पुलवामा आरोपपत्रावरून पाकिस्तानचा थयथयाट

    दिनांक :27-Aug-2020
|
इस्लामाबाद,
गत वर्षी 14 फेब्रुवारी जम्मू-काश्मिरातील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी 13 हजार 500 पानांचे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रामुळे पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला असून ते बचावासाठी बेताल विधाने करीत आहे.
 
pulwama_1  H x  
 
एनआयएने दाखल केलेले आरोपपत्र पाकिस्तानने फेटाळून लावले आहे. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानला विनाकारण अडकवण्याचा हा भारताचा प्रयत्न आहे. भारताकडून आम्ही ठोस पुरावे मागितले होते. मात्र, भारताने आम्हाला पुरावे दिले नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. या आरोपपत्रातून केवळ संकुचित राजकारण करायचे असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
 
 
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी याबाबतचे एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानला या हल्ल्यात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. भारतातील सत्ताधारी पक्ष- भारतीय जनता पार्टीला आपली पाकिस्तानविरोधी भूमिका व देशांतर्गत राजकीय फायदा करून घ्यायचा असल्यामुळे पुलवामाप्रकरणी खोटा आरोप केला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने सातत्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्याशिवाय योग्य माहितीच्या आधारे सहकार्य करण्याची तयारी पाकिस्तानने दर्शविली होती. मात्र, भारताने कोणतेही ठोस, विश्वसनीय पुरावे दिले नसल्याचे पाकिस्तानने म्हटले.
 
 
भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत पाकिस्तानने भारताचे दोन लढाऊ विमान पाडले व भारतीय वैमानिकाला अटक केली. दोन्ही देशांमध्ये शांतता राहावी यासाठी वैमानिकाला सोडण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला.
 
 
दरम्यान, जम्मूतील विशेष न्यायालयात एनआयएच्या पथकाने सुमारे 13 हजार पानी आरोपपत्र दाखल केले. एनआयएने पुलवामा हल्ल्यातील आत्मघातकी हल्लेखोराच्या अनेक साथीदारांना अटक केली होती. त्यांनी पाकिस्तानातील आपल्या म्होरक्यांच्या इशार्‍यावर हल्ला करणार्‍या दहशतवादी आदिल अहमद डार याला मदत केली होती. या हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्स पाकिस्तानहून काश्मीर खोर्‍यात आणले गेले होते, असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.
 
 
एनआयएने आरोपपत्रात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर व त्याचा भाऊ अब्दुल रऊफ असगर याला आरोपी बनवले आहे. याशिवाय ठार करण्यात आलेले दहशतवादी मोहम्मद उमर फारूख, आत्मघातकी हल्लेखार आदिल अहमद डार व पाकिस्तानातून सक्रिय असलेले इतर दहशतवादी कमांडरची नावेसुद्धा आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहेत.