शैक्षणिक आव्हानांचा स्वीकार करताना...

    दिनांक :27-Aug-2020
|
कोरोना महामारीची सुरुवात होऊन आता जवळपास पाच महिने लोटत आहेत. या काळात जगात आमूलाग्र बदल झालेले दिसत आहेत. जे मानवाला करता आले नाही ते एका कोरोनाने साध्य करून दाखवले. जगाची रीतच या महामारीने बदलून टाकली. ‘नाकापेक्षा मोती जड’ झालेल्यांना या मारामारीने जमिनीवर आणून टाकले आणि भल्याभल्यांना त्यांची खरी िंकमत काय, हे दाखवून दिले. ‘मी’चा अहं जपणार्‍यांना तर कोरोनाने अशी चपराक लगावली की, आता पुन्हा म्हणून अहंचा ‘अ’सुद्धा ही मंडळी उच्चारण्यास धजावणार नाहीत! मंदिरे ओस पडली, पर्यटनस्थळांना ओहोटी लागली, सार्वजनिक कार्यक्रम बंद पडले, श्रीमंतीचा थाट कुठे दिसेनासा झाला. कारखाने बंद.
 
e lring_1  H x
अशी कल्पना जिथे शक्य वाटत नव्हती तिथे ते बंद तर पडलेच, पण कोट्यवधी लोकांच्या नोकर्‍यादेखील गेल्या. जे वेगाने बदलले ते तरले आणि ज्यांना ते जमले नाही, त्यांना आयुष्य कठीण होऊन बसले. अनेकांना मानसिक रोगांनी पछाडले. बदलणार्‍यांनी नवी वाट चोखाळली आणि त्यांना त्यांच्या धाडसाची फळेही तत्काळ मिळाली. असो.
देशातील अनेक शहरांत कोरोनाची लागण आटोक्यात आल्याचे दिसू लागल्याने टाळेबंदीत शिथिलता आणली गेली आहे. शिथिलतेचा आणखी एक टप्पा येत्या काही दिवसांत सुरू होण्याची चिन्हे आहेत. तथापि, जीम, व्यायामशाळा, मंदिरे, मॉल्स, चित्रपटगृहे, जलतरण केंद्रे बंदच आहेत.
 
मंगल कार्यालये, रेल्वेगाड्या, बसेस आदींबाबत अजूनही निर्बंध लागू आहेत. शाळा-महाविद्यालये तर अद्याप सुरूच झालेली नाहीत. याबाबतचा निर्णयही लवकरच घेतला जाईल.
 
शिक्षणक्षेत्रात मात्र या निमित्ताने बदलाचे वारे वाहू लागले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात बदल हवा, असे गेली अनेक वर्षे निव्वळ बोलले जात होते. बदल करण्यास बराच वावदेखील होता. जगाच्या तुलनेत आपण बरेच मागे पडलो होतो. शिक्षणाचा दर्जा असेल, शिक्षणाची पद्धती असेल, शिक्षकांचे प्रशिक्षण असेल िंकवा प्रशासकीय सुधारणा असतील, त्या करण्याची गरज वेळोवेळी बोलली जात होती. पण, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? त्यामुळे आलेले प्रत्येक वर्ष पुढे ढकलण्यातच प्रशासनातील आणि सरकारमधील संबंधित मंत्रीदेखील धन्यता मानत होते. त्यामुळे शैक्षणिक सुधार जो अत्यावश्यक होता, तो प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसत नव्हती.
 
पण, कोरोनाने सारेच बदलून टाकले. जो मोबाईल हाताळण्यास विद्याथ्यार्र्ंना बंदी होती, त्यांना तो आता अनिवार्य होऊन बसला आहे. ज्या पालकांची क्षमता नाही, अशांनाही मुलांना स्मार्ट फोन देणे अनिवार्य होऊन बसले. पूर्वी असाच विरोध संगणकीकरणास झाला होता. भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने या देशात संगणकीकरण करणे म्हणजे लोकांच्या नोकर्‍यांवर गदा आणणे होय, असा निष्कर्ष त्या वेळी काढला गेला आणि त्याविरोधात बंद, संप, धरणे आदी आंदोलनेही झाली. पण, परिस्थितीचा झपाटा इतका जोरदार होता की, कामगार संघटनांनाच नव्हे, तर या समाजालाही अखेर संगणकीकरणाचे महत्त्व पटले आणि त्यांनी पुढच्या पिढीचे नुकसान टाळण्यासाठी ही नवी पद्धत अवलंबिली.
 
तेव्हा स्वीकारलेले संगणकीकरण आज आपल्याला तर फायदेशीर ठरतच आहे, शिवाय आपल्या पाल्यांना संगणकीय क्षेत्रात काम करणार्‍या कंपन्यांमध्ये नोकर्‍यादेखील मिळू लागल्या आहेत. अनेकांना या नोकर्‍या पाच आकडी पगारात घेऊन गेल्याने त्यांच्या राहणीमानात आणि समाजातील त्यांच्या स्थितीत आमूलाग्र परिवर्तन आले आहे. प्रारंभी नवतंत्रज्ञानाकडे कानाडोळाच केला जातो आणि नंतर त्याची उपयोगिता ध्यानी येताच त्याची स्वीकारार्हता वाढत जाते. समाजाची हीच रीत आहे, त्याला नाकारले जाऊ शकत नाही.
 
