त्या बड्या बंडवाल्यात, ज्ञानेश्वर माने पहिला!

    दिनांक :09-Aug-2020
|
- प्रकाश एदलाबादकर
श्रावण महिन्यातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे जन्माष्टमी. भारतीय संस्कृतीची एक आधारशिला असलेल्या पूर्णपुरुष भगवान श्रीकृष्णाचा अवतरणदिन; तसेच ‘अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके मेळवीन।।’’ अशी प्रतिज्ञा करणार्‍या ज्ञानदेवांचाही जन्मदिन! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या प्रवाहात विश्ववात्सल्य आणि कारुण्य यांचा स्फटिक निर्झर ओघवता करणार्‍या संतप्रवर श्रीज्ञानेश्वर महाराजांचा जन्मदिन. माउलीच्या जन्मापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या लोकमातांमधून कितीतरी पाणी वाहून गेलेले आहे. ‘दगडांच्या आणि बकुळफुलांच्या’ या महाराष्ट्रात आजपर्यंत कितीतरी समाजसेवक, विचारवंत, सेवाव्रती, सारस्वतकार, सत्ताधारी आले आणि गेले. कितीतरी नवीन बाबी उदयाला आल्या आणि लयालाही गेल्या. परंतु, श्रीज्ञानेश्वर नावाच्या, बाराव्या शतकातील महामानवाची नाममुद्रा अवघ्या मराठी जनमानसावर एखाद्या तप्त मुद्रेसारखी सुप्रतिष्ठित झालेली आहे. हिंदुधर्म हा गतानुगतिक, अपरिवर्तनीय आणि सनातन आहे, अशी सातत्याने टीका करणार्‍या मंडळींनी हे लक्षात घेतले पाहिजे की, गेल्या हजारो वर्षांत हिंदुधर्मात कितीतरी रचनात्मक परिवर्तने झालेली आहेत, पुढेही होतील. विश्वबंधुत्व, समता, करुणा, सर्वांभूती प्रेम, कर्मकांडाचे स्तोम कमी करणे, मानवजातीतील सुसंवाद वाढणे यासाठी महाराष्ट्रातील संतांची वाणी, लेखणी आणि करणी आजपर्यंत साह्यभूत ठरली आहे आणि पुढेही ठरेल. या सर्वात ज्ञानदेवांचे मोठेपण यातच आहे की, बदलत्या काळाची पावले, त्यांचा पदरव आणि त्यातून ध्वनित होणारे, प्रतीत होणारे नवकाळाचे स्पंदन त्यांनी सर्वप्रथम जाणले. धर्माच्या सश्रद्ध लोकाभिमुखतेची जाण ज्ञानदेवांना सर्वप्रथम आली. समाजाच्या सर्वच थरातील व्यक्ती एकत्र येतील, तर अवघे विश्व मांगल्याने भरून टाकण्याची शक्ती त्यातून प्रस्फुटित होईल, हे द्रष्टेपण त्यांच्याजवळ होते.
 

shrikrishna_1   
 
प्रत्येक युगातील प्रश्न नवे असतात. काही प्रश्न यदृच्छेने निर्माण होतात, तर काही मानवनिर्मित असतात. त्या प्रश्नांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य या समाजात उत्पन्न व्हावे यासाठी प्रबोधन आवश्यक आहे, याची ज्ञानदेवांना व्याकुळ जाणीव होती. परंतु, प्रज्ञावंत प्रबोधक आणि अज्ञ सामान्यजन यांच्यात प्रचंड अंतर होते. ते अंतर माउलीने तोडले. सामान्य माणसाच्या हृदयात अढळ स्थान मिळविले. हरिपाठाचे निमित्ताने भक्तसंवाद, ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने लोकसंवाद, चांगदेवपासष्टीच्या निमित्ताने मित्रसंवाद आणि अमृतानुभवाच्या निमित्ताने आत्मसंवाद साधणार्‍या या लोकोत्तर विभूतीने हे सर्व कसे साधले असेल, हा विचार जेव्हा जेव्हा मनात येतो तेव्हा तेव्हा हात जोडून नतमस्तक होण्यापलीकडे आपण काय करू शकतो?
 
