मिठाची बाहुली असलेले वामपंथी!

    दिनांक :09-Aug-2020
|
- डॉ. मनमोहन वैद्य
सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ
वामपंथी विचार मानणारे बुद्धिजीवी आणि पत्रकारांचे वैशिष्ट्य असते की, ते सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. आधीपासून निश्चित विषयसूचीच्या (अजेंडा) परिघात राहून, ते असत्याला सत्य म्हणून प्रचारित करणे िंकवा काही प्रश्न उपस्थित करून भ्रम उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत राहतात. तो तत्काळ प्रभावी दिसत असला, तरी अंतत: सत्याचाच विजय होत असतो. याचे एक ताजे उदाहरण, नुकतेच एका इंग्रजी नियतकालिकेत संघाच्या सेवाकार्यावरून आलेल्या वृत्तकथेत बघायला मिळाले.
 
 
Asmant photo_1  
 
कोरोना विषाणूच्या या अभूतपूर्व संकटकाळी, शासकीय आणि निम-शासकीय कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून समाजाचा फार मोठा वर्ग, आपले प्राण संकटात टाकून संपूर्ण देशात, पहिल्या दिवसापासून सतत सक्रिय राहिला आहे. पूर, भूकंपासारख्या इतर नैसर्गिक संकटाच्या वेळी मदत व बचाव कार्य करणे आणि या संक्रमणशील रोगाच्या काळात, स्वत: संक्रमित होण्याची शक्यता असतानाही सक्रिय होणे, फरक आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 4 लाख 80 हजार स्वयंसेवकांनी अरुणाचल प्रदेशापासून ते काश्मीर आणि कन्याकुमारीपर्यंत 85 हजार 701 स्थानांवर सेवा भारतीच्या माध्यमातून 1 कोटी 10 लाख 55 हजार परिवारांना आवश्यक अन्नधान्याच्या पिशव्या पोहोचविल्या आहेत. 7 कोटी 11 लाख 46 हजार भोजन-पुडे, गरजूंना वितरित केले आहेत. लाखोंच्या संख्येत मुखाच्छादनाचे वितरण, विविध राज्यांमध्ये राहणार्‍या दुसर्‍या राज्यातील 13 लाख लोकांची मदत, 40 हजार युनिट्‌स रक्तदान, प्रवासी मजुरांच्या मदतीसाठी 1 हजार 341 केंद्रांच्या माध्यमातून 23 लाख 65 हजार प्रवासी मजुरांना भोजन तसेच औषधी व इतर वैद्यकीय मदत, भटक्या जनजाती, किन्नर, देहविक्रयाचा व्यवसाय करणारे, धार्मिक स्थानांवर परिक्रमावासींवर अवलंबित वानरादी पशुपक्षी, गौवंश... या सर्वांची मदत केली आहे. अनेक ठिकाणी संक्रमित वस्तीत प्रत्यक्ष जाऊन स्वयंसेवकांनी मदत केली आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचे सरकार असो, सर्व राज्यांमध्ये जिथे कुठे प्रशासनाने जी मदत मागितली, त्याची पूर्तता केली आहे. जमाव नियंत्रण (क्राउड मॅनेजमेंट), स्थानांतर करणार्‍या मजुरांची नावनोंदणी अशी असंख्य कामे, प्रशासनाच्या आवाहनावरून ठिकठिकाणी केली आहेत. पुण्यात प्रशासनाच्या आवाहनावरून स्वयंसेवकांनी इतर स्वयंसेवी संस्थांच्या सोबत, कोरोना रेड झोनमधील दाट लोकवस्तीत जाऊन, 1 लाख लोकांची तपासणी केली आणि संक्रमणाची शंका असलेल्या व्यक्तींना पुढच्या तपासणीसाठी प्रशासनाकडे सोपविले.
 
 
इतके व्यापक-विस्तृत सेवाकार्य संघाच्या स्वयंसेवकांनी केले, त्याचे त्रोटक वर्णनदेखील या इंग्रजी नियतकालिकेने केले नाही. कारण, संघाच्या चांगल्या कामाची माहिती देणे त्यांच्या विषयसूचीतच नसते. उलट, संघाच्या बाबतीत जितक्या चुकीच्या गोष्टी आणि खोटे हे वामपंथी सतत सांगत असतात, त्या सर्वांचा उल्लेख सेवाकार्याची माहिती देण्याच्या आडून त्यांनी केला आहे. कुठेही संघाच्या अखिल भारतीय पदाधिकार्‍यांनी भेटून त्यांचे यासंदर्भात काय म्हणणे आहे, हे विचारण्याचा पत्रकारितेचा धर्मदेखील त्यांनी पाळला नाही. अशा खोट्या बातम्या लिहिताना त्यांच्या आत्म्याला जराही संकोच झाला नसेल का? तसेही हे वामपंथी धर्म िंकवा आत्मा यांना कुठे मानतात?
 
 
या पत्रकाराने, संघाने सरकारी निधीचा उपयोग सेवाकार्य करण्यासाठी केला, हे आणखी एक असत्य, कुठल्याही पुराव्याशिवाय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, हे सांगितले नाही की जर सरकार, नोंदणीकृत सेवा संस्थांच्या माध्यमातून सरकारी निधीचा विनियोग करत असेल तर त्यात चूक काय? संघाचे स्वयंसेवक समाजातून गोळा केलेल्या पैशाच्या आधारावरच इतक्या व्यापक प्रमाणात सेवाकार्य करीत असतात. हे सर्व सेवाकार्य नोंदणीकृत सेवा संस्थांच्या माध्यमातून चालतात, तसेच त्यांचे नियमित अंकेक्षणही (ऑडिट) केले जाते. केदारनाथमध्ये ज्या वेळी अचानक प्रचंड महापुराचे संकट आले होते, तेव्हाही समाजातून धन गोळा करून स्वयंसेवकांनी सेवाकार्य केले होते. त्या वेळी एम. डी. रामटेके नावाच्या एका व्यक्तीचे पत्र वाचण्यात आले. त्यात ते लिहितात- ‘‘मी आंबेडकरवादी आहे आणि संघाचा विरोधकही. डॉ. आंबेडकर भगवान बुद्धाचे आधुनिक अवतार आहेत, अशी माझी श्रद्धा आहे. परंतु, रा. स्व. संघाच्या सेवाकार्याने मी प्रभावित आहे. माझा अनुभव आहे की, तुम्ही जर संघाला सेवाकार्यासाठी 100 रुपये दिलेत, तर संघवाले त्यात स्वत:च्या खिशातून 10 रुपये टाकून 110 रुपये सेवाकार्यात लावतात. म्हणून तुम्ही निश्चिंतपणे संघाच्या सेवाकार्याला मदत करा.’’
 
 
सरकार जर सेवा संस्थांच्या माध्यमातून सेवाकार्यात मदत करीत असेल, तर स्वयंसेवकांद्वारा संचालित नोंदणीकृत न्यासाने सरकारी अनुदान घेण्यात काय चूक आहे? परंतु, तरीही या कोरोना महामारीच्या काळात जे सेवाकार्य स्वयंसेवकांनी केले त्यात सर्वाधिक धान्याच्या थैल्यांचे आणि भोजन-पुड्यांचे वितरण होते. केरळ, आसाम, नागालँड, त्रिपुरा आणि मुंबईत एकूण 95 टन धान्य (अधिकतर तांदूळ) सरकारकडून नियत किमतीत खरेदी करून लोकांना वितरित करण्यात आले. केवळ झारखंडमधील एका संस्थेने (सर्वांगीण ग्राम विकास समिती, खूंटी) 12 हजार भोजन-पुडे वितरणासाठी प्रती पुडा 5 रुपये असे 60 हजार रुपये सब्‌सिडी घेतली आहे. इतर कुठल्याही राज्यात संघाने सरकारकडून कुठलीही आर्थिक मदत घेतली नाही. परंतु, पत्रकारितेच्या आड संघाला बदनाम करण्याचे काही लोकांचे ‘व्रत’च आहे.
 
 
रिपोर्टमध्ये त्यांच्या प्रतिपादनाचे सार होते की, सेवाकार्याच्या आड संघ आपले हातपाय पसरविण्याची योजना करतो. कम्युनिझमचे मूळ सेमेटिक विचारांशी जुळले असल्यामुळे, सेवाकार्याच्या आड कन्व्हर्जन करणार्‍यांप्रमाणेच त्यांचेही विचार असतात, यात काही आश्चर्य नाही. भारतीय िंचतन, या देशाचा समाज ‘वैष्णव जन तो तेणे कहिए, जे पीड पराई जाने रे’ या धर्तीवर चालतो. हे आम्ही सर्व जाणतो, परंतु यासोबतच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, वामपंथींना भारतीय िंचतनाशी काहीही देणेघेणे नाही. कारण भारतीय िंचतनाचा आधार आध्यात्मिक आहे आणि वामपंथ आध्यात्मिकतेला मानतच नाहीत.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी 19 एप्रिल 2020 च्या उद्बोधनात स्वयंसेवकांना हेच आवाहन केले होते की, ‘‘प्रचार िंकवा प्रसिद्धीचा विचारही मनात न येऊ देता केवळ आपलेपणाने यथाशक्ती सर्वांची मदत करायची आहे. एकान्तात साधना आणि अनेकान्तात सेवा, हा संघाचा संस्कार आहे.’’ संघाची ही उज्ज्वल परंपराही राहिली आहे.
 
 
12 नोव्हेंबर 1996 रोजी रात्री हरयाणातील चरखी-दादरीजवळ सौदी अरब आणि कझाकिस्तान एअरलाइन्सची दोन विमाने हवेतच एकमेकांवर धडकली आणि आग लागून खाली पडली. दोन्ही विमानांत एकूण 351 प्रवासी होते. त्यात 300 मुसलमान व 12 ख्रिश्चन होते. अपघातानंतर त्वरित जिल्हा संघचालक श्री. जीतराम, इतर स्वयंसेवक व डॉ. हेडगेवार चिकित्सालयातील डॉक्टर्स अपघातस्थळी पोहोचले. अंधारामुळे पेट्रोमॅक्स आणि जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. सर्व मृतदेह तत्काळ भिवानीच्या रुग्णालयात पोहोचविण्यात आले. बातमी पसरताच सकाळ होता होता मृतकांचे कुटुंबीय, पोलिस प्रशासन, पत्रकार इत्यादी तिथे येऊ लागले. मृतकांचे शव त्यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आले. ज्यांची नेमकी माहिती मिळाली नाही अशा 76 मुसलमान व 3 ख्रिश्चनांच्या शवांना त्यांच्या त्यांच्या धार्मिक प्रथेनुसार दफन करण्यात आले. यात स्थानिक मौलवी आणि मुंबईहून आलेल्या काही लोकांनी सहकार्य केले. तीन दिवसांनंतर 15 नोव्हेंबरला दादरीच्या मशिदीत आयोजित आभारप्रदर्शन सभेत, जिल्हा संघचालक जीतराम यांना सन्मानित करण्यात आले. अधिकांश वृत्तपत्रांचे शीर्षक होते- ‘मशिदीत खाकी निकर व भगव्या पट्‌टीचा सन्मान.’
 
 
अपघातस्थळी आलेले केंद्रीय विमान वाहतूक मंत्री इब्राहिम तसेच माजी केंद्रीय मंत्री कुरियन यांनी म्हटले- ‘‘तुमची जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे. मी तुम्हाला धन्यवाद देतो.’’ सीकरचे जाफर अली आणि हाकिम खान यांनी म्हटले- ‘‘या खुदाच्या देवदूतांना न जाणे काय काय म्हटले जाते, परंतु आज हा भ्रम मिटला आहे.’’ पोलिस अधीक्षक मोहम्मद शकील यांचे म्हणणे होते- ‘‘संकटाच्या काळात सर्वाधिक सहकार्य संघवाल्यांचे राहिले. त्यांच्याकडून मला हीच अपेक्षा होती.’’ अशाप्रकारचे अगणित प्रसंग सांगता येतील. हे थोडे विस्ताराने यासाठी लिहिले की, सर्व वामपंथी अपप्रचाराला नाकारत, स्वानुभवाच्या या प्रतिक्रिया खुद्द ख्रिश्चन-मुसलमान समाजाच्या आहेत. वामपंथी यात कुठला हेतू बघत असतील, हा प्रश्न आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते- ‘‘शिव भावनेने जीव-सेवा.’’ िंहदुत्व हेच शिकविते. स्वयंसेवक शाखेत हाच संस्कार ग्रहण करतात की, सेवा करतेवेळी कुणाची जात, उपासना, विचारधारा काय आहे हे विसरून, आपलेपणाने यथाशक्ती सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 
 
वामपंथी विचार मानणार्‍यांचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे की, ते स्वत:ला लिबरल म्हणजे उदार म्हणवून घेताना थकत नाहीत. वास्तवात ते असे अजिबात नसतात. उदारतेचा अर्थ आहे दुसर्‍यांचे विचार ऐकणे. ही पहिली पायरी आहे. नंतर त्या विचारांना समजून घेणे. त्यानंतर त्या विचारांशी सहमत अथवा असहमत होणे. सहमत असल्यास त्यांना मनोमन (प्रच्छन्न रीतीने) स्वीकारणे आणि त्याही पुढची पायरी आहे त्यांना जाहीर स्वीकारणे. त्याच्याही पुढच्या पायर्‍या आहेत- त्या विचारांचे समर्थन करणे आणि यथाशक्ती सहकार्य करणे. परंतु, उदार म्हणविणारा वामपंथी विचार, दुसर्‍यांचे ऐकतच नसतो. प्रसिद्ध समाजसेवक व मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. अभय बंग यांना, त्यांच्या सेवाकार्याचा सन्मान करण्याच्या हेतूने संघाच्या एका जाहीर कार्यक्रमात, प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले होते. ते तिथे आले होते आणि त्यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले. परंतु, या वामपंथी विचारांच्या लोकांना हे सहन झाले नाही. कारण ते डॉ. बंग यांना आपल्या गटातले मानत होते. डॉ. बंग यांनी या कार्यक्रमात जाण्याचा आपला निर्णय बदलावा म्हणून वामपंथींच्या साप्ताहिकात डॉ. बंग यांच्या विरोधात अनेक लेख लिहिले गेलेत. डॉ. बंग यांचे म्हणणे होते की, ‘‘संघाचे लोक माझी वैचारिक पृष्ठभूमी जाणत असूनही मला बोलावीत आहेत, यात संघाचा मोकळेपणा (उदारता) दिसतो. मी जे नेहमी बोलत आलो तेच तिथेही मांडणार आहे.’’ परंतु, हे वामपंथी मानायलाच तयार नव्हते. कार्यक्रमानंतर डॉ. बंग यांनी आपल्या भाषणाची मुद्रितप्रत, ज्या साप्ताहिकात त्यांच्या विरुद्ध अनेक लेख प्रकाशित झाले होते, त्या साप्ताहिकाला प्रकाशित करण्यासाठी पाठविली. परंतु, त्यांचे भाषण प्रकाशित झाले नाही. हा आहे वामपंथींच्या उदारतेचा खरा चेहरा!
 
 
अशाच प्रकारे, जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये संघाच्या अधिकार्‍यांना आपले विचार मांडण्यासाठी निमंत्रण मिळाले, तर त्याचा या (उदार?) वामपंथींनी जबरदस्त विरोध केला आणि शेवटी त्यांच्या काही मूर्धन्य नेत्यांनी संपूर्ण फेस्टिव्हलवरच बहिष्कार टाकला. सत्याचा सामना करण्यास वामपंथी इतके का घाबरतात, कळत नाही.
 
 
या वामपंथींचे तिसरे वैशिष्ट्य आहे की, ते संघाच्या विरुद्ध, कुठल्याही पुराव्याविना, वास्तवाला न जाणता, न थकता खोटा प्रचार करीत असतात. विद्वत्तेचा मुखवटा घालून आपल्याच लोकांनी प्रतिपादित केलेल्या असत्याचा आधार घेत, वारंवार अनेक प्रकारांनी संघाच्या विरुद्ध तोच खोटारडेपणा पसरविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या आरोपांमध्ये- महात्मा गांधींच्या हत्येवरून संघावर बंदी घातली होती, हे मनुवादी- ब्राह्मणी वर्चस्ववादी, महिला-विरोधी, सांप्रदायिक, मुस्लिमविरोधी, प्रगतिविरोधी आहेत, असल्या गोष्टी संघाच्या संदर्भात वारंवार म्हणत असतात. परंतु, स्वत: संघाच्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटणे, स्वत: अनुभव घेण्याचा ते कधीही प्रयत्न करीत नाहीत. कारण ते प्रामाणिक नाहीत.
 
 
तीन वर्षांपासून एक ख्रिश्चन कुटुंब माझ्या संपर्कात आहे. प्रारंभी ते कट्‌टर संघविरोधी होते. काही कारणवश संपर्क झाला तेव्हा त्यांनी दीड तास मला खूप प्रश्न विचारले. त्यांना शेवटचा प्रश्न होता की, ‘‘मी नियमित चर्चमध्ये जाणारा, ख्रिस्ती धर्माचे पालन करणारा आणि मूर्तिपूजा न मानणारा आहे. तरीही मी संघाचा सदस्य बनू शकतो का?’’ मी म्हटले, ‘‘हो.’’ यानंतर त्यांची अनेकदा भेट झाली. एकदा त्यांनी विचारले की, ‘‘सर! संघात सर्व जण तुमच्यासारखे आहेत की तुम्ही अपवाद आहात?’’ हळूहळू परिचय वाढत गेला. आता ते म्हणतात की, ‘‘तुम्ही जे सांगता ते ख्रिश्चन समाजाला माहीतच नाही.’’ माझ्या प्रवासात अनेक स्थानी त्यांनी ख्रिश्चन समाजाच्या प्रमुख लोकांशी माझी चर्चा आयोजित केली. ख्रिश्चन समाजाचे लोक जेव्हा त्यांना भेटतात तेव्हा ते जाणीवपूर्वक संघाचा विषय काढतात. संघाचे नाव ऐकताच हे लोक, संघ ख्रिश्चनविरोधी असल्याचे सांगतात. हे ऐकल्यावर हा परिवार त्यांना तीन प्रश्न विचारतो.
 
 
1. आरएसएस ख्रिश्चनविरोधी आहे, हे जे तुम्ही म्हणत आहात, तो तुमच्या स्वत:चा अनुभव आहे का?
2. तुम्ही संघाचे एखादे साहित्य वाचले आहे का?
3. तुम्ही कधी संघाच्या ज्येष्ठ व्यक्तीला भेटले आहात का?
या तीनही प्रश्नांचे उत्तर नकारात्मकच येते. नंतर ते त्यांना स्वत:चा संघाविषयीचा अनुभव सांगतात आणि संघाचे काही साहित्य वाचायला देतात. त्यांनी त्यांच्या घरीच संघाची काही पुस्तके ठेवली आहेत. असा मोकळेपणा या वामपंथींबाबत शक्य नाही. ते थेट संपर्काला टाळतात. कदाचित, इतक्या वर्षांपासून पाळलेला खोटारडेपणा उघड होईल, अशी त्यांना भीती वाटत असावी.
 
 
विरोधी धारणा असूनही प्रामाणिकपणा असेल, तर सत्य जाणल्यानंतर व्यक्ती आपले मतदेखील बदलते. तामिळनाडूत द्रविड आंदोलनाबाबत सर्वांना माहिती आहे. तामिळनाडूतील उत्तर अर्काट जिल्ह्याच्या मडपल्ली गावात संघशाखेच्या वार्षिक उत्सवात द्रविड कळघम पक्षाच्या स्थानिक नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले होते. त्यांनी होकार दिल्याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, ‘‘काही दिवसांपूर्वी मी शाखेवर हल्ला करून तिला बंद करण्यासाठी माझ्या लोकांना घेऊन आलो होतो. परंतु, इथे आल्यावर मी पाहिले की, गावातील ब्राह्मण परिवारातील मुले आणि हरिजन वस्तीतील मुले आपापसात उत्साहाने, जणूकाही एकाच कुटुंबातील आहेत असे, आनंदाने खेळत होते. मला खूप आश्चर्य वाटले आणि मी परास्त झालो (गॉट डिस्‌आर्मड्‌). आमच्या पेरियार यांचेही असेच जातिभेदरहित समाजनिर्माणाचे स्वप्न होते. आम्ही तर त्याला साकार करू शकलो नाही, परंतु तुम्ही ते करून दाखविले आहे. म्हणून तुमचे अभिनंदन करण्यासाठी मी तुम्हा सर्वांसाठी मिठाई आणली आहे.’’ परंतु, या वामपंथी लेखक अथवा पत्रकारांकडून अशा प्रामाणिकतेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असा अनुभव आहे. हे लोक आपल्या स्वत:च्या अनुभवाच्या आधारावर काही लिहीत नाहीत.
 
 
संघकार्याला समजून घ्यायचे असेल, तर पश्चिमेकडील एकांगी विचारांना सोडून, भारतीय एकात्म दृष्टीने विचार कराल तरच, भारताला आणि संघाला योग्य प्रकारे तुम्ही समजू शकाल. 2018च्या अ. भा. प्रतिनिधी सभेत संघाच्या एका ज्येष्ठ विचारक व कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘अभारतीय अथवा पश्चिमेकडील विचारांनी संघाला समजणे सोपे नाही. संघाला समजून घ्यायचे असेल, तर ईशावास्योपनिषदाला समजून घ्यावे लागेल. त्यात परमतत्त्वाचे वर्णन करताना, परस्परविरोधी गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या परमतत्त्वाला या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी एकाच वेळी लागू होतात. तो श्लोक आहे-
 
तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके।
तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यत:।।
(तो हलत असतो, तो हलतही नाही. तो दूर आहे, तो जवळही आहे. तो सर्वांच्या आत आहे, तो सर्वांच्या बाहेरही आहे.)
भौतिक शास्त्राच्या परमाण्विक कणांच्या (सब्‌ अॅटोमिक पार्टिकल्स) संदर्भात हेसनबर्गचा सिद्धान्तही हेच म्हणतो. ‘हे कणही आहेत, तरंगही आहेत. ते दोन्ही आहे. एका ठरावीक वेळी ते काय असतात हे सांगणे अशक्यच आहे.’ हेच भारतीय दर्शन म्हणते.
 
 
भारतीय आर्ष दृष्टीच्या एकात्म व सर्वांगीण िंचतनाच्या आधारावरच तुम्ही भारताला आणि संघालाही समजू शकता. परंतु, या आर्ष दृष्टीने विचार करताच तुमचे वामपंथी असणे समाप्त होऊन जाते! कदाचित या भीतीनेच हे वामपंथी, संघाला प्रत्यक्ष जाणून घेण्यास कचरत असावेत. नाही तर त्यांचा शेवट, समुद्राची खोली मोजण्यासाठी समुद्रात उडी मारलेल्या आणि अजूनपर्यंत बाहेर न आलेल्या मिठाच्या बाहुलीसारखा होईल!
.....