प्रत्यक्ष बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या साडेतीन पटीने जास्त

    दिनांक :26-Aug-2020
|
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली,
देशात बरे झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या प्रत्यक्ष रुग्णसंख्येपेक्षा साडेतीन पटीने जास्त आहे. देशात आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24,67,758 झाली आहे, तर देशातील प्रत्यक्ष बाधितांची संख्या 7,07,267 आहे.
 
corona_1  H x W 
 
मागील 24 तासांत 63,173 बाधित बरे झाले. या आकड्यासह देशात आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24,67,758 झाली आहे. बरे झालेल्यांची टक्केवारी 76.30 आहे. 24 तासांत 67,171 नवे बाधित सापडल्यामुळे देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 32,34,474 झाली आहे. 1,059 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाबळींचा आकडा 59,449 वर पोहोचला आहे. देशातील मृत्युदर सर्वांत कमी म्हणजे 1.84 टक्के आहे.
देशातील प्रत्यक्ष बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या 17 लाख 60 हजार 489 ने जास्त आहे. देशातील प्रत्यक्ष रुग्णांची टक्केवारी 21.87 आहे.
 
 
दिल्लीतील रुग्णांतही वाढ
राजधानी दिल्लीतील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल यांनी कोरोनाच्या चाचण्या दुप्पट करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या 20 हजार चाचण्या दररोज केल्या जात असून, आता 40 हजार चाचण्या दररोज केल्या जातील, असे ते म्हणाले.
 
 
मंगळवारी दिल्लीत 1,544 नवे बाधित सापडले. गेल्या महिनाभरातील ही सर्वांत मोठी संख्या आहे. आतापर्यंत दिल्लीतील नव्या बाधितांची संख्या हजाराच्या आतच राहात होती. 1,544 नव्या बाधितांमुळे दिल्लीतील संक्रमितांची संख्या 1,64,071 झाली आहे. 17 जणांच्या मृत्युमुळे कोरोनाबळींची संख्या 4,330 झाली आहे. दिल्लीत आतापर्यंत 1,47, 743 बाधित बरे झाले असून, ही टक्केवारी देशात सर्वाधिक म्हणजे 90 पेक्षा जास्त आहे. दिल्लीत 11,998 प्रत्यक्ष संक्रमित असून, यातील 4,505 जणांवर रुग्णालयात, तर 5,949 जणांवर घरी उपचार सुरू आहेत.