‘ती’चे दिवस... अश्विनातले!

    दिनांक :13-Sep-2020
|
-• श्याम पेठकर
आपण कितीही गंगेला टेम्सच्या प्रवाहात मिसळण्याचा प्रयत्न केला, तरीही नदीच्या किनार्‍यांवर वसलेल्या सुपीक मातीचा अन् भाषेचा अनन्यसाधारण असा संबंध असतो. म्हणूनच कालगणना सारखीच असली जगाची, तरीही पृथ्वीच्या प्रदक्षिणांमध्ये सूर्याचे तिला गोंजारणे प्रत्येक प्रदेशात वेगळे असते. सप्टेंबरात टेम्सच्या पाण्याच्या खळखळाटात भोंडल्याची गाणी ऐकू येत नाहीत... ऋतू त्यांची कूस पालटतात ते नदी आणि मातीच्या सलगीतूनच. सणवार आणि उत्सवांचा संबंध मातीच्या कुसवण्याशीच असतो अन् त्यातून भाषा जन्माला येत असते. भोंडल्याची गाणी आणि अश्विनातील जगदंबेच्या आरत्या इंग्रजीत अनुवादित करता येतील, पण त्यात ती जान असणार नाही. मातीचा गंध ती ग्रीष्मात तापल्यावरच येतो, बर्फवृष्टीतून माती गंधाळत नाही तसेच शब्दांनाही भावार्थाचे धुमारे फुटत नाहीत. ‘येरे येरे पावसा,’ अशी आर्त प्रार्थना करणार्‍या प्रदेशात ‘रेन रेन गो अवे...’, असा कोरडा आलाप घेणे म्हणजे मातीशी बेईमान होणेच आहे. सूर्याचे तापणे ज्यांच्या ऋतुचक्रातच नाही त्यांना ‘सनी मॉर्निंग’ ‘फाईन’च वाटणार आहे. त्यांना अश्विनातील कोवळी उन्हे कळणारच नाही. दूरस्थाचे शब्द तुमच्यापर्यंत यंत्राने पोहोचू शकतील, मात्र त्यातले भावगहिवर श्वास पोहोचण्यासाठी तुम्हाला मातीत पाय देऊनच उभे राहावे लागते...
 

tuljabhawani_1   
 
अश्विनाचे येणेच असे पावसाच्या जाण्यासोबत असते. म्हणून अश्विन अलवार हिरवा असतो आणि त्याला पाणीदार अस्तित्व असते... पाऊस जसा येतो तसे त्याला जावेच लागते. तसा निरोपाचा क्षण प्रत्येकाच्याच वाट्याला येतो; पण पावसासारखे अलवार निघून जाणे कुणालाच जमत नाही. नव्याने श्रीमंत झालेल्या रानाच्या आणि ओसंडून वाहणार्‍या नद्यांच्या खाणाखुणा तो ठेवून जातो. देणार्‍याने मागायचे नसते. तसे ते कुण्याच देणार्‍याला जमतही नाही; पण परतणार्‍या पावसाला रानाने कितीही हळवी साद घातली अन् नदीचे पाणी खळखळाट करीत आडवे झाले, तरी पाऊस मागे वळूनही बघत नाही. जाणार्‍या पावसाने मागे वळून बघितले, तर त्याची निर्मिती धुवून निघण्याचा शाप त्याला आहे.
 
 
आश्विनातली उन्हं भरजरी असतात. तितकीच ती कोवळीदेखील असावी, अशी अपेक्षा असते. उन्हाचं कोवळेपण जपण्यासाठी पाऊस ऐन समेवर येऊन थांबायला हवा आणि पहाट वेळी दवाच्या पावलांनी थंडी हळुवारपणे यायला हवी. मग उन्हं कोवळी राहतात. ती भरजरी वाटली, तरी दाहक नसतात. तसं या दिवसांत उन्हाने दाहक नसावंही. हे दिवस फुलण्याचे आणि फुलांचे आहेत. डोंगरापलीकडच्या क्षितिजाचे उबदार चुंबन घेत थंडी हळूच गावात शिरते. अशा दिवसांतली पहाट मोठी मोहक असते. अशी पहाट निनादली, तर तिची कविताच होते. थंडी हळूहळू आकार घेत असताना पाखरं पंखात ऊब धरून कंठातलं गाणं थिजू नये यासाठी धडपडत असतात. गळ्यातलं गाणं संपलं, तर पाखरांची जमात त्यांना वाळीत टाकते. या दिवसांतली पहाट फुलपाखरांच्या पंखावरून झाडांच्या पानांना जोजवीत येते. रात्र दवात भिजून रानभर पसरली असते. पानांना, फुलांना, हरिततृणांना अन् बरड जमिनीलाही गंध येतो. दवाचं मग अत्तर होतं.
 
