- मेळघाटवर निसर्गाची कृपा
रवि नवलाखे
धारणी,
धारणी शहराजवळच्या कावडाझिरी पासून तीन किमी पायी चालून महादेवखोरा गाठावे लागते. येथील धबधबा आकर्षक असून पर्यटकांची पहिली पसंती त्याला मिळत आहे.
दोन वर्षापूर्वी महादेव खोर्याच्या धबधब्याचा शोध लागला. पर्यटन व तीर्थस्थान म्हणून त्याला ओळख मिळत आहे. पहाडाखाली कोरलेल्या गुफेतले महादेव आणि गणेशाचे मंदिर येथे भक्तीमय वातावरण निर्माण करते. धारणी तालुक्यात सर्वात मोठा धबधबा म्हणून ओळख असलेल्या महादेवखोरा मेळघाटसह मध्यप्रदेशात सुध्दा प्रसिद्ध आहे.
मानवाच्या डोळ्यापासून अनेक वर्षापर्यंत अलिप्त राहलेला हा धबधबा व तेथील नैसर्गिक सौंदर्य आता मात्र डोक्याला भन्नाट करुन सोडणारे झालेले आहे. काळ्या दगडाच्या पहाडावरुन पसरत वाहणारे पाणी अगदी हिमनदीसारखे दिसते. शंकराच्या दर्शनापूर्वी भक्तांना धबधब्यात स्नान करण्याचा मोह आवरता येत नाही, हे पण एक वैशिष्ट्य आहे.
उन्हाळ्यापर्यंत येथे पाणी वाहते म्हणून भक्तांची सारखी हजेरी असते. धारणीवासीयांसाठी हा धबधबा डबापार्टी व पर्यटनासाठी आदर्शस्थान झाले आहे. हा धबधबा निसर्गासोबत जवळीक साधण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. जुन्या काळापासून भारतात तिर्थक्षेत्रांची स्थापना प्राकृतिक सौंदर्याने नटलेल्या भागातच होत होती, हे विशेष.