 
dnyaneshwar_1  
 
समाजामध्ये ज्यांना एखादा नवीन विचार पेरायचा असेल, त्यांनी प्रत्यक्ष लोकसंपर्क साधला पाहिजे. लोकांत मिसळले पाहिजे. समाजपुरुषाचा भाव, त्याच्या श्रद्धा, विश्वास, चालीरीती आपल्या मानल्या पाहिजेत. सामान्य लोकांपुढे पढीक पांडित्य, तर्ककठोर विचार, कोरडा बुद्धिवाद टिकत नसतो. उलट अशी माणसे समाजापासून दुरावतात. सामान्य माणसासाठी ज्ञानाची कवाडे कायमची बंद करून टाकणारे तत्कालीन धर्ममार्तंड आणि आजचे तर्ककठोर बुद्धिवादी विचारवंत यांचे समाजापासूनचे अंतर तुटायला हवे. विचारवंतांनी सांगितलेले विचार श्रद्धावंतांना पटायला हवे. समाजाला हे बळ सर्वप्रथम ज्ञानदेवांनी दिले म्हणून ते क्रांतिकारी!
 
हृदया हृदय एक जाले। ये हृदयीचे ते हृदयी घातले।
द्वैत न मोडता ऐसे केले। आपणा ऐसे अर्जुना।।
आपली उपनिषदे म्हणजे विचारांची गगनस्पर्शी शिखरे आहेत. या उपनिषदांचे सार म्हणजेच भगवद्गीता! सकल हिंदू समाजाला भगवंताने दिलेले पाथेय. या ग्रंथराज गीतेच्या आधारे समाजाचे प्रबोधन केल्यास ते व्यक्ती-व्यक्तीपर्यंत पोचेल, अशी कल्पना ज्या क्षणी त्या ज्ञानियांचा राजाच्या मनात आली असेल, तो क्षण मानवजातीच्या कल्याणाच्या सूत्रपाताचा मुहूर्त असावा. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका आहे. माउलीने ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने ही एक स्वतंत्र ग्रंथनिर्मितीच केलेली आहे. काही दिवसांपूर्वी एक जुने कवितांचे पुस्तक सहजच चाळत होतो. आम्हाला अकराव्या वर्गात अभ्यासाला असलेली एक कविता या संग्रहात होती. ती वाचत असताना शाळेच्या आठवणीत मन रमून गेले. शालेय वयात कविता वाचायची म्हणजे परीक्षेत प्रश्न सोडवण्यासाठी. जास्तीत जास्त त्या कवितेचे रसग्रहण करायला वाचायची. त्या कवितेचा आशय, त्यातील प्रतीके, कवितेचा परिणाम या गोष्टींचा विचार करण्याचे ते वयही नसते. परंतु, तीच कविता िंकवा कविताच कशाला, कोणतीही कलाकृती वाढत्या वयात वेगळाच आशय घेऊन समोर येते. डोळ्यांसमोर होती कवी बी यांची ‘तेजाचे तारे तुटले’ ही कविता!
तेजाचे तारे तुटले
मग मळेंची सगळे पिकले
लागती दुहीच्या आगी राष्ट्राच्या संसाराला
अति महामूर पूर येतो ढोंग्यांच्या पावित्र्याला
खडबडाट उडवी जेव्हा
कोरड्या विधींचा मेळा
चरकात मान्यवर पिळती
सामान्य मुकी जनता ती
लटक्याला मोले येती
कौटिल्य स्वैर बोकाळे
तेजाचे तारे तुटले...
कविता वाचता वाचता लक्षात आले की, आजतरी काय वेगळी परिस्थिती आहे? ढोंग्यांच्या पावित्र्याला खरेच पूर नाही का आला आजही? सामान्य मुक्या जनतेचे हाल आजही तेच आहेत, जे कवी बींच्या काळी होते. कविता वाचता वाचता एका कडव्याने मला प्रचंड अस्वस्थ केले. या सर्व अंधाधुंदीच्या विरोधात पहिली क्रांती कुणी केली असेल तर ती ज्ञानेश्वरांनी, असे कवीचे सांगणे आहे. एरवी आपण ज्यांना करुणासागर किंवा शांतिब्रह्म म्हणतो, त्या ज्ञानदेवांना कवीने चक्क बंडखोर म्हटलेले आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेच्या विरोधात माउलींनी बंड केले, क्रांती केली. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात ज्या ज्या काळात ज्यांनी ज्यांनी म्हणून बंड केले, क्रांती केली त्या सर्वात ज्ञानेश्वर हे पहिल्या क्रमांकाचे बंडवाले आहेत, असे कवी बी यांचे म्हणणे आहे. कवी बी लिहितात-
 

त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला
मोठ्यांच्या सिद्धांतांचा घेतला पुरा पडताळा
डांगोरा फोलकटांचा पिटविला अलम दुनियेला
झुंजोनी देवा दैत्या
अमृतामधीं न्हाणी जनता
उजळिला मराठी माथा
सत्तेचे प्रत्यय आले तेजाचे तारे तुटले...
 
