोडा हिरमोड होणार आहे. पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकनार असून गणपती उत्सवापर्यंत किंवा त्या नंतरच या बदल्यांचा मुहूर्त काढला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील गृहविभागाच्या सूत्रांनी दिली. राजकीय शिफारशीनुसार होणाऱ्या बदल्यांबाबत पोलिस महासंचालक यांनी कठोर भूमिका घेण्याचे ठरविले असून नियमबाह्य बदल्या करणार नसल्याचे सरकारला कळवले असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी राजकीय नेतेही जिद्दीला पेटल्याने अखरे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे.
 
mh police_1  H  
 
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्व सामान्य नागरिकांपासून तर मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजपर्यंत सर्वत्र अस्तव्यस्त झाले आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय काढून नियमित बदल्यांसाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे अनेक मंत्र्यांपासून तर प्रशासनातील इच्छुक अधिकारी आणि मध्यस्ती करणारे महाभाग यांच्या आशा पल्लवीत झाल्या. प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी असलेले मनासे नियम लागु आहे. तर पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे नियम वेगळे असल्याने या विभागातील अधिकाऱ्यांचा बदल्यांसाठी मुदत वाढ घेण्याबाबत वित्त विभागाचीही परवानगी घेण्यात येणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्टचा असलेला मुहूर्त पुढे ढकलण्यात येणार असून गणपती उत्सवानंतर मुहूर्त काढला जाणार असल्याची माहिती आहे.
 
 
स्थानिक राजकीय परिस्थिती आणि राजकीय वाद यासाठी राजकीय नेत्यांनी आपल्याला सोईस्कर अशा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अन्य नेत्यांकडून लॉबिंग केले आहे. त्यामुळे राज्य सरकार राजकीय शिफारशीनुसार बदल्यांची यादी तयार करत आहे. परंतु, पोलिस महासंचालक हे नियमबाह्य बदल्यांवर सही करण्यास इच्छुक नसल्याने राज्य सरकार अडचणीत आले आहे. म्हणून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कालावधी वाढवला जाणार आहे. त्यामुळे बदल्यांसाठी मध्यस्ती आणि इच्छुक उमेदवार यांच्यात नैराश्य येणार असून त्यांच्या इच्छेनुसार बदली होण्यासाठी त्यांना गणपती उत्सवापर्यंत वाट पहावी लागणार आहे.