पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानी बँक खात्यात 10 लाख रुपये

    दिनांक :27-Aug-2020
|
- आरोपपत्रात ‘एनआयए’ची माहिती
नवी दिल्ली,
पुलवामात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला घडवण्यासाठी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा भाचा मोहम्मद उमर फारूकच्या पाकिस्तानातील बँक खात्यात 10 लाख रुपये वळते करण्यात आले होते, असे राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात्‌ एनआयएने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
 
pulwama_1  H x  
 
अलाइड आणि मेझान या दोन पाकिस्तानी बँकांत फारूकची तीन खाती होती. पुलवामा हल्ल्यापूर्वी या खात्यांत पाकिस्तानी चलनातील 10 लाख रुपये वळते करण्यात आले होते. फारूक हा पुलवामा हल्ल्यातील मुख्य आरोपी असून, एका चकमकीत त्याचा खात्मा झाला आहे. जैशच्या मोठ्या अतिरेक्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी 2019 या कालावधीत त्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
 
अतिरेक्यांनी या रकमेपैकी 6 लाख रुपये हल्ल्यात वापरण्यात आलेली स्फोटके आणि वाहन खरेदीसाठी वापरले, असे राष्ट्रीय तपास संस्थेने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. यापैकी 2.80 लाख रुपये अमोनियम नायट्रेटसह इतर स्फोटकांच्या खरेदीसाठी वापरण्यात आले. खरेदी केलेली 200 किलो स्फोटके अधिक घातक करण्यासाठी पाकिस्तानातून तस्करी करून आरडीएक्स आणले गेले. जिलेटिनच्या कांड्या मुदसिर अहमदने खरेदी केल्या होत्या, तर वाझी उल्‌ इस्लामने अॅमेझॉनवरून 4 किलो अॅल्युमिनियम पाऊडर घेतली, तर इतर ठिकाणावरून कॅल्शियम अमोनियम नायट्रेट विकत घेतले. 160 किलो आणि 40 किलोच्या दोन ड्रममध्ये ठासून भरलेल्या स्फोटके इको कारमध्ये ठेवण्यात आले. या दोन्ही ड्रममध्ये आयईडी होते, असेही एनआयएने म्हटले आहे. आयईडी तयार करण्यासाठी आरडीएक्स, जिलेटिनच्या कांड्या, अॅल्युमिनियम पाऊडर आणि कॅल्शियम अमोनियम नायट्रेट शेख बाशिरकडे ठेवण्यात आले होते.
 
 
अतिरेक्यांनी वाहन विकत घेण्यासाठी आणि स्फोट घडवून आणण्याकरिता वाहनात फेरबदल घडवण्यासाठी अतिरेक्यांनी 2.5 लाख रुपये खर्च केले. हे वाहन शेख बाशिरकडे ठेवण्यात आले होते, असेही एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.