नसे त्रिभुवनामधे तुजविणे आम्हा आसरा...

    दिनांक :23-Aug-2020
|
-• प्रकाश एदलाबादकर 
संतप्रवर श्रीगजानन महाराज म्हणजे, या विदर्भाच्या काळ्याकरन्द भूमीत उगवलेले भक्तीचे ब्रह्मकमळ! श्रीक्षेत्र शेगाव म्हणजे विदर्भभूमीचे तुळशीवृन्दावन. या मातीच्या कणाकणात भक्तीचा सुगंध दरवळतो आहे, कारण श्रीमहाराजांनी याच मातीत आपला देह ठेवला. आज भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच ऋषिपंचमी. श्रीमहाराजांचा समाधिदिन! निरंजन, निरामय आणि निर्विकल्प महाराजांचा आज समाधिदिन!! प्रत्यक्ष त्या दिवशी सारे शेगाव आणि पंचक्रोशी दुःखात बुडालेली. अवघे भक्तगण कासावीस झालेले होते. महाराजांची ही मूर्ती यापुढे दिसणार नाही म्हणून प्रत्येक जण ती मूर्ती डोळ्यांत साठवून घेत होता. प्रा. श्री. म. माटे एका ठिकाणी लिहितात, निरांजनावर कधी फुंकर घालून ते विझवायचे नसते.
 
 
 
gajanand maharaj_1 &
 
त्याच्या ज्योतीवर हलकेच एक फूल ठेवून ते मालवायचे असते. संतपुरुष जेव्हा, आपले जीवितकार्य संपले आहे, आता वृथा देह शिणविण्यात अर्थ नाही, या भावनेने आपल्या कृतार्थ जीवनाला शांतपणे आणि आनंदाने पूर्णविराम देतात, तेव्हा ते आपली प्राणज्योत हळुवारपणे मिटवितात. श्रीगजानन महाराजांनाही याची जाणीव झाली होती. आपले अवतारकार्य संपले हे जाणवून श्रीमहाराजांनी, समाधी घेण्यापूर्वी पंढरीच्या विठोबाचे दर्शन घेतले होते आणि त्याला विनवणी केली होती, असे वर्णन श्रीगजाननविजय ग्रंथात येते. श्रीमहाराज
विठूमाउलीला म्हणतात-
 
तुझ्या आज्ञेने आजवर।
भ्रमण केले भूमीवर।
जे जे भाविक होते नर।
त्यांचे मनोरथ पूर्ण केले।।
आता अवतारकार्य संपले।
हे तू जाणसी वहिले।
पुंडलिक वरदा विठ्ठले।
जाया आज्ञा असावी।।
देवा मी भाद्रपदमासी।
जावया इच्छितो वैकुंठासी।
अक्षईचे रहावयासी।
तुझ्या चरणासन्निध।।
 
आपले ईश्वरदत्त कार्य संपले आहे, ही जाणीव त्यांना झाली. आपल्या सर्व भक्तवर्ग आणि शिष्यवर्गाला महाराजांनी याची कल्पना दिली. त्या मंडळींना अर्थातच अपार दुःख झाले. परंतु, श्रीमहाराजांनी त्यांची समजूत घातली.
 
दुःख न करावे यत्किंचित। आम्ही आहो येथे स्थित।
तुम्हा संभाळण्याप्रती सत्य। तुमचा विसर पडणे नसे।।
मी गेलो ऐसे मानू नका। भक्तीत अंतर करू नका।
कदा मजलागी विसरू नका। मी आहे येथेच।।
 
श्रीसंत गजाननमहाराज यांच्या चरित्राचे, पोथीचे अनेकदा वाचन केले. त्याने फलप्राप्ती होणे, मनातील इच्छा पूर्ण होणे, नवसाला पावणे या काम्य बाबी आहेत. त्यासाठी वाचन नव्हते िंकवा कदाचित असेलही. परंतु, त्याहीपेक्षा सर्वोपरी आहे ती, अननुभूत अशा मन:शांतीची प्राप्ती. त्याने मन निर्भय होते. आपल्या व्यक्तित्वाभोवती संरक्षणाचे एक भक्कम आणि अभेद्य कवच निर्माण होते. एक वज्रशक्ती सतत आपल्या पाठीशी असल्याची जाणीव असते. आपल्या वृत्तींना शुचिता प्राप्त होते. प्रापंचिक दुःखे सहन करण्याचे धैर्य येते. कोणत्याही भीतीचा मनात लवलेश असत नाही. पोथीच्या सहाव्या अध्यायात असलेला ब्रजभूषणाच्या तोंडचा श्लोक हेच सांगतो. ब्रजभूषण महाराजांची स्तुती करताना म्हणतो-
 
हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी।
ऐसे युगायुगी किती अवतार घेसी।
तुझ्या दर्शनाने भय रोग िंचता नासे।
गजानन गुरो मज पाव आता।।
 
अर्थात हा पूर्णतः प्रत्येकाच्या अनुभवाचा विषय आहे. अंधश्रद्धा-अंधश्रद्धा म्हणून वितंडवाद घालणार्‍या बुद्धिभेदकांशी या संबंधात वाद न घालणेच इष्ट! आपण केलेली ध्यानधारणा, साधना, िंचतन, मनन याद्वारे आपल्या मनात जी होकारात्मक ऊर्जा निर्माण होते ती, अशा भंपक आणि ढोंगी लोकांशी वाद घालून क्षीण होते. श्रीमहाराजांच्या चरित्राचे वर्णन करणारा ‘श्रीगजाननविजय’ हा दासगणू महाराज यांनी रचलेला ग्रंथ केवळ पोथी नाही. त्याचे नीट वाचन व आकलन केले, तर एक गोष्ट लक्षात येते की, यात तत्कालीन समाजाचे वास्तव दर्शन आहे. श्रीदासगणू महाराजांनी तत्कालीन सर्व सामाजिक परिस्थिती, लोकजीवन, लोकश्रद्धा यांचा अभ्यास करूनच हा ग्रंथ लिहिलेला आहे. श्रीमहाराजांचे यथातथ्य चित्रण त्यांनी केलेले आहे. समाजातील विषमता, अधिकारापोटी आलेला अहंकार, जातिभेद, शेतकर्‍यांचे प्रश्न, योगाचे महत्त्व, निरर्थक कर्मकांड असे अनेक विषय त्यात हाताळलेले आहेत. श्रीमहाराजांचे प्रत्यक्ष दर्शन ज्यांना घडलेले आहे अशी पिढी आता पूर्णतः अस्तंगत झाली आहे. आपणास त्यांचे जे दर्शन घडते ते,आता केवळ चरित्रातून. त्यांच्याविषयी तत्कालीन मंडळींनी लिहिलेल्या किंवा सांगितलेल्या घटनांवरून. दासगणू महाराजांच्या ग्रंथावर बा. ग. खापर्डे यांनी अभिप्राय दिलेला आहे. तो 1947 सालचा आहे. त्यात श्रीमहाराजांच्या आठवणी आहेत तसेच विठ्ठल लक्ष्मण सुबंध (मुंबई) आणि भाऊशास्त्री वझे (काशी) यांचेही अभिप्राय आहेत. तेही 1946-48 च्या दरम्यानचे आहेत. श्रीमहाराज हे दिगंबर कोटीमधील सिद्धपुरुष होते. त्यांचे चमत्कार आणि लीला यांची वर्णने ग्रंथात आहेतच, परंतु याही पलीकडचे श्रीमहाराज आपण समजून घेतले पाहिजेत. या ग्रंथामध्ये महाराजांनी केलेले अनेक चमत्कार वर्णन केलेले आहेत. श्रीमहाराज िंकवा त्यांच्याच समान असलेले अनेक सिद्धकोटीतील सत्पुरुष चमत्कार दाखवीत असल्याची वर्णने आपणास आढळून येतात. आपल्या वाचनातही येतात. या चमत्कारांमागचे रहस्य आपण समजून घ्यायला हवे. असे चमत्कार िंकवा लीला या समाजाला उपदेश करण्यासाठी, त्याचे प्रबोधन करण्यासाठी केलेल्या लीला असतात. महाराजांच्या चरित्रातील भास्कर पाटलाची कथा ही या दृष्टीने समजून घेण्याजोगी आहे. संतचरणरज अ. दा. आठवले यांनी लिहिलेल्या नमस्काराष्टकातील खालील श्लोकात त्या चमत्काराचे महत्त्व आहे-
 
वापी जलेन रहितापि चकार पूर्णा।
यो वारिणा सुमधुरेण निजप्रभावात।
भक्त्‌याच शुष्कहृदयं सजलं करोति।
श्रीमदगजाननगुरुं शिरसा नमामि।।
 
