अमेरिका-रशियाच्या लष्करात सीरियामध्ये संघर्ष

    दिनांक :27-Aug-2020
|
- चार जखमी
दमास्कस,
जगातील दोन शक्तिशाली देश असलेल्या रशिया आणि अमेरिकेच्या लष्करात सीरियात तीव्र संघर्ष झाल्याचे समोर आले आहे. या संघर्षात चार सैनिक जखमी झाले आहेत.
 
us russia_1  H  
 
रशियन सैन्याच्या एका गटाच्या लष्करी वाहनाने अमेरिकेच्या लष्करी वाहनाला धडक दिली. त्यानंतर दोन्ही सैन्यांमध्ये हाणामारी झाली असल्याचे वृत्त आहे. यात चार जण जखमी झाले आहेत. अमेरिकन सैन्यासोबत हाणामारी सुरू असताना रशियाने आपल्या हेलिकॉप्टरचाही वापर केला असल्याचे एका चित्रफितीत समोर आले आहे.
 
 
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांनी सांगितले की, उत्तर पूर्व सीरियात अमेरिकन आणि रशियन सैन्य समोरासमोर आले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यातच रशियन लष्करी वाहनाने अमेरिकेच्या लष्करी वाहनाला धडक दिली. यामध्ये काही सैनिक जखमी झाले. तणाव कमी होण्यासाठी त्या भागातून अमेरिकन सैन्याने माघार घेतली असल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले.
 
 
अमेरिका आणि रशियातील संघर्ष रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांचे रशियाने उल्लंघन केले असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. आम्हाला तणाव वाढविण्याची इच्छा नाही. मात्र, कोणत्याही आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज असल्याचेही अमेरिकेने म्हटले.
 
 
अमेरिका-रशियाच्या सैन्यात जोरदार हाणामारी झाल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेच्या लष्करी वाहनाने लष्करी वाहनासह येणार्‍या रशियाच्या गस्ती पथकाला अडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे चित्रफितीत दिसत आहे. अमेरिकन सैन्याची पर्वा न करता रशियन सैन्य पुढे जात होते. त्या दरम्यान एका अमेरिकन लष्करी वाहनाला रशियन लष्करी वाहनाने धडक दिली. अमेरिकन सैनिकांना पळवून लावण्यासाठी रशियाचे हेलिकॉप्टरही घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
 
 
अमेरिका व रशियन सैन्यामध्ये सीरियात हाणामारी, संघर्ष कायमच होत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, आताची ही घटना अतिशय गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकन सैन्यासोबत नेहमीच सीरिया डेमोक्रेटिक फोर्सेसचे जवान असतात.
 
 
दरम्यान, बेलारूसमध्ये एकीकडे नागरिकांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे रशिया आणि नाटो दरम्यान तणाव वाढत चालला आहे. रशियाने बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांना पािंठबा दिला आहे. तर, दुसरीकडे नाटो देशांकडून त्यांना विरोध सुरू आहे. जवळपास 26 वर्ष सत्तेवर असलेल्या लुकाशेन्को यांना नाटो देश सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे रशिया आणि नाटो देशांमध्येही तणाव वाढत आहे. या वाढत्या तणावाच्या पृष्ठभूमीवर अमेरिकेने आता आपली सहा बी-52 क्षेपणास्त्र डागणारी लढाऊ विमाने पाठवली आहेत.