कोरोनाचा उद्रेक! तब्बल ७५ हजार नव्या बाधितांची भर

    दिनांक :27-Aug-2020
|
नवी दिल्ली,
देशातील कोरोना रुग्णवाढीचा आलेख वाढतानाच दिसून येत आहे. दररोज ६० ते ७० ने वाढणारी रुग्णसंख्या आज ७५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या २४ तासात पहिल्यांदाच ७५ हजारांपेक्षाही अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नव्याने समोर आलेल्या या एकाच दिवसातील रुग्णवाढीने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. ही रुग्णवाढ सर्वांना धडकी भरणारी आहे.

corona_1  H x W
 
देशात गेल्या २४ तासात कोरोनाच्या ७५ हजार ७६० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, १ हजार २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील आढळून आलेली ही रुग्णवाढ आणि मृत्यूसंख्या आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ३३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या ३३ लाख १० हजार २३५ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे ६० हजार ४७२ रुग्णांचा बळी गेला आहे.
देशात कोरोनाबाधितांची वाढ होत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. देशात आतापर्यंत २५ लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात एकूण २५ लाख २३ हजार ७७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या ७ लाख २५ हजार ९९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
सध्या देशभरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याने कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात २६ ऑगस्टपर्यंत कोरोनाचे ३ कोटी ८५ लाख ७६ हजार ५१० नमूने तपासण्यात आले. यापैकी ९ लाख २४ हजार ९९८ नमून्यांची काल बुधवारी  चाचणी करण्यात आली.