मुहर्रमची मिरवणूक काढण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

    दिनांक :27-Aug-2020
|
नवी दिल्ली,
देशभरातून मुहर्रमची मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी नकार दिला आहे. ही याचिका तुम्ही अलाहबाद उच्च न्यायालयात दाखल करा, असेही सर्वोच्च न्यायालयाने लखनौ येथील याचिकाकर्त्याला सांगितले.
 
court_1  H x W: 
 
संपूर्ण देशासाठी एक सर्वसाधारण आदेश देणे शक्य नसल्याचे देखील न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. असा आदेश दिल्यास अनागोंदी वाढेल आणि एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जाईल, असेही सरन्यायाधीश शरद बोबडे प्रमुख असलेल्या आणि न्या. ए. एस. बोपन्ना व न्या. व्ही. रामसुब्रमण्यम्‌ यांचाही समावेश असलेल्या न्यायासनाने स्पष्ट केले.
 
 
मुहर्रमच्या मिरवणुकीसाठी सर्वसाधारण आदेश देण्यात यावा, अशी मागणी तुम्ही करीत आहात. आम्ही यावर आदेश दिल्यास अनागोंदी वाढेल. कोरोनाचा संसर्ग वाढवण्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप करीत एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जाईल. तसे काही व्हावे ही आमची इच्छा नाही. न्यायालय म्हणून आम्ही नागरिकांच्या आरोग्याबाबतचा धोका घेऊ शकत नाही, असे न्यायासनाने आभासी स्वरूपात झालेल्या बैठकीवेळी सांगितले.
 
 
ही याचिका मागे घेण्याची परवानगी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिली तसेच लखनौमध्ये मर्यादित स्वरूपात मिरवणूक काढण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी अलाहबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे स्वातंत्र्य याचिकाकर्त्याला दिले. शिया समाजाते नेत सईद काल्बे जावाद यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करीत होते.