ओला, उबर चालकांनी दिला संपाचा इशारा

    दिनांक :27-Aug-2020
|
नवी दिल्ली,
भाडेवाढ व कर्जावरील परतफेडीच्या स्थगितीला मुदत वाढ देणे यासारख्या विविध मागण्यांसाठी आगामी 1 सप्टेंबरपासून दिल्ली-एनसीएरमध्ये ओला व उबर वाहनचालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
 
ola-uber_1  H x 
 
जर शासनाने ओला, उबर वाहनचालकांच्या समस्येचे निवारण केले नाही, तर ओला-उबरचे सुमारे 2 लाख वाहनचालक संपात सहभागी होतील, असे दिल्लीच्या सर्वोदय वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष कमलजीत सिंग गिल यांनी म्हटले आहे. कर्जाच्या हप्ताफेडीच्या स्थगितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात यावी, भाडेवाढ करण्यात यावी, कॅबकडून मिळणार्‍या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, तसेच वाहनांविरुद्ध जारी करण्यात आलेल्या ई-चालान मागे घेण्यात यावे, अशा मागण्या ओला, उबर वाहनचालकांनी केल्या आहेत. कोरोना, टाळेबंदीमुळे आधीच ओला, उबरचे वाहनचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या कर्ज हप्तेफेडीला 31 ऑगस्टपर्यंतच स्थगिती देण्यात आलेली आहे. ही मुदत संपल्यावर बँक आपली वाहने जप्त करतील, अशी भीती वाहनचालकांना वाटत आहे. अनेक चालकांवर ई-चालानमुळे मोठ्या रक्कमेचा दंड भरायचा आहे.