‘घंटानाद’ आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा

    दिनांक :27-Aug-2020
|
- भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार पाटणी यांची माहिती
वाशीम,
मंदिरे सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून, जिल्ह्यात पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सक्रिय सहभागी होतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली.
 
 
mla patni_1  H
 
आमदार पाटणी म्हणाले की, केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही. ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी राज्यभर दार उघड उद्धवा दार उघड अशी हाक देत घंटानाद आंदोलन विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे होणार आहे. या आंदोलनाला भाजपा पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील असे आमदार पाटणी यांनी सांगितले.