पुढे आणखी अपमानाची शक्यता...!

    दिनांक :12-Sep-2020
|
मुंबईचे वार्तापत्र
 
- नागेश दाचेवार
एक मुलगी जी ‘सपनों का आशियाना’ म्हणते आणि मानते, अशा अथक प्रयत्नांतून, संघर्षातून उभारलेल्या कार्यालयाला क्षणात उद्ध्वस्त करून शक्तिप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात महाविकास आघाडी सरकारने दाखविलेल्या क्षमता आणि सामर्थ्याचा नमुना अख्ख्या देशाने बघितला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख शरद पवार आणि कंगनासाठी अत्यंत अश्लाघ्य भाषेचा वापर करणारे शिवसेनेचे (नॉटी) नेते संजय राऊत यांनी, या प्रकरणाशी राज्य सरकारचा काही संबंध नसल्याचा दावा केला. असे असले तरी कंगना आणि पत्रकारांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईनंतर, त्या अभिनेत्री मुलीने राज्य सरकारला संपूर्ण देशात नागडं केलं असून, रोज ती राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना विविध विषयांवरून उघडं पाडत आहे. तिचा हा अंदाज आणि ‘अ‍ॅटिट्यूट’ एकच संदेश देताना दिसत आहे- ‘पुढे आणखी अपमान होणे शिल्लक आहे...!’
 

kangana mumbai_1 &nb 
 
या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत आणि विवादात राहणारे एक नाव म्हणजे अभिनेत्री कंगना राणावत! स्वभावाप्रमाणे सुशांतसिंह मृत्युवादात तिने उडी घेतली. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात आली, त्या वेळी कंगनाने त्यावर आपले मत प्रदर्शित केले. आता कंगनाने व्यक्त केलेल्या मतातून महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा आणि मुंबादेवीचा अवमान झाला असून, तिच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना आणि सत्ताधारी करू लागले. मुळात शिवसेना महाराष्ट्राची खरी कैवारी असती, तर शिवसेनेने 106 मराठीजनांच्या रक्ताचा सडा शिंपणार्‍या काँग्रेससोबत जाण्याची ‘बेईमानी’, ‘हरामखोरी’ कधी केलीच नसती. पण, सत्तेसाठी काँग्रेसच्या गळ्यात गळे घालत शिवसेनेने तोंड काळे केले. त्यामुळे कंगनाला पाठिंबा देणार्‍यांची नावे डांबराने लिहिण्याआधी शिवसेनेने, आपणही कुणापुढे का आणि कुणासोबत लोळतोय्, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
 
 
भाषाधारित राज्य पुनर्रचनेवेळी मुंबईसह महाराष्ट्र व्हावा, ही समस्त मराठीजनांची मागणी होती. मात्र, त्याला काँग्रेसने सातत्याने विरोध केला. काँग्रेसविरोधातच महाराष्ट्रवासीयांनी संघर्ष केला आणि मुजोर काँग्रेसी राज्यकर्त्यांच्याच गोळ्यांनी मराठी मातीतील 106 लढवय्ये हुतात्मा झाले. मुंबईसह महाराष्ट्र मिळूनही मराठीजनांना न्याय्य हक्कापासून डावलले जात असल्याचे पाहूनच पुढे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. आज मात्र वाघाची मांजर झालेली शिवसेना 106 मराठीजनांच्या रक्ताचा सडा शिंपणार्‍या काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्तेचे लोणी चाटत इतरांना महाराष्ट्रद्रोही ठरवत आहे. शिवसेनेच्या महाराष्ट्रप्रेमाची हीच का ती व्याख्या, हा प्रश्न आता उपस्थित होतो आणि त्याचे उत्तर निःसंशय ‘होय’ असेच द्यावे लागते.
 
 
मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यामुळे मुंबादेवीचा अपमान झाल्याची आठवण आता शिवसेनेला झाली आहे. त्यांना आता देवी-देवतांची उपरती आली आहे. प्रत्यक्षात काही दिवसांआधी संजय राऊतांनी ‘देवांनी मैदान सोडले,’ असे भले मोठे लिखाण केले होते. त्यांच्या या लिखाणातून मुंबादेवीचा, हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा आणि देशाच्या संस्कृतीचा मोठा सन्मान, गौरवच झाला होता, नाही का? एखाद्याने देशाच्या पंतप्रधानांवर पुस्तक लिहिले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केली, तर आक्षेप घेणारेच स्वतः जेव्हा ‘युगान्त’ नावाच्या पुस्तकातून स्व. बाळासाहेब ठाकरे यांची तुलना छत्रपतींशी करतात तेव्हा ते यांना चालते. विचारले तर जुनी मढी उकरून काढू नका, असा सल्ला देतात ते... यांनी काहीही केलं तरी चालतं सगळं. सुरुवातीला मराठी... मराठी... करणारी शिवसेना अखिल भारतीय स्तरावर जाण्यासाठी धडपडू लागली आणि तिने हिंदुत्वाची शाल पांघरली. मात्र, तोपर्यंत ज्यांच्या जिवावर आपला राजकारणाचा डोलारा उभा राहिला, त्या मराठीजनांना शिवसेनेनेच सावत्रपणाची वागणूक दिली आणि नंतर मूळ मुंबईत राहणार्‍या मराठीजनांना पार विरार-वसई, कल्याण-डोंबिवली, पनवेलची वाट धरावी लागली किंवा शिवसेनेमुळे त्यांची वाट लागली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ती शिवसेना आज कोणत्या मराठी माणसांचे आणि महाराष्ट्राचे नाव घेते? ज्यांना तुमच्या धोरणांमुळे, राजकारणामुळे मुंबई सोडून परागंदा व्हावे लागले त्यांचे? तसेच काहीसे आता शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याचे दिसते. उर्वरित महाराष्ट्रात यांना कुणी विचारत नाही. असे असताना हे स्वयंघोषित महाराष्ट्राचे रखवाले झाले आहेत.
 
