सर्वच कोरोना विषाणूंवर लस येणार

    दिनांक :27-Aug-2020
|
- केम्ब्रिज विद्यापीठाचे संशोधन सुरू
लंडन,
जगभरात कोरोनावर प्रभावी औषधीसाठी संशोधन कार्य सुरू आहे, मात्र केम्ब्रिज विद्यापीठाने कोरोना श्रेणीतील सर्वच घातक विषाणूंवर परिणामकारक ठरणार्‍या लसीसाठी संशोधन सुरू केले आहे. वर्षअखेरीपर्यंत त्याच्या चाचण्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठाने दिली आहे.
 
CAMBRIDGE-UNIVERSITY_1&nb 
 
वटवाघळांसह अनेक प्राण्यांमध्ये आढळणार्‍या निरनिराळ्या कोरोना विषाणूंचा मानवाला भविष्यात धोका उद्भवू नये, यासाठी केम्ब्रिज विद्यापीठाकडून ‘डायओस-कोवॅक्स’ असे नाव असलेली ही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही लस देण्यासाठी सुई न वापरता थेट इंजेक्शनच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वर्षअखेरीस या लसीच्या मानवी चाचण्या सुरू करण्यात येणार आहे. या लसीच्या संशोधनासाठी ब्रिटन सरकारने 19 लाख पाऊण्ड्‌सचे अर्थसाह्य दिले आहे, तर डायोसिनवॅक्स कंपनी चाचण्यांसाठीचा 4 लाख पाऊण्ड्‌स खर्च उचलणार आहे.
 
 
सध्या काळाची तातडीची आवश्यकता म्हणून लस विकसित करताना अनेकांनी प्रस्थापित असलेली पद्धत वापरली आहे. या लसीच्या चाचण्या यशस्वी होतील, अशी आशा आहे. मात्र, प्रचंड यशस्वी लसींनाही मर्यादा असते. त्या काही नाजूक स्थितीतील काही व्यक्तींसाठी अयोग्य ठरू शकतात तसेच त्यांचा प्रभाव किती काळ राहील, याविषयीही निश्चित दावा करता येत नाही, असे डायोसिनव्हॅक्स कंपनीच्या डॉ. रिबेका किन्सली यांनी स्पष्ट केले. सिंथेटिक डीएनएच्या वापराने कोरोनाविरोधात अधिक प्रभावी ठरेल अशी लस विकसित करण्याचा प्रयत्न आहे. अशाप्रकारे विकसित केलेली लस क्रांतिकारक बदल घडवू शकते. त्यामुळे ही लस कमी खर्चात उत्पादित व वितरित करता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
 
 
या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे या लसीला गोठवून भुकटी स्वरूपात जतन केली जाईल. यामुळे त्यावर उष्णतेचा परिणाम होणार नाही व ती शीतपेटीत ठेवण्याची गरज भासणार नाही. यामुळेच तिच्या वाहतूक व साठवणूक प्रक्रियेसाठी खर्च येणार नाही व जगातील गरीब व मध्यम आर्थिक गटातील देशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.
 
 
दरम्यान, स्ट्रॅझेन्का कंपनी ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन करत आहे. सध्या कोरोनावरील सर्वाधिक आश्वासक लस म्हणून या लसीकडे पाहिले जात आहे. या लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू असून लवकरच निकाल अपेक्षित आहेत. भारतात सिरम इन्स्टिट्यूट या लसीचे उत्पादन करणार असून परवडणार्‍या दरात ही लस भारतामध्ये उपलब्ध होणार आहे.