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हे सारे साध्य होत आहे. ज्या सुधारणा आता विनासंकोच लागू करणे शक्य झालेले आहे, त्या आजपासून 20, 30 वर्षांनंतरही लागू होऊ शकल्या असत्या, असे कुणीतरी छातीठोकपणे सांगू शकेल का? उलट, अशा सुधारणांकडे राजकारण म्हणून पाहिले गेले असते. कुणाला त्यात निवडणुका दिसल्या असत्या अन्‌ कुणाला अशी व्यवस्था म्हणजे डिजिटल क्षेत्रातील कंपन्यांचे उखळ पांढरे करण्याची कुरणे दिसली असती. शिक्षणाचे डिजिटायझेशन तर पार मोडूनच काढले गेले असते. जगामध्ये शिक्षणातील सुधारणा लागू झाल्या आणि त्या त्यांनी स्वीकारल्यादेखील. विकासाची उड्‌डाणे त्यातून त्या त्या देशांना भरता आली. पण, कुठल्याही गोष्टींना प्रारंभी विरोध करण्याचीच वृत्ती आपल्याला नडली आणि आपण जगाच्या तुलनेत माघारलो. आता कोरोनामुळे सर्वांना बदलणेच भाग पडले, त्यामुळे एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रासाठी ही इष्टापत्तीच ठरली. अजूनही डिजिटायझेशनविरोधात ओरड सुरूच आहे. कुठे गरिबीचे रडगाणे गायले जात आहे, तर कुठे इंटरनेटची रेंज नसल्याचे सांगितले जात आहे.
 
कुठे तंत्रज्ञानातील चुका पुढे केल्या जात आहेत, तर कुठे आभासी शिक्षणात मजा नसल्याच्या तक्रारी होत आहेत. निश्चितच आभासी शिक्षण आणि प्रत्यक्ष वर्गखोल्यांमध्ये दिले जाणारे शिक्षण यात फरक असणारच. एखादी वस्तू पडद्यावर बघणे आणि तीच वस्तू प्रत्यक्षात हातात घेऊन बघणे यात फरक राहणारच. आभासी शिक्षणात शिक्षकांचा मायेचा ओलावा, त्यांच्या स्पर्शाची जाणीव, त्यांच्या अस्तित्वाचे तरंग आणि त्यांच्या अस्तित्वामुळे मिळणारे मानसिक बळ शक्यच नाही. तरीही काळाची अपरिहार्यता म्हणून डिजिटायझेशन स्वीकारले गेले आणि हा बदल अंगवळणी पडायला लागला आहे. खरेतर हा बदल पाल्यांनी सहज स्वीकारला. नवतंत्र शिकण्याची उत्सुकता जेवढी जास्त, तेवढे हे तंत्र शिकणे सोपे असते.
 
तशी उत्सुकता तरुणाईत आणि पाल्यांमध्ये आहे, त्यामुळे त्यांनी हा बदल सहज स्वीकारला आणि त्यात नवनवीन सुधारणाही सुचविल्या. पण, पालकांना आणि शिक्षकांनाच हे सारे जड जात आहे. त्यांनीही काळानुरूप बदल केलेला असला, तरी त्यांची आणि तंत्रज्ञानाची सांगड अजूनही बर्‍यापैकी घातली गेलेली नाही. तरीदेखील शैक्षणिक क्षेत्राने स्वीकारलेला हा बदल स्वागतार्हच म्हणावा लागेल. आता फक्त 100 टक्के डिजिटायझेशनची अपेक्षा शासन करणार असेल तर ते अशक्य आहे. कारण पाटी-पेन्सिलने शिक्षण होते तेव्हाही शिक्षण 100 टक्के लोकांपर्यंत पोहोचलेले नव्हते. त्यामुळे येत्या काळात नव्या शैक्षणिक बदलांचे वारे जास्तीत जास्त विद्याथ्यार्र्ंपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
 
या बदलांच्या सोबतीला सरकारने आणलेल्या नव्या शिक्षण पद्धतीचा बदल स्वीकारण्याचे आव्हान शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांना पेलावे लागणार आहे.
कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी भौतिक दूरता, निर्जंतुकीकरण, सातत्याने हात धुणे, गर्दी टाळणे आणि मुखाच्छादनाची सवय सर्वांना करून घ्यावीच लागणार आहे. पण, त्याच्या सोबतीला एका वर्गात 30 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मज्जाव ठेवल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे शिक्षकांना शक्य होणार आहे. भारताची लोकसंख्या बघता हे कितपत शक्य होईल आणि ते शक्य होण्यासाठी किती पैसा आणि मनुष्यबळ खर्ची घालावे लागेल, ही बात अलाहिदा. पण, विदेशी शिक्षणाशी तुलना करताना आपल्याकडील शिक्षणातील ही त्रुटी दूर होण्याची गरज आहे.
 
शिक्षण क्षेत्रातील धुरीण डिजिटायझेशनचा स्वीकार करताना त्रुटींकडेही लक्ष देतील, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात शाळेतील दप्तरांचे ओझे कमी करण्यावर जोर दिला जाणार आहे. पण, दुबईसारख्या देशात मुले शाळेतील पुस्तके घरी आणतच नाहीत, त्यामुळे शिक्षणाचा त्यांना जाच होत नाही. अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होईल का? अर्थात, अधिकाधिक हसतखेळत शिक्षणाच्या दिशेने आपण पावले टाकू शकू का? याचाही विचार होण्याची गरज आहे. शिक्षणाच्या व्यवसायाभिमुखतेकडे बघण्याचेही मोठे आव्हान शैक्षणिक क्षेत्रावर आहे. सोबतीला डिजिटल शिक्षणात येणार्‍या अडचणी कशा दूर करता येतील, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. गरिबीमुळे िंकवा नोकर्‍या गमवाव्या लागत असल्याने, महागडे डिजिटल शिक्षण अशक्य कोटीतले होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी...