या गणेश भावांगणी...

    दिनांक :23-Aug-2020
|
 - डॉ. भालचंद्र माधव हरदास
 
गणानां त्वा गणपिंत हवामहे
किंव कवीनामुपमश्रवस्तमम्‌।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत
आ नः श्रृण्वन्नूतिभिः सीद सादनम्‌।।
 
 
ganesh new_1  H
 
 
अर्थात, हे गणातील प्रमुख देवता गणपती, कवींमधील श्रेष्ठ कवी, शिवा आणि शिव यांचे प्रिय ज्येष्ठ पुत्र, भोग आणि सुखदाता, आम्ही आपले आवाहन करतो. आमची स्तुती ऐकून पालनकर्तारूपात आपण या सदनात आसनस्थ व्हावे. भारतीय संस्कृती ही आदर्शांची संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीत श्रीराम, श्रीकृष्ण यांचे आदर्श पिढ्यानपिढ्या व्यवहारात आणले जातात. यासोबतच अन्य देवीदेवतांचीदेखील आपण उपासना करीत असतो. यामागे उद्देश हाच की, त्या देवतेचे गुणादर्श आम्ही आत्मसात करून कृतीत आणावे. श्रीगणेश!, गणराय!, गणाध्यक्ष!... कितीतरी नावांनी संबोधली जाणारी ही देवता म्हणजे स्वरूप, आयुध मुद्रा, वाहन याद्वारे संकेतरूपात मानवजातीच्या कल्याणार्थ प्रगटलेले ईश्वरीय स्वरूप आहे. श्रीगजाननाच्या सद्गुुणांचे िंचतन, स्मरण आणि त्याद्वारे कृतिप्रवण होण्याचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव होय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ओंकारप्रधान अशा श्रीगणेशाचे वर्णन करताना म्हणतात-
 
ॐ नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या।
जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।
देवा तूंचि गणेशु। सकलमती प्रकाशु।।
म्हणे निवृत्ती दासु। अवधारिजो जी।
 
ब्रह्माण्डातील प्रत्येक कार्याच्या सिद्धीसाठी श्रीगणेश पूजनानेच प्रारंभ करावा लागतो. गणराय हे परमात्म्याचे अवतार नव्हे... नव्हे, प्रत्यक्ष परमात्माच आहे. विघ्नांचा विनाश आणि कार्यसिद्धीसाठी भगवंतानेच श्रीगणेशाचे रूप धारण केले आहे. श्रीगणेश म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश होत. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात-
 
ओमकार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान
ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप
तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी
पहावे पुराणी व्यासाचिया।
 
श्रीगणपत्यथर्वशीर्षात गणेशाचे वर्णन करताना त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि अर्थात गणेशाला प्रत्यक्ष ब्रह्म म्हटले आहे. आपल्या संस्कृतीत पंचायतन किंवा पंचदेवतांची पूजा सांगितली आहे. विष्णू, शिव, सूर्य, देवी आणि गणेशपूजन. शिव हे पृथ्वीतत्त्वाचे अधिपती असल्याने शिवाच्या पार्थिवपूजेचे विधान सांगितले आहे. विष्णू हे आकाशतत्त्व अधिपती असल्याने त्यांची शब्दसुमनांनी स्तुती होते. देवी अग्नितत्त्वांचे अधिपती असल्याने अग्निकुंडात हवन/यज्ञ करून देवीची पूजा केली जाते. सूर्य वायुतत्त्वाचे अधिपती असल्याने नमस्कार आदी पूजेचे त्यांचे विधान आहे. श्रीगणेश हे जलतत्त्वाचे अधिपती असल्याने त्यांच्या पूजेचे मान अग्र आहे आणि जलाधिपती असल्याने गणेश विसर्जनदेखील जलातच होते. ऋग्वेदात गणपती हा शब्द आला आहे. यजुर्वेदातदेखील उल्लेख आहे. अनेक पुराणात गणेशबिरुदावली वर्णन केली आहे. पुराणात गणेशाच्या संबंधात अनेक आख्यान आले आहेत. एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्याने शिशू गणेशाचे डोके भस्म झाले, ज्यामुळे दुःखित झालेल्या पार्वतीला ब्रह्मदेव म्हणाले, ज्याचे डोके सर्वात प्रथम मिळेल ते गणेशाला लावा. त्यानुसार गजवदन- हत्तीचे डोके मिळाले आणि अशाप्रकारे गणेश गजानन झाले. दुसर्‍या एका कथेनुसार, गणेशाला द्वारपाल बनवून पार्वती स्नानास बसली असताना शिवशंकर त्या ठिकाणी आले असता पार्वतीच्या भवनात प्रवेश करू लागले, मात्र गणेशाने जेव्हा शिवशंकरास प्रवेश करण्यापासून मज्जाव केला तेव्हा कृद्ध झालेल्या शिवशंकराने गणेशाचे डोके छाटले आणि पुढे हत्तीचे डोके गणेशाला लावण्यात आले.
 
 
धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात श्रीगणेशाला अग्रपूजनाचा मान आहे. श्रीगणेशाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला माध्यानसमयी झाला. श्रीगणेश हे शिवपार्वतीचे द्वितीय पुत्र आहेत. भगवान गणेशाचे स्वरूप अत्यंत मनोहर, मंगलकारक आणि सुखकारक असे आहे. ते एकदंत आणि चतुर्बाहू आहेत. आपल्या चारी हातात गणेशांनी क्रमश: पाश, अंकुश, मोदकपात्र आणि अभयवरमुद्रा धारण केली आहे. ते रक्तवर्ण, शूर्पकर्ण आणि पीतवस्त्रधारी आहेत. रक्तचंदन धारण करणारे श्रीगणराज हे रक्तवर्णपुष्पप्रिय आहेत. श्रीगजानन गणांचे ईश, स्वस्तिकस्वरूप आणि प्रणवरूप आहेत.
 
 
मनुष्य जेव्हाही आपला नेता निवडतो तेव्हा सर्वप्रथम नेत्यांमधील गुणांना बघतो. समस्त देवतांनी गणनायक म्हणून गणपतीचे नेतृत्व स्वीकारले आहे. श्रीगणेशाच्या भालप्रदेशावर चंद्र अंकीत आहे, म्हणूनच भालचंद्र असे नामाभिधान गणेशास प्राप्त झाले. चंद्र हा शीतलता, शांतता आणि कला-ज्ञान-विज्ञान यांचे प्रतीक आहे. गणनायक-म्हणजे गणाचा नायक! नायकाला सर्वांचे ऐकून घ्यावे लागते आणि सदैव प्रसन्न मुद्रेत राहावे लागते. श्रीगणेशाची मुद्रा सदैव प्रसन्न असते. सर्वांचे ऐकून घेण्यासाठी गणरायाला दीर्घ नासिका (शुंड) आहे, जो सर्वांच्या अंतःस्थळाचा ठाव घेण्याचे प्रतीक आहे. विवेकशुण्डा असेही गणपतीचे एक नाव आहे. गणेशाचे बारीक डोळे हे कृपाकटाक्ष आणि आत्मस्वरूपात तल्लीन असूनही भक्तांच्या संरक्षणी सदोदित कर्तव्यदक्ष असण्याची ग्वाही देतात. आ नो भद्रा:... विश्वात जे जे मंगल आहे, उन्नत, उद्दात आहे ते ते स्वीकारा, हा संदेश श्रीगणेशाचे कर्ण देत आहेत. वक्रतुंड असण्याचे तात्पर्य म्हणजे कितीही अडीअडचणी, दुष्टांचा विरोध अथवा कार्य करण्यास कंटकाकीर्ण मार्ग जरी असला, तरी न डगमगता ते कार्य आपल्या शक्ती व बुद्धीने तडीस नेणे असा होय. हातातील पाश हा प्रेम आणि आत्मीयत्वाचे बंधन असून अत्याचारी आणि दुराचारी वृत्तीसाठी अंकुश आहे. सद्गुरू मनोहरनाथ महाराज गणेशस्तवनात म्हणतात-
 
मुखी बोल अबोलता विवेकशुंडा नाभिपर्यंता।
दृष्टी आत्मस्वरूपी एकाग्रता कृपाकटाक्षता डोळिया।।
 
केवळ मनुष्यच नव्हे, तर देवीदेवता आणि ऋषी-मुनींदेखील कार्यसिद्धीसाठी गणेशाची आराधना करतात. त्रिपुरासुरावर विजयप्राप्तीसाठी भगवान महादेवाने, बळीला बांधण्यासाठी भगवान विष्णूंनी, चौदा भुवनांची रचना करण्यासाठी ब्रह्मदेवाने, पृथ्वीला आपल्या मस्तकी धारण करण्यासाठी शेषाने, महिषासुरमर्दनासाठी देवी पार्वतीस्वरूप दुर्गेने आणि विश्वविजयाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी कामदेवाने ज्यांचे ध्यान केले ते म्हणजे आनंदवदन, भुजंगभूषण सिद्धिविनायक, अभयवरदायक श्रीगणेश! श्रीगणेशाच्या दोन्ही बाजूस रिद्धी-सिद्धी विराजमान आहेत. मातृशक्तीचे अधिष्ठान आणि त्यांचा सन्मान यातून सूचित होतो. आपल्या सोबत असलेले सहकारी रूप, रंग, बुद्धी, क्षमता, शक्ती याबाबतीत कमीजास्त असू देत, मात्र सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती म्हणजे श्रीगणेशाचे मूषकवाहन. भारतात श्रीगणेशक्षेत्र म्हणून अनेक स्थानं प्रसिद्ध आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टिकार्यात येणार्‍या विघ्नांचा नाश करण्यासाठी महाराष्ट्रातील थेऊर (पुणे) येथे गणेश स्थापना केली. श्रीविष्णूंनी मधु-कैटभ दैत्यांचा संहार करण्यासाठी सिद्धटेक (नगर) येथे गणेशपूजन केल्याची कथा आहे. द्वापारात वेदव्यासांनी याच गणेशाचे पूजन केले होते. देवता आणि ऋषी-मुनींनी या मूर्तीचे नाव सिद्धिविनायक ठेवले. भगवान विष्णूंचे तपोक्षेत्र म्हणून सिद्धाश्रम या नावाने हे क्षेत्र प्रसिद्ध आहे.
 
 
श्रीराधेला मिळालेल्या शापाला शंभर वर्षे झाल्यावर श्रीकृष्णप्राप्तीसाठी राधेने सिद्धाश्रम क्षेत्री तप केल्याची आख्यायिका आहे. त्रिपुरासुराच्या संहारासाठी शंकराने रांजणगाव येथे गणेशस्तवन केले आणि नंतर त्रिपुरासुराला ठार मारले. या स्थानास मणिपूर क्षेत्र म्हणतात. सती पार्वतीने लेण्याद्री येथे श्रीगणेश पुत्र म्हणून प्राप्त होण्यासाठी तपस्या केली होती. आदिशक्तीने विंध्याचल क्षेत्रात गणेशाला प्रसन्न करून महिषासुर वध केला. आदिकल्पाच्या आरंभी ॐकाराने वेदस्वरूपात मूर्तिमान होऊन प्रयागराज तीर्थात गणेश स्थापना आणि आराधना केली. हे क्षेत्र ॐ कार गणपतिक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. ‘गणानां त्वा गणपिंत हवामहे’ या ऋग्वेदातील ऋचेचे मंत्रद्रष्टा गृत्समद ऋषी यांनी महड येथे वरदविनायक स्थापना केली. तारकासुरासोबतच्या युद्धापूर्वी शिवपुत्र कार्तिकेयाने वेरूळ क्षेत्रात श्रीगणेश स्थापना केली. या गणेशाच्या कृपेनेच तारकासुराचा नाश झाला. हे क्षेत्र लक्ष-विनायक नावाने ओळखले जाते. गौतम ऋषींच्या शापापासून मुक्तीसाठी देवराज इंद्राने विदर्भातील कळंब येथे िंचतामणी गणेश स्थापना केली. महापाप, संकष्ट आणि शत्रू नामक दैत्यसंहार करण्यासाठी देवता आणि ऋषींनी फणींद्रपुर (नागपुर) अदोष क्षेत्रात (आदासा) शमी विघ्नेशाची स्थापना केली. भगवान वामनाने राजा बळीच्या यज्ञात जाण्यापूर्वी आदासा येथे आराधना केली होती.
 