 
अश्विनात धरणीमाय आपल्या लेकरांवर संपन्नतेचा हिरवा पदर धरते. कुठल्याही पाखराची चोच रिकामी राहू नये, ही तिची तळमळ असते. या दिवसात मग बुजगावणंही हळवं होतं. आपल्या मडक्याच्या डोक्यावर पाखरांना बिनदिक्कत घरटं बांधू देतं. चोचीत चोच घालून पक्ष्यांनी रान उष्टावल्याशिवाय ते निसवतच नाही. पाखरंही मग काही दाणे किड्यामुंग्यांसाठी सोडतात. गावानेही कुठलीच झोळी दीनवाणी होऊ नये, याची काळजी घ्यावी. तिला तुम्ही पाणी द्या, ती हिरवळ देते. तिला तुम्ही दाणे द्या, ती कणसं देते. भजनात दंग होऊन नाचणार्‍या गोरा कुंभाराच्या पावलाशी ती चिखल होते अन् त्याच्या लेकराच्या ओठासाठी तिच्या आचळात दूध टचटचून येते. लेकरासाठी छातीत दाटून आलेल्या तिच्या पान्ह्याची मग कोजागरी होते. त्या वेळी गावाने भुकेल्या आत्मारामाला आश्वासनाच्या आरशात भाकरीचा चंद्र दाखवू नये. अश्विनातले दिवस हे ‘ती’चे दिवस असतात. या दिवसांत ती कुठल्या ना कुठल्या रूपांत तुमच्या घरी-दारी निनादत राहते. ती माहेरवाशीण म्हणून भुलाबाईच्या पावलांनी येते माहेरपणाला. त्या आधी भादव्यात ती नवतेचं दान घेऊन नव्हाळीच्या पिकांचा कोवळा गोडवा घेऊन तुमच्या घरात येते तेव्हा लक्ष्मी म्हणून तुम्ही तिची पूजा करता.
 
 
पाऊस सरत असताना ती सगुण साकार होते. बैलाच्या पावलांनी घरात येते, तेव्हा दारची तुळस मंजिर्‍यातून लाजते. श्रमिक तिची पूजा करतो अन् ती श्रमवेड्यांची आराधना करते. तिचे शब्द मंत्र होतात अन् गाण्यांच्या आरत्या होतात. त्या आर्त तर असतातच, पण लयबद्धदेखील असतात. मग रानाचे मंदिर होते, घरांचा गाभारा होतो. परड्यांवरही मग लवलवत्या पात्यांची हिरवळ अगदी नेटकेपणानं उभी असते. रान, पिकानं डवरलं असताना ती परडीवरच्या इवल्याशा हिरवळीच्या प्रेमात पडते. नवथर नवयौवना होते.
 
 
हे तिचेच दिवस असतात म्हणून तिच्या व्यथा, वेदना सुंदर होतात. त्यांची गाणी होतात, लेणी होतात. तरीही तिच्या वेदनांची आसनी घराघरांत मांडली जाते. वेदनेच्या बाहुल्यांची पूजा करण्याची प्रथाच त्यामुळे पडली आहे. त्या बाहुल्यांचा प्राण मग घराघरांत प्रत्येकीच्या श्वासात भिनतो. ती मग एकटी राहात नाही. ती त्याची होते. त्यांची वेदनेची कहाणी सोनवर्खी असते. हळद-कुंकवाने दाटलेली असते. आटून केशरी झालेल्या दुधासारख्या त्या व्यथा घोटीव असतात. तिची पावलं माहेरच्या अश्विनातून सासरच्या वैशाखापर्यंत पडतात.
 
 
कोवळेपणाला पुरुषी करडेपणाची झिलई चढलेल्या उन्हावर थंडी हळुवारपणे आपला अंमल प्रस्थापित करते, ते आश्विनातले दिवस असतात. या दिवसांत एक करावं- तुळशीला पाणी घालावं, फुलांच्या माळा कराव्यात अन् भल्या पहाटे फिरायला निघाल्यावर गवतावर नाचणार्‍या फुलपाखरांना आपल्या हाताची ओंजळ द्यावी. असं केल्यानं एक होतं- कुठल्या पाखराला तुमचं अंगण परकं वाटत नाही. आपलं अंगण पाखरांच्या स्वाधीन करून आपणही आश्विन शुद्ध प्रतिपदेला सीमोल्लंघनाला निघावं. अंबामाताही याच वेळी सीमोल्लंघनाला निघत असते. आईचं घरात नसल्यावर लेकरांनी घराच्या मोहात पडण्याचं तसंही कारण नसतं. सभोवताली मोहक वातावरणाचं जाळं विणलं जात असताना निर्मोही होण्याचं हे दिवस सांगत असतात.
या दिवसांना राखीच्या घट्ट प्रेमाचा वेढा असतो. बहिणीच्या स्नेहाचे अनुबंध विणले जात असतात अन् आईच्या ममतेचं उबदार पांघरूणही या दिवसांवर असतं. गाव सोडून निघणं तसं जिवावर येतं नेहमीच; पण या दिवसांत डोळ्यांत विजयाची ऊर्मी दाटून आली असल्यानं पावलांत वारं संचारतं अन् हातांना शस्त्र चालविण्याचा सराव करावा लागत नाही. अंबेचं सीमोल्लंघनाला निघणं म्हणजे सौंदर्यानं आपलं सामर्थ्य स्थापित करणं.
 