ज्ञानदेवांच्या काळात कर्मकांडाचे स्तोम प्रचंड बोकाळले होते. बोपदेव, हेमाद्री यांच्या ग्रंथांनी, विशेषतः चतुर्वर्ग चिंतामणीसारख्या  ग्रंथांनी समाजात विषमतेचे विष पसरलेले होते. वर्ण- वर्गांमधील भेदभाव पराकोटीला पोचलेला होता. सर्वसामान्य प्रापंचिक जनता यापायी त्रासून गेली होती. केवळ जनताच नव्हे, तर प्रत्यक्ष ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे यांनाही या व्यवस्थेचे चटके सहन करावे लागले. विठ्‌ठलपंत आणि रुक्मिणी यांचे देहविसर्जन, या भावंडांच्या अन्नात माती कालवणे, त्यांना वाळीत टाकणे, मौंजीची विनंती नाकारणे, या मुलांना ‘संन्याशाची पोरे’ म्हणून हिणविणे... हा सर्व छळ त्यांनी सहन केला. त्याविरुद्धची चीड आणि संताप माउलीच्या मनात नसेलच कशावरून? तो होताच, कारण त्यांच्या अन्नात माती कालवल्यामुळे ते संतापून झोपडीत येऊन बसले आणि मुक्ताईने त्यांची समजूत घातल्याचा प्रसंग सर्वांना ठाऊकच आहे. आणि याच प्रसंगात बंडाची ऊर्मी म्हणा िंकवा क्रांतीची ज्योत म्हणा, माउलींच्या मनात पेटली असावी. मुक्ताईच्या ताटीच्या अभंगांनी माउलीला एक नवा संदेश दिला, अनुभव दिला- आपण साधू झालो म्हणून दुसर्‍यांना कमी लेखू नका. उलट त्यांनाही आपल्यासारखे करा.
 

योगी पावन मनाचा। साहे अपराध जनाचा
विश्व रागे झाले वह्नी। संती सुखे व्हावे पाणी
शब्दशस्त्र झाले क्लेश। संती मानावा उपदेश
विश्वपट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा
तुम्ही तरुनि विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।
 
