वॉशिंग्टन,
चीनसारख्या विस्तारवादी आणि आक्रमक देशासोबत केवळ अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हेच टक्कर देऊ शकतात, असा विश्वास परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केला आहे. आभासी पद्धतीने जेरुसलेम येथे आयोजित केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.
कोरोनाच्या रूपातून जगाचे अस्तित्व मिटवणार्या तसेच अमेरिकेला आर्थिक पातळीवर उद्ध्वस्त करू पाहणार्या चीनला आता केवळ डोनाल्ड ट्रम्प हेच वठणीवर आणू शकतात. त्या देशाला न्यायाधिष्ठित पातळीवर शिक्षाही करू शकतात. इंडो-पॅसिफिक भागातही त्याची दादागिरी सुरू आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी जगात घडणार्या अनेक गोष्टींवर पुढाकार घेत चीनची आक्रमकता उघडी पाडली आहे. त्यामुळे अमेरिका सुरक्षित ठेवायची असेल तर ट्रम्प यांनाच निवडून द्यायला हवे, असे पॉम्पिओ म्हणाले. चीनबरोबरचा अन्यायकारक व्यापार करार रद्द करून चीनने अमेरिकी अर्थव्यवस्थेला पाडलेले भगदाड ट्रम्प यांनी बुजवल्याचेही ते म्हणाले.