 
आदिमाया आदिशक्तीनं आपलं अमर्यादत्व दाखविण्याकरिता हे निघणं असतं. धर्माच्या मर्यादा पाळण्यासाठी आदिसीता लक्ष्मणरेषा ओलांडते. सीतेनं लक्ष्मणरेषा ओलांडली, तरी ती लक्ष्मणरेषा मग युगे युगे ऊर्मिलेच्या दारी आडवी पडून असते. असे असले तरीही त्या दोघीही स्त्रीत्वाची बलस्थाने असतात. आदिमायेनं लक्ष्मणरेषा ओलांडली की, एका रावणाचा अंत नक्की असतो. आदिशक्तीचं हे असं सीमोल्लंघनाला निघणं सर्व स्त्री-जातीला बळ देऊन जातं. निदान बळ देऊन जावं, अशी तिची अपेक्षा असते. तिच्या हातात शस्त्रासोबत शास्त्रेही असतात. मूर्तिमंत सौंदर्याच्या हातात नेहमी ती असावीतच. ही आदिमाया मोह पडावा इतकी देखणी, सौंदर्यवती आहे; पण तिचं वाहन म्हणजे सिंह. ही शस्त्र आणि शास्त्रसंपन्न मोहमाया सीमांच्या उल्लंघनासाठी निघते, तेव्हा रौद्र व क्रुद्ध सिंहावर ती आरूढ असते. त्यामुळं तिच्या सौंदर्याकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहूच शकत नाही. पाहणारे भक्तीनेच किंवा भीतीनेच तिच्याकडे बघतात. अंबा मग मोहाच्या सीमा ओलांडून विरक्तीच्या वनात प्रवेश करते. स्त्रीनं कसं असावं, हेच ती सांगत असते. अष्टभुजेच्या एका हातात कमळ, तर दुसर्‍या हातात सर्पसुद्धा असतो. ती अंहकारी पिशाचांच्या वधाला निघाली असते, म्हणून तिला मग मोहासोबतच मायेच्या सीमासुद्धा ओलांडाव्या लागतात. अर्थातच मग आश्विनातल्या दिवसांवर तिच्या दिसण्याची आणि असण्याची सावली पडणं अपरिहार्य असतं.
 
 
बदलत्या क्षणांसोबत आणि जिवाच्या भावविश्वासोबत रूप बदलणं म्हणूनच तिला जमतं. ती परत येते तेव्हा लक्ष्मीरूपात सुगीचे सुख घेऊन येते. महामायेेचं हे श्रीमंत रूप अर्थ-कामातून मोक्षाला जाण्याचा मार्ग दाखविण्यासाठी असतं; पण साधकाच्या जातकुळीवर ते अवलंबून असतं. साधना सत् आणि असत्वाची असते. साधकाची कामनाही अर्थ-कामाची असू शकते आणि मोक्षाचीही. सीमा ओलांडून तिच्या जाण्याचा नि परत येण्याचा अन्वयार्थ कळला, तर मग साधकाचा सत्पुरुष होतो. कारण सीमोल्लंघनाच्या तिच्या एका टोकावर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असतात अन् दुसर्‍या टोकाला अमर्याद शक्तीनं मदांध झालेला रावण असतो. हे एवढं कळलं की, अंबेच्या या विविध आणि त्रिविध स्वरूपांना विवेकाच्या पूजेनं बांधून ठेवता येतं. अशी पूजा करता आली की, माणूस संयमी होतो. माणूस संयमी झाला की, कुठल्याही ऋतूंचे हल्ले परतवून लावणं फार सोपं होतं. तिचं सीमेपलीकडे जाणं आणि परतणं संदर्भासह समजावून घेतलं पाहिजे. जाते का नि परतते कशासाठी... सुकाळात आणि दुष्काळात पुरुषार्थाला सारखीच संधी असते. युद्धात आणि शांतिपर्वातही पराक्रमाला फार जागा असते. अंधारात आणि उजेडातही ज्ञानाला सारखीच जाणीव असते. महामायेच्या रूपात सीमोल्लंघन करताना आणि लक्ष्मीच्या रूपात सीमोल्लंघनाहून परत येताना त्या आदिशक्तीला हे सारेच आपल्या आदिपुत्रांना समजावून सांगायचं असतं.
 
