अमेरिकेची आणखी 24 चिनी कंपन्यांवर बंदी

    दिनांक :27-Aug-2020
|
वॉशिंग्टन,
चिनी विषाणू कोरोना आणि विस्तारवादी धोरण यामुळे चीन आणि अमेरिकेतील वाद-तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महामारी आणि व्यापार करार या मुद्यांवर दोन्ही देशांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर आता दक्षिण चीन समुद्र, हाँगकाँग आणि तैवानच्या मुद्यावर दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. चिनी ॲपवर बंदी आणल्यानंतर आता अमेरिकेने आणखी 24 चिनी कंपन्यांवर बंदी आणली आहे. या कंपन्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला मदत करत असल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला आहे. या 24 कंपन्यांना आता अमेरिकेत व्यवसाय करता येणार नाही. त्याशिवाय या कंपनीशी निगडीत लोकांचीही चौकशी करण्यात येणार आहे.
 
donald trump_1  
 
या कंपन्यांकडून दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेट बनवण्यात येत असून चिनी लष्करासाठी तळ उभारत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. आंतरराष्ट्रीय समुद्र हद्दीत कृत्रिम बेटांच्या निर्मितीच्या मुद्यावर चीनवर अनेकदा टीका करण्यात आली आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय समुद्रवादातील लवादाने चीनविरोधात निकाल दिला होता.
 
 
‘सुबी रीफ स्पार्टले’ हा बेट समूहांचा भाग असून यावर चीनचे नियंत्रण आहे. त्याशिवाय व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि तैवानही सुबी रीफवर आपला दावा सांगत आहे. चीनने आता दक्षिण चीन समुद्रात अनेक कृत्रिम बेट तयार केले आहेत. त्याशिवाय या भागात चीनने मोठ्या प्रमाणावर युद्धनौका, लढाऊ विमाने आणि शस्त्रे तैनात केली आहेत. पीपल्स डेलीने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीनुसार चिनी लढाऊ विमान एका अज्ञात लढाऊ विमानाचा पाठलाग करत असून त्याला आपल्या हद्दीतून माघारी जाण्यास सांगत आहेत. तसे न केल्यास विमान पाडण्याचाही इशारा देण्यात आल्याचे चित्रफितीत दिसत आहे.
 
 
दक्षिण चीन समुद्राच्या 90 टक्के भागांवर चीन आपला दावा सांगत आहे. या समुद्राच्या हद्दीच्या मुद्यावर मलेशिया, फिलिपाईन्स, ब्रुनेई, व्हिएतनाम या देशांसोबत वाद आहे. तर, पूर्व चीन समुद्रातील बेटांवर चीन आपला हक्क सांगत आहे. हे बेट जपानच्या ताब्यात आहे. अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा दावा फेटाळून लावला आहे. दक्षिण चीन समुद्र सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. या भागातून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक होते. त्याशिवाय या ठिकाणी नैसर्गिक संपत्ती असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळेच चीनला या भागावर आपले वर्चस्व निर्माण करायचे आहे.