सावरकर-सार सर्वस्व

    दिनांक :23-Aug-2020
|
- डॉ. नीरज देव
अभिनव भारताची स्थापना!
विनायकाने संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय नि सशस्त्र क्रांतिकार्याचे साधन नक्की करून घेतलेल्या शपथेला वर्ष उलटायच्या आतच, त्याच्या घरावर गाठीच्या तापाचे भयंकर संकट अकस्मात कोसळले. त्याचे हसरेखेळते घर अगदी पोरवयातच उद्ध्वस्त झाले. त्याचा एकमात्र आधार व स्फूर्तिस्थान असलेले पितृछत्र हरवले, जन्माची श्रीमंती जाऊन दारिद्य्र आले, अशा आघातात सामान्याची सोडा, धीर पुरुषाचीही वाताहत झाली असती. त्याने वाहिलेली देशस्वातंत्र्याची प्रतिज्ञा व्यक्तिगत दुःखात नि त्यातून जन्मलेल्या स्वार्थात वितळून गेली असती, तर नवल वाटले नसते. त्यातच आईवडील नाही, कोणाचा धाक नाही, ग्रामीण भागातून नाच गाण्यात रमणार्‍या नागरी वसतीत आल्याने सहज येणारा उच्छृंखलपणा जर सोळा-सतरा वर्षांच्या विनायकात उत्पन्न झाला असता, तर कोणालाही आश्चर्य वाटले नसते.

savarkar_1  H x
पण, स्वतःच्या या अनाथ, निर्धन नि अबल स्थितीत; त्याला त्याच्या परवश तरीही प्रिय भारतमातेची विपन्न दशा दिसू लागली. स्वतःचे पहाडाएवढे दुःख त्याला तिच्या दुःखापुढे टिचभर वाटू लागले. तिला स्वतंत्र, समर्थ नि समृद्ध कसे करता येईल याचाच विचार त्याच्या बालमनात सारखा फिरू लागला. त्याची प्रतिज्ञा त्यालाच स्वस्थ बसू देईना. त्याच तीव्र तगमगीतून म्हसकर, पागे या त्याच्यापेक्षा वयाने दुपटीच्या सहकार्‍यांना सोबत घेऊन वडिलांच्या मृत्यूनंतर (05/09/1899) केवळ दोन-तीन महिन्यांच्या आतच, म्हणजे नोव्हेंबर 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह या नावाची गुप्त संस्था त्याने स्थापन केली. पुढे चालून 1904 साली तिचे नाव अभिनव भारत असे करण्यात आले. युवकांना हेरून या गुप्त मंडळीत ओढण्यासाठी मित्रमेळा या प्रकट संस्थेची स्थापना 01/01/1900 रोजी त्याने केली.
अशा गुप्त मंडळीची स्थापना करताना, आपण काय करतो आहोत याची विलक्षण समज विनायकाला होती. पिस्तुलाचे दोनचार बार काढले म्हणून चापेकर बंधूंना रानडेसह इंग्रजांनी फासावर चढविल्याचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर होता. तीच दीक्षा सावरकर उभ्या भारताला देऊ इच्छित होते. याचा परीणाम चापेकरांहून भयंकर होणारा होता. यात हजारो-लाखो युवक अकाली फासावर चढतील, तितक्याच आया निपुत्रिक होतील, लाखो लेकरे पोरकी होतील, घराघरांत बांगडी फुटेल हे सारे सावरकरांना सोळाव्या वर्षाच्या वयातच कळत होते. पण, गाठीच्या तापात ओसाड अन्‌ स्मशान होणार्‍या निर्वीय घरा नि गावांपेक्षा क्रांतियुद्धात शत्रूशी लढता लढता बेचिराख होणारी घरे नि गावे विनायकाला पूजनीय, वंदनीय नि आचरणीय वाटत होती.
अगदीच निरुपाय म्हणून त्यांनी हा सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला होता. कोणी जादूगाराने छूमंतर करून इंग्रजांचे हृदय परिवर्तन केले असते, तर सावरकरांना ते भावले असते, न्यायबुद्धीने इंग्रजांनी हा देश सोडला असता तर सावरकरांना ते चालले असते, अर्ज, विनंत्यांनी द्रवून इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिले असते तरी सावरकरांना ते स्वीकार्ह वाटले असते, इतकेच नव्हे, तर सत्याग्रह, उपोषण करून हा देश स्वतंत्र झाला असता तरी ते त्यांना आवडले असते. पण, इतिहासाचा सज्जड पुरावाच त्यांना सांगत होता की, यापैकी कोणत्याही साधनाने वा साधनांनी कोणताही शत्रू स्वातंत्र्य देत नसतो. स्वातंत्र्य हिसकावूनच घ्यावे लागते, शत्रूला हाकलूनच ते मिळवावे लागते अन्‌ त्यासाठी एकच मार्ग असतो सशस्त्र क्रांती! राम, कृष्ण, शिवाजी, बाजी, गोिंवद, मॅझिनी, गॅरिबाल्डी... सार्‍यांनी तोच मार्ग अनुसरला होता. इटली, आस्ट्रिया, नेदरलंड, अमेरिका या देशातील स्वातंत्र्य रणांगणातूनच आले होते. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून तोच मार्ग विनायकाने अनुसरला. याविषयी सावरकर लिहितात, ज्या राष्ट्राच्या प्रेमासाठी आम्ही स्वतःवर ही अघोर आपत्ती ओढवून घेत होतो त्या मातृभूमीचे आणि आमचे स्वतःचे रक्त सांडण्याची आम्हास हौस का होती? जीवनाची आणि तारुण्याची मोहक सुखे आम्हासही नकोशी का होती? पण, देशभक्तीच्या पायरीवरून फासावर चढणार्‍या आणि चितेवर जळणार्‍या पुण्याच्या चाफेकरांचा आणि झाशीच्या लक्ष्मीचा अत्युग्र मार्ग जो आम्ही स्वीकारला होता, तो हौसेने असणे शक्यच नव्हते. (पृ. 228)
आपण स्वीकारीत असलेल्या कार्याच्या परिणामाची पूर्ण कल्पना आपल्या सहकार्‍यांनासुद्धा यायला हवी, म्हणून ते देश-विदेशातील क्रांतिवीरांच्या कथा त्यांना सांगत. त्यांचा झालेला छळ, त्यांना दिली गेलेली पीडा, स्वदेशबंधूंकडून झालेली प्रताडना सारे काही रंगवून रंगवून सांगत. असाच प्रसंग आज ना उद्या आपल्यावर येणारच आहे, त्याला तोंड देण्याची मानसिक, शारीरिक सिद्धता आपण ठेवायला हवी, याची जाणीव करून देत. त्यामुळेच असेल, त्यांच्या अभिनव भारताच्या शेकडो सहकार्‍यांनी अनन्वित छळणा सहन केल्या.