तहानेने व्याकूळ झालेल्या महाराजांना भास्कर पाटील पाणी देत नाही. महाराज त्याला विनंती करीत आहेत. भास्कर ऐकत तर नाहीच, परंतु महाराजांना उलटून बोलतो. भास्कराचा अहंकार दुणावला असून स्वार्थभावनासुद्धा बोलण्यातून डोकावते आहे, हे महाराजांनी ओळखले. केवळ काडीने चिलीम पेटविणार्‍या, महाराजांसारख्या सिद्धपुरुषाला, जागीच पिण्याच्या पाण्याचा झरा निर्माण करता आला असता. परंतु ते न करता त्यांनी, बारा वर्षे कोरड्या असलेल्या विहिरीला पुष्करिणी बनविले. केवळ लोकांसाठी त्यांनी देवाचा धावा केला. महाराजांनी केवळ कोरड्या विहिरीला पाणी आणले नाही, तर भास्करच्या कोरड्या पडलेल्या अंतःकरणाला भक्तीचा पाझर फोडला. कोरड्या विहिरीला पाणी आणण्यापेक्षा, भास्कराचे हृदयपरिवर्तन हा चमत्कार मोठा आहे. माझ्या कोरड्या पडलेल्या मनाला तुम्ही साक्षात्काराचा सुरुंग लावला. त्याला भक्तिभावाचे पाणी लागले आहे. आता मी सन्नीतीची झाडे लावीन आणि भक्तीचे मळे फुलवीन, असे भास्कर म्हणतो. सर्वसामान्यांच्या मनातील धर्मश्रद्धा जागृत करून त्याचा उपयोग समाजधारणेसाठी करवून घेणे, हेच संत करीत असतात. हा खरा चमत्कार! श्रीमहाराजांनी स्वतःला बुवा असे स्वरूप कधीच दिले नाही. उलट, महाराजांच्या निमित्ताने स्वतःचे प्रस्थ वाढविणार्‍या विठोबा घाटोळाला त्यांनी झोडपून काढल्याची कथा आहे. असे सर्वच चमत्कार उलगडून दाखवता येतील. प्रत्येक चमत्कारामागे उदात्त उद्देश आहे.
 
 
 
श्रीमहाराजांसारख्या संताने यातून पहिली महत्त्वाची गोष्ट कोणती केली असेल, तर चांगले -वाईट, योग्य-अयोग्य, स्वीकार्य-त्याज्य याचा विवेक शिकविला. त्या काळचा सामान्य समाज हा अशिक्षित होता. त्याच्या पुढे शाब्दिक पांडित्य न मांडता प्रत्यक्ष उदाहरणाने त्यांचे प्रबोधन केले पाहिजे, हे त्यांनी जाणले होते. असे कितीतरी चमत्काराचे म्हणजेच प्रबोधनाचे प्रसंग ग्रंथात आहेत. नाठाळ घोड्याला वठणीवर आणण्याचा प्रसंग असो, की सुकलालच्या गायीला गरीब करण्याचा प्रसंग असो, त्या प्रसंगांवरचे चमत्कारांचे आवरण काढून त्याचे मर्म समजून घेतले, तर महाराजांविषयी आपल्या मनात असलेल्या श्रद्धा आणि भक्तीला वेगळीच झळाळी येईल. आपल्या धर्मातील उच्च आणि उदात्त तत्त्वे जनसामान्यांपर्यंत पोचविण्याची तळमळ संतांमध्ये दिसून येते. प्रपंचाच्या सर्व उपाधींपासून जो सुटला, आध्यात्मिक साधना हेच ज्याच्या जीवनाचे सूत्र आहे, जो स्वतः साधनामार्गाने भगवंताच्या सन्निध पोहोचला तो खरा संत. ज्याच्या अंगी पूर्ण वैराग्यशीलता आहे, सारे अध्यात्मज्ञान ज्याला आहे, ज्याचे सर्व मायापाश गाळून पडलेले आहेत तरीही जो समाजात आणि सर्वसामान्य माणसात वावरतो तो संत! लोकांमधील एक होऊनच, त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्यात मिसळूनच त्यांना न कळत शिकवणूक देतो तो संत! हे सर्व करीत असताना स्वतःचे स्तोम कुठेही माजू देत नाही, तो संत! महाराज हे या कोटीतील संत होते. ते नेहेमी पिसेपणाची पासोडी घालून का राहत याचे रहस्य समजून घेतले पाहिजे. ‘श्रीगजाननविजय’ ग्रंथाच्या 19 व्या अध्यायात श्रीमहाराजांना, श्रीवासुदेवानंद सरस्वती भेटण्यास येण्याचा प्रसंग आहे. त्या भेटीच्या प्रसंगानंतर बाळाभाऊंनी श्रीमहाराजांना काही प्रश्न विचारले, त्यावर महाराजांनी दिलेली उत्तरे मुळातून वाचावी म्हणजे श्रीमहाराजांच्या ज्ञानाची व्याप्ती समजते-
 
