मुंबईचे वार्तापत्र

    दिनांक :22-Aug-2020
|
कवडीमोल!
 
नागेश दाचेवार
 
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतिंसह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला आणि लगेच पार्थ पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया- ‘सत्यमेव जयते’ या आपल्या तोकड्या, अपरिपक्व ज्ञानातून दिली. आता पार्थ यांच्या प्रतिक्रियेला कवडीची िंकमत नाही, असे आजोबांनी आधीच जाहीर करून टाकले म्हटल्यावर, त्यांची ती प्रतिक्रिया कवडीमोलच नाही का? पण तसे झाले नाही. आजोबांनी आजवर केलेल्या कुरघोडींच्या राजकारणाला आता घरातूनच आव्हान दिले जात आहे. पहिले नातवाच्या वक्तव्याला आजोबांनी कवडीमोल ठरविले; तर काहीच दिवसांत नातवाने आजोबांच्या वक्तव्याला कवडीची किंमत न देता, पलटवार करून पुन्हा एकदा आव्हान दिले. आता अपरिपक्व नातवाच्या या आव्हानाला आजोबा आपले परिपक्वतेचे काही बाळकडू पाजतात की, अपरिपक्व नातूच कडूबोल ऐकवून आजोबाला खिजवतो, याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
 

shushant shinh rajpoot_1& 
 
बॉलिवूड अभिनेता सुशांतिंसह राजपूत आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षांसोबतच सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आजोबा यांनी जाहीरपणे आपल्या नातवाला फटकारत, त्यांच्या म्हणण्याला कवडीची किंमत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. दरम्यान, सुप्रियाताईंच्या यशस्वी शिष्टाईमुळे नाराजीनाट्याचा शेवट झाला असून, सर्व सुरळीत असल्याच्या बातम्या पक्षाचे नेते पसरवत असताना, पुन्हा एकदा आता सर्वोच्च न्यायालयाने सुशांतिंसह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर, पार्थ पवार यांनी टि्‌वटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करून, आजोबाला धक्का दिला आहे. अन्य काही राजकीय खुबीसह कधीही संयमाने वागणे आणि आपला संयम ढासळू न देणे, अशा वैशिष्ट्य आणि कौशल्याचे धनी असलेल्या आजोबांचे मन विचलित करण्यात अपरिपक्व नातवाला मात्र यावेळी यश मिळाले आहे. गेली कित्येक दशके राजकारणातील विविध परिवार आणि पक्षांना लीलया नाचविणार्‍या आजोबाने भलेही नातवाला अपरिपक्व म्हटले; मात्र सुशांतिंसह राजपूत याविषयी आजोबापेक्षा नातवाचे भाकीत आणि मागणी योग्य असल्याची मोहर देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेने लावली आहे. अशी चर्चा आहे की, नातवाच्या निमित्ताने आजोबांनी नातवाच्या वडिलांना लक्ष्य केले होते. काय खरं आणि खोटं, हे स्वतः आजोबाच जाणे. मात्र, इथे वडीलसुद्धा आजोबांच्या शब्दाच्या बाहेर नसताना, त्याच पित्याचा पुत्र आजोबाला केवळ टिवटिव करून चांगलाच नाचवताना दिसत आहे. आता आजोबाचा हा नातू अपरिपक्व असल्याचा गैरसमज दूर झाला असावा... कारण, आजोबांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवाय, आजोबांनी कान टोचले वगैरे जाहीर रीत्या सांगणार्‍या आजोबांच्या पाळीवांकडूनदेखील काही प्रतिक्रिया आल्याचे ऐकीवात नाही.
 