अभिनव भारताची स्थापना करताना सोळा वर्षीय विनायकाला स्पष्टपणे ठाऊक होते की, मूठभर माणसे जमवून इंग्रजांना हाकलून देता येणार नाही. त्यासाठी त्यांनी खालील योजना आखली होती -
1. सैन्यात आणि पोलिसात क्रांतीचा प्रसार करीत राहणे.
2. गुप्त क्रांतिकारकांची भरती पोलिस व सैन्यात करणे.
3. इंग्रजी सत्तेच्या केंद्रावर नि प्रतिनिधींवर वैयक्तिक छापे मारणे.
4. संस्थानातून नि सरसीमेपलीकडे शस्त्रास्त्रांचे साठे करून संधीची वाट पाहात बसणे.
5. इंग्रजांना राज्यशकट हाकणे धोक्याचे वाटावे यासाठी छोट्या-मोठ्या उठावण्या करीत राहणे.
6. एखाद्या महायुद्धात इंग्रज गुंतले असताना भारतात निकराचे युद्ध पुकारणे.
7. इंग्रजांच्या शत्रूशी मित्रता करणे व भारताबाहेरून आक्रमण करणे.
8. ते फसल्यास तशीच उठावणी स्वातंत्र्य मिळेपर्यंत करीत राहणे.
एवढी सुस्पष्ट योजना इतक्या लहान सावरकरांनी मांडलेली होती. जोडीलाच आपल्या सहकार्‍यांना सावरकर प्रत्येकाने आपल्या वाटचा एकेक शत्रू ठार मारला तरी काम होईलचा कृतिशील कार्यक्रम देत होते. त्याशिवाय क्रांतिकारकांना उपयुक्त ठरतील अशा ग्रंथांची निर्मिती करत होते. या सार्‍यांकडे पाहताना सावरकरांतील क्रांतिकारक किती परिपक्व होता तेच ध्यानात येते. सावरकरांची योजना इतकी स्पष्ट असताना थोर थोर लोक त्यांच्या क्रांतिकार्याला पोरकट, वेडेपणा म्हणून हिणवीत. हितिंचतक आत्मघातकी म्हणून मागे खेचत. यावर भाष्य करताना सावरकर लिहितात,
इंग्रजांचे दहापाच लोक मारले की ते पळतील, अशी दूधखुळी समजूत आम्ही केव्हाही करून घेतली नव्हती. तीस कोटी लोकांचे हे राष्ट्र, यातील दोन लक्ष वीर जरी अशा छाप्यांच्या पद्धतीने, गुप्त संघटनेने, गनिमी काव्याने, अखंड, अदम्य, अविश्रांत, वृकयुद्ध लढू निघतील. तरी आपले राष्ट्रीय स्वातंत्र्य संपादू शकतीलच शकतील. निदान संभव असलाच तर याच योजनेत काहीतरी होता, पण त्या सशस्त्र क्रांतियुद्धास पोरकट वेडेपणात ढकलून, जे थोरकट शहाणे केवळ अर्जांच्या-विनंत्यांच्या-निषेधांच्या, केवळ स्वदेशीच्या- समाज सुधारणेच्या वा निःशस्त्र प्रतिकाराच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळेल, इंग्लंड दया येऊन वा िंहदुस्थान वयात आले म्हणून वा आपली वचने स्मरून वा जनलज्जेने त्याच्या बंदुकीतील बारही झाडल्यावाचून निघून जाईल, म्हणून शपथेवर सांगत, त्यांच्या त्या योजनांत तो संभव मुळीच मुळीच मुळीच नव्हता!!! (पृ. 231)
अशा भरभक्कम वैचारिक पायावर सावरकरांनी अभिनव भारताची स्थापना केली होती. त्यामुळेच ती इंग्लिश साम्राज्यरूपी भरभक्कम किल्ल्याच्या मर्मस्थानी ठासून भरलेल्या सुरुंगासमान ठरली.
• माझ्या आठवणी- प्र. आ. (1949) व्हिनस बुक स्टाल, पुणे