‘कर्मकांड आणि मिथ्या व्यवहार यामुळे ज्यांनी तुझा छळ केला त्यांनाच तुला उपदेश करायचा आहे. तूही तरून जा आणि त्यांनाही तारून ने.’ हेच ते बंडखोरीचे बीज. समाजाला धर्मग्लानी आलेली आहे. शब्दशूरांचे अकर्मण्यत्व वाढलेले आहे. कर्तव्यकर्माचा विसर पडून समाज कर्मकांडशरण झाला आहे. समाजात सकाम भक्तीचे प्राबल्य वाढलेले आहे. ढोंग आणि पाखंड यांची चलती आहे. हे सर्व माउलीच्या लक्षात आले होते. राष्ट्रीय चारित्र्याचा लोप होत असून सर्व समाज व्यक्तिकेंद्री झाला आहे, समाजमनाला योग्य वळण लावणारे नेतृत्व नाही, हे त्या द्रष्ट्या संतांच्या लक्षात आले. उत्तर भारतात त्या वेळी फोफावलेले परकीयांचे आक्रमण आज ना उद्या दक्षिणेत आल्यावाचून राहणार नाही, हे त्या क्रांतदर्शी व्यक्तिमत्त्वाने हेरले असले पाहिजे आणि म्हणूनच सामान्य जनतेला या कर्मकांडापासून दूर नेऊन शुद्ध अध्यात्माची शिकवण दिली पाहिजे, हे ज्ञानदेवांनी ताडले. मने तयार झाली की मनगटे आपोआपच तयार होतात. या सर्व परिस्थितीवर मात करण्याचा संकल्प म्हणजे क्रांती. क्रांती म्हणजे काही लाठ्या, काठ्या, तलवारी, बंदुका, रक्ताचे पाट नव्हे. माउलीने क्रांती केली ती वैचारिक क्रांती! बंड केले ते बुरसटलेल्या विचारांविरुद्ध, निरर्थक कर्मकांडाविरुद्ध!! समाजचारित्र्याची जर उत्तम जडणघडण करायची असेल, तर एक अविनाशी व अक्षय विचारधन समाजाला दिले पाहिजे, हे माउलीस जाणवले होते. हे प्रबोधन केवळ गीतेच्याच आधारे होऊ शकते, ही त्यांना जाणीव होती. पूर्वसुरींच्या ग्रंथांचा आणि विचारांचा त्यांनी धांडोळा घेतला होता. त्यातील कालबाह्य विचार त्यांनी दूर सारले आणि कालानुरूप विचार स्वीकारले. ‘भाष्यकाराते वाट पुसतु...’ असे ते जे म्हणतात, त्याचा हा अर्थ! यालाच कवी बी मोठ्यांच्या सिद्धांताचा धांडोळा म्हणतात आणि त्यातील फोलकटे म्हणजे त्याज्य विचार असतात. भक्ती आणि साधना यासोबतच ज्ञानदेवांनी कर्तव्यपरायणता, समता, बंधुता यांची बीजे समाजात पेरली. दंभाचारी आणि ढोंगी पाखंड्यांचे बुरखे त्यांनी फाडले. परंतु, हे करताना कुठेही आक्रस्ताळेपणा केला नाही. ज्या समाजाने त्यांचा छळ केला त्याच्याविरुद्ध संताप नाही. आपल्या वाट्याला आलेले दुःख कुणाच्या वाट्याला येऊ नये, हाच करुणाजन्य विचार. ‘जे जे भेटे भूत, तया मानिजे भगवंत’ हे समाजजीवन जगण्याचे मूळ सूत्र त्यांनी दिले. म्हणूनच ज्ञानेश्वरांच्या क्रांतिकार्याचा िंकवा बंडखोरीचा मूळ पायाभूत विचार जर कोणता असेल, तर तो आहे करुणा! या करुणेपोटीच त्यांनी पसायदानात विश्वात्मक देवाला हाक मारलेली आहे. असा वैश्विक विचार प्रथमतः मांडण्याची बंडखोरी माउलीने केली.
 
 
केवळ विद्वान आणि अभ्यासक यांनाच तोषवेल असे पांडित्यपूर्ण ग्रंथलेखन करावे, असे माउलीच्या मनात कधीच नव्हते. गीतेसारख्या ग्रंथावर आपल्या पूर्वी ज्यांनी भाष्ये केली त्यांच्यावर कुरघोडी करावी, असाही त्यांचा हेतू नव्हता. जनसामान्यांच्या विषयी असलेल्या करुणेतून त्यांनी हे लेखन केले. म्हणूनच सर्वसामान्य माणसाला पचेल आणि रुचेल अशा भाषेत त्यांनी ग्रंथरचना केली. तत्त्वज्ञानाच्या अत्यंत सखोल आणि गहन चर्चेत न शिरता त्यांनी, ही तत्त्वे आचरणात आणण्यावर भर दिला. गीतातत्त्वाची चर्चा तर्ककर्कश पातळीवर न करता अनुभवाच्या पातळीवर केली. त्या काळातील सामान्य माणूस त्यांच्या पुढे होता. त्याने आपले सांगणे ऐकावे, हीच त्यांची इच्छा होती. ऐन युद्धापूर्वी कुरुक्षेत्रावर भगवंताने अर्जुनाला अठरा अध्यायांची गीता सांगितली, कशाला? त्यामागे बीज विचार काय होता, हे समजायला अर्जुनाच्या तोंडी असलेला अठराव्या अध्यायातील एक श्लोक पुरेसा आहे. तो असा-
 
‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।
स्थितोस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव।।’
 
‘‘माझा मोह नष्ट झाला आणि माझे खरे स्वरूप मला कळले आणि मी संशयरहित झालो.’’ या अर्जुनाच्या उद्गारांनी आकलन होते की, कशासाठी गीता सांगितली. आपल्यालाही सर्वप्रसंगी हेच आचरावे लागते. कारण प्रपंचात अनेकदा आपला ‘अर्जुन’ होतो. अर्जुनाने गीता नुसती ऐकली नाही, ती श्रवण केली होती. अर्जुन हा श्रेष्ठ श्रोता होता. म्हणूनच, ‘‘जे अर्जुनाच्या पंक्तीला बसायला योग्य आहेत, अशांनी अवधान द्यावे,’’ असे माउली म्हणते. श्रवणात कुठलेली व्यवधान नको असते, तरच अवधान जागृत राहते. श्रोत्यांनी सतत सावधचित्त असावे, यासाठी योगिराज ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत अनेकदा श्रोत्यांची, अत्यंत हळुवार शब्दांत विनवणी केलेली आहे. आपण कोण आहोत, आपले कर्तव्य काय, याची जाणीव करून दिली. पहिल्याच अध्यायात ते म्हणतात-
 

‘जैसे शारदेचिये चंद्रकळे। माजीं अमृतकण कोवळें।
तें वेचिती मने मवाळे। चकोर तलगे।।
तियापरी श्रोता। अनुभवावी हे कथा।
अतिहळुवारपण चित्ता। आणुनिया।।’
 
शरदाच्या चांदण्यात चकोराची पिले अत्यंत हळुवारपणे कोवळे अमृतकण वेचतात, ते हळुवारपण आपल्या मनात साठवून ही कथा श्रवण करा असे न सांगता माउली, ‘अनुभवावी’ म्हणतात. ज्ञानदेवांनी श्रोत्यांना परमेश्वरस्वरूप समजून अतिशय लडिवाळपणाने त्यांना वारंवार विनंती केली आहे. तसे श्रोतेही त्यांना त्या काळी मिळाले. त्यांच्यासारखा वक्ता आणि समोर श्रद्धाळू श्रोता तो अनुभवच अनुपम असेल.
 
‘तरी अवधान एकवेळे दीजे। मग सर्व सुखासी पात्र होईजे।
हे प्रतिज्ञोत्तर माझे। उघड ऐका।।
परी प्रौढी न बोले हो जी। तुम्हा सर्वज्ञांचा समाजी।
देयावे अवधान हे माझी। विनवणी सलगीची।।’
मी सांगत असताना तुम्ही पूर्णरूपेण श्रवण करा, अशी ते वारंवार विनंती करतात. ‘प्रभू तुम्ही महेशाचीये मूर्ती,’ असा सन्मान ते श्रोत्यांना देतात. आपल्या सभोवतालचा समाज हा अशिक्षित असला तरी तो श्रद्धाळू आहे, हे त्यांना ठाऊक होते. संभ्रमावस्थेत असलेल्या सामान्य माणसाला आध्यात्मिक आधार देऊन, समाजाला योग्य दिशा दाखवली, तर समाजात परिवर्तन घडेल, ही त्यांची पक्की खात्री होती. ते करणे त्या काळी आवश्यक होते. त्यासाठी ज्ञानदेव श्रोत्यांना मोठेपण देतात. परंतु, आपण जे सांगणार आहोत ते, श्रवण करण्यासाठी श्रोत्यांची योग्यता काय असावी, हेदेखील ते सांगायला विसरत नाहीत-
 
‘अहो अर्जुनाचिये पांती। परिसणेया योग्य होती।
 
तिहीं कृपा करुनि संती। अवधान द्यावे।।’ असे सांगताना, श्रोत्यांनी दुश्चित्त असू नये, असाही इशारा देतात. श्रोता जर दुश्चित्त असेल, तर त्याच्या आणि वक्त्यामधला संवाद निरर्थक होईल आणि रसहीन होईल, याची ते आठवण करून देतात. ‘म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे। तरी हृदयाकाश सारस्वते वोळे। आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे। मांडला रसु।।’ ही सर्व बंडखोरी माउलीने तुमच्या-माझ्यासाठी केलेली आहे. ज्ञानदेव संत होते, साक्षात्कारी पुरुष होते, ज्ञानी होते, भक्त होते, योगी होते, परंतु याही पलीकडे ते सर्वांची ‘आई’ होते. ही आई बाळाचे नुसते लाड करणारी नाही, तर त्याला क्रांतिकारी संदेश देणारी ‘माउली’ आहे. आई असेपर्यंत प्रत्येकच जण हा ‘बाळ’ असतो. आई गेली की अचानक मोठेपण येते, यावे लागते. मराठी जगताची ही माउली समाधिस्थ होऊन सात दशकांच्या वर काळ लोटून गेला आहे. आमच्यासारख्या तिच्या बाळांना हे मोठेपण आपल्याला आल्याचे समजले तर आहे, परंतु उमजले आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यानिमित्ताने ते मोठेपण उमजेल, अशी आशा करायला काय हरकत आहे...?
9822222115