वाचन संस्कृती आणि स्त्रिया

    दिनांक :27-Aug-2020
|
सध्याचे युग हे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर चालणारे आहे. कुणालाही कुठलीही माहिती हवी असली की इंटरनेट सुरू करा की माहिती तयार. यामुळे सर्वांमध्येच वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी प्रत्येक छोट्या छोट्या नगरांमध्ये वाचनालये असायची. लहान मुले, स्त्रिया, वृद्ध व्यक्ती त्या वाचनालयात जायचे आणि हवी ती पुस्तके घेऊन वाचायचे. हळूहळू टीव्ही आला, चालते बोलते मनोरंजन घरात आल्याने घरातल्यांशी संवाद संपला. त्यापाठोपाठ कॉम्प्युटर आले, लॅपटॉप आले, आता तर फोनच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात जग आल्यासारखे झाले आहे. यामुळे ज्ञानात जरूर भर पडली आहे, परंतु ते व्यक्त करता येत नाही.
 
books_1  H x W: 
 
लहानपणी घराघरात आजी छानछान गोष्टी सांगायची. मुलांना त्याची आवड निर्माण झाल्याने ती आपणहून पुस्तक आणून वाचायची. आता एकत्र कुटुंबपद्धती जवळजवळ संपल्याने मुले असो की स्त्रिया एकतर टीव्हीसमोर दिसतात, नाहीतर कॉम्प्युटर किंवा फोनमध्ये गुंतलेले असतात.
 
 
वाचनाच्या बाबतीत स्त्रियांचा वयोगटानुसार विचार करावा लागेल. लहान मुलींना शाळेच्या ग्रंथालयांमधून निरनिराळ्या विषयांवरील त्यांच्या आवडीची पुस्तके मिळू शकतात. कॉलेजला जाणार्‍या मुलींचा विचार केला तर त्यांचा कल करीअरकडे जास्त असतो. त्यामुळे त्यांना त्याप्रकारे साहित्य वाचायला आवडते. विशेषतः वर्तमानपत्र वाचण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. कारण त्यात ताज्या घडामोडींची माहिती मिळते.
 
 
मध्यमवयीन स्त्रिया या नोकरी करणार्‍या असोत वा गृहिणी त्या आपल्या विश्वात रमणार्‍या असतात. गृहिणी घरातील जबाबदार्‍या पार पाडताना वाचनाबाबत मात्र ती उदासीन असतात. फारच फार घरी येणारे वर्तमानपत्र दुपारच्यावेळी थोडा वेळ चाळणे एवढेच त्या करतात. अशा फार मोजक्या स्त्रिया असतील ज्या घर सांभाळूनही आपली वाचनाची आवड जपतात. नोकरी करणार्‍या स्त्रियांचे तर विचारायलाच नको. घर आणि ऑफिस सांभाळताना त्यांना प्रचंड कसरत करावी लागते. स्वतःच्या आवडीचे पुस्तक वाचायला वेगळा वेळ काढणे त्यांच्याकरिता कठीणच. खरे तर याच वर्गातील स्त्रियांना वाचनाची जास्त गरज असते. कारण वाचनातून त्यांना जे ज्ञान मिळू शकते ते कशातूनही मिळत नाही. मग अशा स्त्रिया साधारणतः पुरवण्या किंवा त्यातील महिलांची सदरं याचे वाचन करताना दिसतात.
 
 
आपल्या समाजात जसे महिलांना कर्तव्याच्या आणि जबाबदारीच्या एका चौकटीत बांधले आहे, तसेच वाचनाच्या बाबतीतही झाले आहे. एखादे पुस्तक खास महिलांसाठी, महिलांसाठीच्या पुरवण्या, रेसिपी बुक खास महिलांसाठी; असे का? महिलांचे क्षेत्र असे मर्यादित का? पुस्तकांच्या बाबतीत असेच झाले आहे. याच कारणाने महिलांसाठी गृहशोभिकासारखी मासिके निघाली, साप्ताहिकं आली, जी घर आणि त्याच्याभोवतीच फिरणारी असतात. तत्वज्ञान, अध्यात्म यासारखे विषय स्त्री समजू शकणार नाही असे नाही.
 
 
साधारणपणे त्यातही प्राध्यापिका किंवा आयटी क्षेत्रात काम करणार्‍या स्त्रिया किंवा तरुणी यांच्या आवडीचे विषय वेगळे असतात. त्या चौफेर वाचन करतात. म्हणूनच अनेक कार्यक्रमात त्या भाषण वगैरे करताना दिसतात. त्यांना सन्मानाचे स्थान मिळते. मध्यमवर्गीय स्त्री ही गृहिणी, नोकरपेशा स्त्री महिलाविषयक पुरवण्या आणि मासिकं वाचणारी असा ढाचा तयार झाला आहे. यात महिलांविषयी लिहिले आहे तेव्हा ही पुरवणी आई, बहीण, बायको यांच्याकरिता बाजूला काढून ठेवली जाते. असे न होता संबंधित व्यक्तींनी त्यांना चौफेर वाचनाकरिता प्रोत्साहित करायला हवे. आज कादंबरी, कथा लिहिणार्‍या महिला लेखिका भरपूर आहेत. महिला लेखिकांची नवीन पिढी खूप समृद्ध लेखन करीत आहे. वाचनाने विचार प्रगल्भ होतात. आयुष्याला दिशा मिळते.
 
 
महिलांनी वाचनाच्या बाबतीत स्वतःला मर्यादा आखू नये. स्वैर वाचन करायला हवे आणि ही जबाबदारी घरातील मध्यमवयीन महिलांची आहे. घरातील नवीन पिढीला वेगवेगळ्या विषयांवर वाचन करायला लावायला हवे. किंवहुना ते साहित्य तिने आपणहून वाचावं अशी स्थिती निर्माण व्हायला हवी. जेणेकरून नवीन पिढी निरनिराळ्या विषयांचे चांगले ज्ञान असणारी आणि समृद्ध घडेल.
मीरा टोळे
९२२५२३३२६३