पंतप्रधान नरेंद्र मोदींची चीनमध्ये लोकप्रियता

    दिनांक :27-Aug-2020
|
- दोन्ही देशांतील तणावानंतरही कायम
नवी दिल्ली,
चीन नागरिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिसून येत असल्याचे या देशाचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने आपल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. मागील काही महिन्यांपासून भारत आणि चीनमधील संबंधात दुरावा निर्माण झाल्यानंतरही ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.
 
pm modi_1  H x  
 
सर्वेक्षणानुसार 50 टक्के नागरिकांनी चीनच्या बाजूने मत नोंदवले, तर 50 टक्के नागरिकांनी मोदी सरकारचे कौतुक केल्याचे दिसून येते. 30 टक्के लोकांनी दोन्ही देशातील तणावाचे संबंध सुधारतील अशी आशा व्यक्त केली. या देशांच्या संबंधात सुधार झालाच तर तो काही काळापुरताच असेल, असे 9 टक्के लोकांनी म्हटले आहे. तसेच, 25 टक्के नागरिकांनी दोन्ही देशांतील संबंध जास्त काळापर्यंत मजबूत राहतील, असा दावा केला आहे.
 
 
चीनने 15 जूनच्या रात्री लडाख खोर्‍यात भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता. यात 20 जवान शहीद झाल्याने चीनविरोधात संतापाची लाट आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये घुसखोरी झाली नसल्याचे स्पष्ट करत भारतीय जवानांचा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच चर्चा झाली होती. दुसरीकडे भारताने चीनच्या अॅप्सवर बंदी घातली असून, देशातील नागरिकांनीही चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. याशिवाय अनेक राज्यातील प्रकल्प रद्द करण्यात आले. भारताच्या या जोरदार आक्रमकतेमुळे तेथील बाजारपेठांवर मोठा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.