विदर्भात 16 स्थानी उजव्या सोंडेचे श्रीगणेश

    दिनांक :25-Aug-2020
|
धामणगावच्या जे.बी. फर्मचा पुढाकार
- कमल छांगाणी
धामणगांव रेल्वे, 
दैनंदिन कार्याची सुरुवात अथवा व्यापाराचा शुभारंभ करण्यापूर्वी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन अध्यात्मामध्ये शुभसंकेत मानल्या जाते. याच प्रेरणेतून धामणगांव येथील स्व. भागचंद अग्रवाल यांनी जे.बी. फर्मच्या माध्यमातून विदर्भात ठिकठिकाणी उजव्या सोंडेच्या गणेशाची मंदिरे उभारली होती. धामणगाव शहरात जुन्या जे.बी. जीन, के.जी.टी.आय. अशी दोन ठिकाणी मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणुन या मुर्तींची ओळख असल्याचे शहरातील नागरिक सांगतात.
  
amravati _1  H
 
धामणगांव येथील स्व. भागचंद अग्रवाल यांनी जयरामदास भागचंद फर्मच्या माध्यमातून शहरातील जे.बी. जीनमध्ये 1963 मध्ये तर 1885 मध्ये के.जी.टी.आय. येथे जयपुर (राजस्थान) येथून आणलेल्या उजव्या सोंडेच्या संगमनेर दगडाच्या मुर्त्या स्थापीत केल्या. तसेच विदर्भात धामणगावसह वर्धा, आर्वी, अमरावती, यवतमाळ अशा 16 ठिकाणी जे.बी. फर्मच्या माध्यमातून उजव्या सोंडेच्या गणेशाची मंदिरे उभारली आहे.
 
व्यापारी नगरी असलेल्या धामणगावात दोन ते तीन राज्यातील व्यापारी त्यावेळी येत असत. तेथे काम करणारे कामगार, हमाल तसेच व्यापारी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतल्या शिवाय कामाला सुरुवात करित नव्हते. अनेक कामगार दुपारचे जेवण करताना आणलेल्या डब्यामधुन नैवैद्य ठेवत असत. या मंदिरामध्ये गणेशोत्सवा दहा दिवस उत्साहाने साजरा करण्यात येतो. या मंदिरात दर महिन्याच्या चतुर्थीला शहरातील भाविक दर्शनाला येतात. दिवाळीनंतर अन्नकुट करण्यात येतो. उजव्या सोंडेची मुर्ती सहजपणे कुणीही कारागीर तयार करीत नाही. नवसाला पावणारा गणपती म्हणुन या मुर्तीची ओळख असल्याचे शहरातील नागरिक सांगतात.
 
दर्शनाने कार्याला सुरुवात
जे.बी. ट्रस्टच्या माध्यमातून विदर्भातील धामणगावसह 16 ठिकाणी उजव्या सोंडेच्या गणेशाची मंदिरे आहे. या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेतल्या शिवाय कोणत्याही कार्याला सुरुवात होत नाही. आमच्या फर्म आणि परिवाराचे श्री गणपती बाप्पा आराध्य असल्याचे जयरामदास भागचंद फर्मचे शरदकुमार अग्रवाल आपल्या अनुभवातून सांगतात.