 
आजोबांच्या एकूणच कलागुणांवर नजर फिरविली, तर त्यांनाही सलमान खानचा- ‘मै दिल में आता हू, समज में नहीं!’ हा डायलॉग तंतोतंत लागू होतो. त्यामुळेच की काय, सार्‍या परिवाराने समजावूनदेखील नातवाने आजोबाला पुन्हा एकदा ‘सत्यमेव जयते’ म्हणून ‘शॉर्ट बट स्वीट’ असा इशारा दिला आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे आपली मागणी योग्यच असल्याचे सुचक असे विधान केले आहे. त्यामुळे आजोबांनी फटकारल्यानंतरही नातू मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात नातवाने केलेली मागणी आजोबाला अयोग्य वाटत असली, तरी ती मागणी योग्य होती, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
 
 
गोष्ट नातवाच्या परिपक्वतेपर्यंत एकदाची ठीक होती. मात्र, आता तर देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयावरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापर्यंत यांची िंहमत गेली आहे. यांच्यादृष्टीने सर्वोच्च न्यायव्यवस्थेलाही कवडीची िंकमत नाही. यांना विसर पडला आहे की काय? याच न्यायव्यवस्थेच्या निर्णयामुळे हे लोक इथे महाराष्ट्रात सत्तेच्या सिंहासनावर बसलेले आहेत. अन्यथा, रस्त्यावर भटकणार्‍या याचकापेक्षाही भयंकर अवस्था असती यांची. नुकतेच सहा-आठ महिन्यांपूर्वी, प्रोटेम स्पीकरला अधिकार नसताना याच सर्वोच्च न्यायालयानेच फ्लोअर टेस्ट घ्यावी आणि नंतर अध्यक्षांची निवडणूक घ्यावी, असा आदेश दिला होता. त्या वेळीदेखील हीच न्यायव्यवस्था होती. प्रत्यक्षात प्रोटेम स्पीकर हे सभागृहाच्या सभासदांना केवळ शपथ देतात. फ्लोअर टेस्ट घेण्याचे अधिकार हे स्थायी अध्यक्षांना असतात. असेच विधिमंडळाच्या कायद्यात असून, परंपरेनुसार वर्षानुवर्षे चालले आहे. मात्र, केवळ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे यावेळी या नियमाला बगल देत या तिघाडी-बिघाडीचे सरकार प्रोटेम स्पीकरने स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले होते- दूरदर्शनच्या माध्यमातून थेट प्रसारण करून पहिले फ्लोअर टेस्ट घ्या... हा आदेश कोणाला होता? तर, त्या वेळी अस्तित्वात असलेल्या सरकारला अर्थात फडणवीस आणि पवार सरकारला... त्यांनी राजीनामा दिला. मग त्या आदेशाची फोड करून आपल्या सोयीने अर्थ लावून आपला उल्लू सरळ करण्याचे काम आपण जेव्हा केले त्या वेळी बरा वाटला याच न्यायव्यवस्थेचा निर्णय. आज विरोधात गेला तर तो अन्याय ठरला... कायदा, घटना व संसदीय लोकशाहीच्या प्रथा-परंपरा आम्हाला माहीत आहेत. कायदा व घटना कुणाचे गुलाम नाहीत, असे बौद्धिक अलीकडेच सरकार स्थापन करते वेळी देणारेच आता मात्र आपल्या सोयीनुसार मानापमान आणि देशातील राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालयासारख्या सर्वोच्च संस्थांच्या बाबतीत असा तर्क लावणे म्हणजे एकप्रकारे अवमानच म्हणावा लागेल. तुम्हाला जर या व्यवस्थेवर विश्वासच नसेल, तर मग कशाला त्यांच्या दारी जाता? परीक्षेचा विषय घेऊन तिथेच गेला आहात ना... केंद्राच्या दावणीला बांधलेल्या संस्थेकडे का गेलात?
काहीही असेल, मात्र आजोबाचा नातू पार्थ... श्रीकृष्ण नेहमी अर्जुनाला पार्थ म्हणायचे... तोच अर्जुन ज्याचा वेध नेहमी अचूक असायचा. त्यालाही बर्‍याच गोष्टींची माहिती किंवा ज्ञान नव्हते. ऐन युद्धाच्या तोंडावर काही आत्मसात केले. ज्ञान असो किंवा नसो त्याचा वेध मात्र अचूक होता. आपले लक्ष्य काय, वेध कुठे आणि कधी साधायचा, याचे कसब पार्थ या नातवाने आत्मसात केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होते. कारण नातवाने जेव्हा जेव्हा नेम साधला तेव्हा तेव्हा तो अचूकच लागला... आताही या पार्थचा नेम अचूकच आहे आणि त्यामुळे आजोबा चांगलेच घायाळ झाले आहेत... 
9270333886