 
देवासुर संग्रामातील मंथनातून अमृत निघावे यासाठी देवतांनी दक्षिण भारतातील कुंभकोणम येथे गणेश स्थापना केली होती. चंद्राने परभणीजवळ गोदावरीतीरी गणेश आराधना केली होती. हे क्षेत्र भालचंद्र गणेशक्षेत्र म्हणून विख्यात आहे. यमधर्माने मातेच्या शापातून मुक्तीसाठी नामलगाव येथे आशापूरक गणेशाची स्थापना केली होती. भगवान दत्तात्रेयांनी राक्षसभुवन (बीड) येथे विज्ञान गणेश स्थापन करून अर्चना केली होती. हे स्थान विज्ञान गणेशक्षेत्र म्हणून ओळखले जाते. पद्मालयात कार्तवीर्य (सहस्रार्जुन) आणि शेष यांनी गणेश आराधना केली होती. बल्लाळ नामक वैश्य बालकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन पाली येथे श्रीगणेश प्रगट झाले. हे क्षेत्र बल्लाळ विनायक म्हणून सुविख्यात आहे. सिंदुरासुराचा वध केल्यानंतर श्रीगणेशाने राजूर (देवगिरी) येथे राजा वरेण्य यास गणेशगीतेचा उपदेश केला. हे स्थान ज्ञानदाता गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शकुंतलेचे धर्मपिता महर्षी कण्व यांनी टिटवाळा येथे गणेश स्थापना केली. पित्याच्या आज्ञेने शकुंतलेने गणेशव्रत घेतले ज्यायोगे तिला राजा दुष्यन्त पतिरूपात प्राप्त झाले. या गणेशास विवाहविनायक म्हणतात. समस्त देवीदेवता, ऋषी-मुनी यांनी ज्याप्रकारे गणेशाची आराधना केली त्याप्रमाणेच आमचेही जीवन विघ्नबाधारहित व्हावे आणि चारी पुरुषार्थांची प्राप्ती आम्हास व्हावी, याकरिता आपणही गणेश उपासना आणि नयनमनोहर गणेशाचे ध्यान करायला हवे.
 
शुक्लाम्बरं धरंदेव शशिवर्णं चतुर्भुजम्‌।
प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वाविघ्नोपशान्तये।।
 
बुद्धिप्रदाता, सकलमतीप्रकाश, वाणी विद्यांचे सार, सुखाचे गव्हर असलेले गणाध्यक्ष महाराजाधिराज मंगलमूर्ती श्रीगणराज आपल्या सगळ्यांच्या भावांगणी यावे आणि सकळ दुष्कृत शमन करावे, हीच गणेशोत्सवाच्या प्रारंभी मंगलमूर्ती विनायकाला मनोभावे प्रार्थना!
 
या गणेश भावांगणी कृपे रसरंग भरा भजनी।
जीवित सद्गुरूचे व्हावे सर्वस्व त्यासी अर्पावे।
मनोहरनाथमय व्हावे लक्ष हो जितेंद्रनाथ जीवनी।
या गणेश भावांगणी कृपे रसरंग भरा भजनी।।...
••
9657720242