बीजिंग,
अल्पावधीत जगभर लोकप्रिय झालेल्या टिकटॉक या चीनच्या ॲपवर भारतासह इतर देशांतही बंदी घातल्यानंतर आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
तीन महिन्यांपूर्वीच मेयर यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. गत मे महिन्यात मेयर डिझनी स्ट्रीमिंगच्या प्रमुखपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी 1 जून रोजी बाईटडान्सच्या मालकीच्या टिकटॉक ॲपच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. सध्या टिकटॉकचे महाव्यवस्थापक वनीसा पपाज यांची हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
टिकटॉकला खरेदी करण्यासंदर्भात सध्या बाईटडान्सची मायक्रोसॉफ्टसोबत चर्चा सुरू आहे. इतकेच नव्हे, तर अमेरिकन कंपनी ओरॅकल, टिकटॉक विकत घेण्यात स्वारस्य दाखवत असल्याचे समजते. अमेरिकेतील ट्रम्प सरकारने टिकटॉक विकण्याबाबत चीनला मुदत दिली आहे.