 
हे समजून घेण्यासाठी उपासनेची गरज असते. त्यासाठी साधकाने ती दृढतेने चालविली पाहिजे. विशेष म्हणजे त्यासाठी साधकाने विरक्तीच्या वनात जाण्याची गरज नसते; पण गावातही विरक्तीचं वन निर्माण करता यायला हवं. त्यासाठी ऋतू आणि मासांचं भान असणं गरजेचं असतं. साधकाला साध्यापर्यंत पोहोचण्याची अनेक साधनं असतात. साधने साधली की, मग सारंच सहज होतं; पण शक्तिरूपिणीच्या सीमोल्लंघनाचे अर्थ समजून घेण्यासाठी पूजा हे अगदी सहज साधन आहे. आदिमायेला समजून घेण्यासाठी पूजा करायची असते. सारे संदर्भ जाणून घेण्यासाठी प्रार्थना करायची असते. पूजा आणि प्रार्थना म्हणजे विवेकाने केलेले चिंतन. पूजा पंचद्रव्यांनी करण्यापेक्षा पंचप्राणांनी करावी. कारण पंचद्रव्य हा अखेर पंचप्राणांचाच एक आविष्कार असतो. प्रार्थना मेंदूत अर्थगंभीर झालेल्या अक्षरांनी न करता हृदयात अंतर्भूत असलेल्या भावनेनं केली पाहिजे. अशी पूजा आणि प्रार्थना आपल्याला जमली की, त्या आदिमायेनं आपल्याला जन्माला घालून स्वत:ला वासनेच्या भोवर्‍यात आणि आपल्याला जीवनचक्राच्या गतीवर का सोडून दिलं असावं, याचं ज्ञान होतं. सीमोल्लंघनाच्या फेर्‍यात एका टोकाला जीवन आणि दुसर्‍या टोकाला मृत्यू का असतो, हे मग आपोआप कळतं. माहिती असणं आणि कळणं यात फरक असतो. तसाच फरक डोळे असणं अन् नजर असण्यात असतो. हा फरक कळला की, मग आपण बघत नाही, दर्शन घेतो. दिसायला फक्त सगुण साकार रूपच दिसू शकतं, पण दर्शन मात्र निर्गुण निराकाराचंही घेऊ शकतो... हे ज्ञान आपल्याला व्हावं म्हणून त्या वेदप्रतिपाद्येने किती विविध स्त्री-रूपांत जन्माला येऊन किती अनंत लोक जन्माला घालण्याच्या यातना स्वीकारल्या, याची जाणीवही होते...
 
 
ही जाणीव होण्याचा महिना म्हणजे अश्विन. खरंतर मोहाच्या सीमा ओलांडून विरक्तीच्या वनात गेेलेल्या त्या श्रीशक्तीला परत श्रीमंत लक्ष्मीचं रूप घेऊन परत येण्याचं प्रयोजनच काय? तर त्याचं उत्तर आहे-तिच्या अनंत पुत्रांचे कल्याण! अश्विन हा कल्याणाचासुद्धा महिना आहे. अश्विन हा कल्याणाचा, चिंतनाचा, पूजेचा, प्रार्थनेचा महिना आहे. अशा या पूजेच्या, चिंतनाच्या, ज्ञानाच्या महिन्यात शक्तीनं अशिवतेकडे, पाशिवतेकडे न जाता शिवाकडे गेले पाहिजे. विचारांनी विवेकाकडे गेेले पाहिजे. वासनांनी विकाराकडे न जाता शृंगाराने सौंदर्याकडे गेलं पाहिजे. श्रमाने कनिष्ठतेकडे न जाता वरिष्ठतेकडे गेलं पाहिजे. नेमकं कुठं जावं आणि कशासाठी जावं, हे सांगण्यासाठीच सीमोल्लंघन असतं. हे सारं चातुर्मासातल्या या एका अश्विन महिन्यात शिकता आलं, तर कुठल्याही माणसाला घराचं दार न ओलांडताही सीमोल्लंघन घडू शकतं. कारण अश्विन हा शेवटी औषधांचा आणि उपचाराचा महिना आहे...
 
 
चंद्रसुगीच्या दिवसांपर्यंत नेत सरस्वतीच्या विणेच्या झंकाराचा पूर्णचंद्र तुमच्या- माझ्या आयुष्यात ओला प्रकाश निर्माण करणारे हे दिवस आहेत. चंद्र दुधात मिसळून प्यायल्यावर ज्ञानाचा पान्हा पाझरू लागतो आपल्या अंर्तमनात ते दिवस अश्विनाचे असतात...