शिक्षण विभागाचे अधिकारी बावचाळले

    दिनांक :27-Aug-2020
|
- चारदा बदलले स्वतःचेच आदेश
- एकाच दिवशी परस्पर विरोधी आदेश निर्गमित
भंडारा,
झोलबाच्या वाड्यातील शिक्षण विभाग म्हणजे या वाड्याचे आकर्षण. मग या विभागात काम करणारे अधिकारी इतरांपेक्षा नक्कीच काही तरी वेगळे असणार ना आणि आहेतही. म्हणूनच तर केवळ एकाच विषयाच्या मागे अख्खा विभाग गुरफटला आहे. एकाच विषयाला घेऊन प्रभार सांभाळीत असलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ४ आदेश काढले आणि रद्दही करीत गेले. आदेशाची मालिका या विभागासाठी नवी नाही पण एक आदेश सकाळी ११ वाजता निघतो आणि तो रद्द करून नवीन आदेश त्याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता निघत असेल तर अशा अधिकाऱ्यांची कीव येणारच ना. आता हा आदेशांचा खेळ कोण खेळायला लावतो, हे राजकारणात मुरब्बी असलेल्या शिक्षकांना वेगळे थोडी सांगावे लागते.

zp_1  H x W: 0
 
शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतूनच केले जावे असे शासनाचे परिपत्रक निघाले आणि त्या दृष्टीने कारवाई सुरु झाली. शिक्षण विभागानेही हालचाली सुरू केल्या. जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन आतापर्यँत जिल्हा मध्यवर्ती बँकेतून होत होते. जवळपास २०० कोटींची उलाढाल होत असल्याने बँकांना हा मोठा व्यवसाय होता. १८ शिक्षक संघटनांची मिळून असलेल्या समन्वय समितीने पाठपुरावा केल्याने ६ ऑगस्ट ला शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून मुख्याध्यापकांना सर्व शिक्षकाचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याचे आदेश दिले. २४ ऑगस्ट रोजी येऊ आदेश काढून ६ चा आदेश रद्द करण्यात आला. दरम्यान १३ ऑगस्ट रोजी शासनाचे एक परिपत्रक निघुन राज्यातील १५ बँकांना शासकीय व्यवहार करण्यास परवानगी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पण याच पत्रात जोपर्यंत बँक आणि शासन यांच्यात करार होत नाही, तोपर्यंत परवानगी नसल्याचेही स्पष्ट केले आहे. या संदर्भात स्वतंत्र आदेश काढले जाणार असल्याचेही परिपत्रकात म्हंटले होते.


adesh_1  H x W:
दरम्यान २४ रोजी शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानंतर समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी ना घेराव केला. परिणामी २६ ऑगस्ट ला सकाळी ११ वाजता राष्ट्रीयकृत बँकेतून वेतन करण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र अवघ्या ५ तासातच हे आदेश रद्द करण्यासाठी नवा आदेश काढून प्रभारी साहेबांनी त्यांच्यावर भारी दबाव असल्याचे दाखवून दिले. एकाच दिवशी दोन परस्पर विरोधी आदेश काढून शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण विभागाचे काम कसे इशाऱ्यावर आणि कुणाच्यातरी मर्जीने चालते हे दाखवून दिले आहे. आता इशारा आणि मर्जी कुणाची असे विचारलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आणि राज्यात असलेली सत्ता यांचा ताळमेळ बसवून पाहिल्यास आपसूकच लक्षात येईल. तसही शिक्षकांना शिकविण्यात जेवढा रस नाही, त्यापेक्षा अधिक राजकारणात असतो, हे लपलेलं नाही मग हे समजून त्याच्यासाठी कठीण काय?