 
शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई असा गैरसमज असणार्‍यांना, मुंबईव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात कोण विचारतंय् बघा म्हणावं जरा... मुंबईचा ठेका आपलाच असल्याचा दावा करणार्‍या शिवसेनेला मुंबईत 36 विधानसभा क्षेत्रांत केवळ 14 आणि भाजपाला 16 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्राचा विचार केलाच, तर केवळ 56 जागा शिवसेनेला आणि भाजपाला 105 जागा मिळाल्या आहेत. मुंबई महापालिकेतदेखील दोन-चार जागांचा तेवढा फरक आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाला शिवसेनेपेक्षा जास्त पसंती दिली आहे तरीही भाजपा, महाराष्ट्र आपलीच जहांगिरी असल्याच्या आविर्भावात वावरताना दिसत नाही.
 
 
शिवसेनेने, आपण पाळलेल्या झोंबी सैनिकांकडेही लक्ष द्यावे. झोंबी सैनिकांनी कंगना राणावतला थोबाड फोडण्याची, चपलांनी मारहाण करण्याची धमकी देत आपली औकात दाखवली नसती, तर तिला सुरक्षा देण्याची वेळच आली नसती. अशीच पात्रता कंगनाच्या कार्यालयावर हातोडा चालवताना दाखविली. मात्र, कंगनाचे घर पाडण्यात दाखविलेली तत्परता दाऊदचे घर पाडायला दाखविली नसल्याचा केलेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोपही खराच आहे. कारण ‘मातोश्री’जवळच्या बेहरामपाड्यापासून ते मुंबईत ठिकठिकाणी उभारलेल्या झोपड्यांना हात लावायची हिंमत शिवसेनाशासित महापालिकेने कधी दाखवली नाही. ते काय दाऊदच्या घराला हात लावतील. ‘सौ दाऊद एक राऊत!’ असे म्हणणार्‍यांची एका फोनमध्ये टरकली, यातच सर्व आले...
 
 
कंगनाचे कार्यालय अनधिकृत असेल तर नक्कीच कारवाई व्हावी. पण, त्याच वेळी ते उभारले जाताना त्यावर नियंत्रण ठेवणार्‍या महापालिकेतील अधिकार्‍यांवरदेखील कारवाई झाली पाहिजे. मात्र, सरकारने तसे केले नाही. त्यामुळे सगळा प्रकार फक्त सूडाने केल्याचे स्पष्ट होत असल्याने, सर्वसामान्यांकडून शिवसेनेची छी: थू: होताना दिसते. असाच उद्योग काही वर्षांपूर्वी शिवसेनेने, आरजे मलिष्काबाबतही केला होता आणि तेव्हाही जनतेने शिवसेनेला लाखोळ्याच वाहिल्या होत्या. यावरून तरी शिवसेना काही बोध घेईल तर शपथ आहे. कारण यालाच म्हणतात सत्तेचा माज...! सरकारविरुद्ध बातम्या दाखविल्या तर विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना वार्तांकन करण्यापासून रोखणे, पत्रकारांना धक्काबुक्की करणे, पत्रकारांवर गुन्हा दाखल करून अटक करणे, वृत्तवाहिनी बंद करण्यासाठी धमकावणे; राज्य सरकारविरुद्ध बोलले तर त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न, त्यांच्या घरावर हतोडा, बुलडोजर चालविणे; समाजमाध्यमांवर मत प्रदर्शित केले तर त्याचे मुंडण करणे, बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यासारख्या प्रकाराला अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी आणि प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी, असे म्हणतात. असाच मुस्कटदाबी करण्याचा प्रकार, देशातील सर्वात शक्तिशाली महिला इंदिरा गांधींनी केला होता. तेव्हा जनतेने त्यांना धडा शिकवून त्यांचा घमंड उतरविला होता. सत्ताधीशांच्या पापाचा घडा भरत जातो तेव्हा एक दिवस जनताच कडेलोट केल्याशिवाय राहात नाही.  ‘समजने वालो को इशारा काफी है!...’
- 9270333886