 
आता नको पुसूस काही। हे न कोणा सांगे पाही।
निवांत बसू दे ये ठायी। पिसेपणाच्या पासोडीने।।
 
 
हे महाराजांचे उद्गार आहेत. श्रीमहाराज हे दैवत कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, विचारांच्या चौकटीत अडकलेले नाही. हा देव समाजातील सर्व घटकांचा आहे. श्रीमहाराजांनी आपल्या केवळ वर्तनाने ही समरसता साध्य केली आहे. महाराजांनी कर्मकांडाला कधीच महत्त्व दिलेले नाही. निर्मळ, निरपेक्ष भक्ती आणि भूतदया ही त्यांची मूलप्रवृत्ती होती. आपले विहित कर्म करता करता अलिप्तता साधली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. ब्रजभूषणाला त्यांनी केलेला संक्षिप्त उपदेश सहाव्या अध्यायात येतो. केवळ दोनच ओव्या, पण संपूर्ण जीवनाचे आणि परमार्थाचे सार दर्शविणार्‍या!
 
कर्म मार्ग सोडू नको। विधी निरर्थक मानू नको।
मात्र त्यात होऊ नको। लिप्त बाळा केव्हाही।।
आचरून कर्मफळ। टाकिता भेटतो घननीळ।
त्याच्या अंगी न लगे मळ। या कर्माचा केव्हाही।।
 
सत्पुरुषांचे अवतारच मुळी समाजातील हीण नष्ट करण्यासाठी असतात. आपला हा उद्योग ही मंडळी वाणीपेक्षा करणीने करत असत. समाजातील नाठाळ आणि वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींना भल्या मार्गावर आणणे आणि समाजोपयोगी कार्याला प्रवृत्त करणे, याची तळमळ संतांना असते. नाठाळ घोड्याला वठणीवर आणण्याचा नवव्या अध्यायातील प्रसंगाचा अर्थ काय? केवळ चमत्कार म्हणून नमस्कार करून हा प्रसंग समजत नाही. घोड्याच्या चारही पायांखाली निजून महाराज नामानुसंधान करीत होते. घोड्याचे चित्त पालटण्याचे सामर्थ्य त्या नामानुसंधानात होते. ‘जे जे भेटे भूत।ण तया मानिजे भगवंत।।’ हे सूत्र त्यामागे आहे. नाठाळ घोडा हे वाईट प्रवृत्तीचे प्रतीक आहे. महाराजांनी नाठाळ घोड्याला मारले नाही. त्याचे चित्त पालटले. ‘जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।।’ या वचनाचा खरा अर्थ या प्रसंगातून उमगतो. अन्यथा संतांच्या कृतीचे अर्थ उमगत नाही. ज्यांचा घोडा होता त्या टाकळीकर कीर्तनकारांनी महाराजांची केलेली प्रार्थना संस्मरणीय आहे, ती या अर्थाने!
 
अिंचत्य जगताप्रती तुझी कृती न कोणा कळे।
असो खलही केवढा तव-कृपे सुमार्गी वळे।।
उणे पुढति ये तुझ्या खचित रत्निंचतामणी।
शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी।।
 
महाराजांच्या मनात असलेली शेतकर्‍याविषयीची कणव, पाखंडाची आणि ढोंगीपणाची असलेली चीड याचीही उदाहरणे ग्रंथात आहेत. ज्याला आपण संतांच्या लीला म्हणतो ती मुळात संतांनी सहेतुकपणे आचरणात आणलेली क्रिया असते. आपण त्याला चमत्काराचे वलय प्रदान करतो. यामुळे सामान्य समाज त्याला दुरून नमस्कार करतो. तिथे केवळ नमस्कार नव्हे, तर विचारपूर्ण कृती हवी. संत श्रीगजानन महाराज हे सत्कार्याला प्रेरणा देणारे संत होते. आज श्रीमहाराजांचा काळ राहिलेला नाही. जग हे खूप वेगाने बदलते आहे. या बदलत्या जगात आपल्याला तारणार आहे ती विशुद्ध धर्मश्रद्धा!!
धर्मश्रद्धा ही वाघीण। गेल्या मनरूपी दरीतून।
दुर्वासनेचे कोल्हे जाण। येऊन बसतील ते ठाया।।
भक्ती शुचिर्भूत अंगना। अभक्ति ही वारांगना।
तिच्या नादी लागल्या जाणा। विटंबनाच सर्वत्र।।
 
‘‘शेगावनिवासी संत श्रीगजानन महाराज की जयऽऽऽ’’ अशी घोषणा मंदिरातील भक्तमंडळी प्रत्यही करीत असतात. केवळ मंदिरात येणारीच नव्हे, तर आपापल्या घरी श्रीमहाराजांची उपासना करणारी भक्तमंडळीही हा जयजयकार करीत असतात. यातील शेगावनिवासी हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रीमहाराजांचा शेगावात आजही निवास आहे, असेच यातून सूचित होत नाही काय? आणि खरेच आजही श्रीमहाराजांचा शेगावात निवास आहेच. केवळ शेगावातच नव्हे, तर जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी त्यांची भक्तमंडळी हा जयघोष करतात, त्या त्या ठिकाणी श्रीमहाराज उपस्थित असतातच. हे त्यांचे अस्तित्व आपणास जाणवले पाहिजे. श्रीमहाराजांच्या अस्तित्वाची अशी जाणीव सहजासहजी होत नाही. त्यासाठी मनात श्रीमहाराजांविषयी अदम्य विश्वास, दृढ भक्ती आणि अहंकारविरहित समर्पणशीलता असणे आवश्यक आहे. असे असेल तरच त्यांचे अस्तित्व जाणवेल. नव्हे, दर्शनही होईल. श्रीमहाराजांच्या समाधीनंतर, आता शेगावात येऊन काय उपयोग? महाराज तर समाधिस्थ झाले, असा विचार अनेकांच्या मनात आला. त्यावर संत दासगणू महाराजांनी, ‘श्रीगजाननविजय’च्या विसाव्या अध्यायाच्या प्रारंभीच श्रीमहाराजांच्या असण्याचा निर्वाळा दिलेला आहे. श्रीमहाराज आता शेगावात नाहीत, असे अनेक भक्त म्हणतात, परंतु...
ऐसे कित्येक बोलती। परी ती असे साच भ्रांती।
महाराजांची दिव्य ज्योति। अदृश्य आहे तेच ठाया।।
जेवी इंद्रायणीचे तीरी। ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी।
ते आहेत भेटले परी। तेच ठायी भाविका।।
तैशीच शेगावात। श्रीगजाननस्वामी समर्थ।
ऐसा जयांचा सिद्धांत। दर्शन त्यांना तेथ होते।।
श्रीमहाराजांसारख्या श्रेष्ठ संताची सेवा आणि भक्ती करण्याचे भाग्य आपणास लाभणे, हेच आपल्या पूर्वसुकृताचे फळ आहे. असे दासगणू महाराज आवर्जून सांगतात. परंतु. संतांठायी मानवाची निष्ठा जडणे सहजासहजी अशक्य आहे, असा इशाराही देतात. त्यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य हवे, असेही सांगतात.
खर्‍या खर्‍या संतांची। सेवा न जाई वाया साची।
परी निष्ठा मानवाची। जडणे तेथे अशक्य।।
पूर्वसुकृतावाचून। संतसेवा न घडे जाण।
संत सेवेचे महत्पुण्य। त्या पुण्या पार नसे।।
श्रीगजानन लीलेचा। पार कधी न लागायचा।
अंबारीच्या चांदण्यांचा। हिशोब कोणा न लगे कधी।।
आपल्या संस्कृती-धर्माची मूलतत्त्वे समाजाच्या तळागाळापर्यंत पोचवणे, हे संतांनी केलेल्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. आपला हा उद्योग ही मंडळी वाणीपेक्षा करणीने करत असत. समाजातील नाठाळ आणि वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींना भल्या मार्गावर आणणे आणि समाजोपयोगी कार्याला प्रवृत्त करणे, याची तळमळ संताना असते. अशाच सत्पुरुषांच्या ठायी आपला दृढ विश्वास आणि भक्ती असावी. श्रीमहाराजांच्या चरणी दृढ भक्ती असावी, ही प्रार्थना संतचरणरज अ. दा. आठवले यांनीही आपल्या नमस्काराष्टकात केली आहे.
भक्तिरदृढास्तु सततं हृदये मदीये। मा मे मनो भंवतुं मोहमयं कदापि।
श्लोकैरतो वसुमितैर्गणूदासशिष्य:। तं श्रीमदगजाननगुरुं सदयं स्तुनोति।।
आपल्याही मनात अशीच दृढ भक्ती निर्माण होवो. दासगणू महाराज म्हणतात-
सतेज दुसरा रवी। हरी समान याचे बल।
वशिष्ठ सम सर्वदा। तदीय चित्त ते निर्मळ।।
असे असुनिया खरे। वारिवरी अवलिया भासतो।
तया गुरू गजानना प्रती। सदा दासगणू वंदितो।।
- 9822222115