जे ज्ञानामृताची जान्हवी। जे आनंदचंद्रींची सतरावी।

    दिनांक :13-Sep-2020
|
•- प्रकाश एदलाबादकर
झाली असतील तीन वर्षे या गोष्टीला. सकाळी सकाळी अंगणात बसलो होतो जरा कोवळ्या उन्हात. उन्हाची तिरीप असह्य व्हायला लागली आणि घरात जायला वळलो. तेवढ्यात फाटक उघडल्याचा आवाज आला म्हणून वळून बघितले. तो नंदू समोर उभा. नंदूचा आवाज म्हणजे नारोशंकराची घंटा! खणखणीत आवाजात म्हणजे अगदी स्वयंपाकघरात कामात असलेल्या हिच्या कानापर्यंत पोचेल अशा आवाजात नंदूचा प्रश्न टपकला- ‘‘काय बाबू, काय वाण मिळालं अधिकाचं सासरकडून? तुझं काय बाबा, तू एकटाच जावई आणि तोही सर्वात मोठा. ‘पांचो उंगलीया घी मे, सर कढाईमे और पैर पिपेमे.’ चांगलं डबोलं आणलं असशील.’’ फाटकातून आत येता येता नानूचा प्रश्न! नानू म्हणाला त्यात काही खोटे नाही. नानूच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत मी त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
 

shrikrushna1_1   
 
 
त्या वर्षी बरेच दिवसांनी सासरी जाण्याचा योग आला होता. लग्नाला पंचेचाळीसच्या वर वर्षे उलटून गेली. सासू-सासरेही हयात नाहीत आणि आता कसले कौतुक? परंतु, मेव्हण्याच्या बायकोने सर्व साग्रसंगीत केले. मेव्हण्याची पत्नी ही लौकिक नात्याने आपली बहीण असते. आम्हा दोघांनाही औक्षवाण करून, अधिकाचे वाण देऊन तिने नमस्कार केला आणि एकाएकी स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. मुळात क्षण आनंदाचा तरीही का रडतेय ही? आम्ही कुणीही तिला कारण विचारले नाही. व्यक्ती जर मोकळेपणाने रडत असेल तर तिला रडू द्यावे. मनाचे आभाळ स्वच्छ- निरभ्र होते. अनेक आठवणींनी नक्कीच तिच्या मनात गर्दी केली असणार. अनेक आठवणींच्या गवाक्षांमधून आपण आपले गतायुष्य बघायला सुरुवात करतो. एकेका घटनेच्या अनुभवाची उकल करतो, त्याचा अर्थ लावतो. अर्थ लावता लावता त्यात बुडून जातो. कुटुंबात होणारे हे असे कार्यप्रसंग म्हणजे आठवणींच्या दीपमाळा उजळण्याचे क्षण असतात. त्यातून आलेल्या अनुभवांचे संचित पुढील पिढीला देण्याचे हेच प्रसंग असतात. त्यासाठी आपल्याच गतायुष्याकडे बारकाईने आणि डोळसपणाने बघण्याची सवय असायला हवी.
 
 
आयुष्याच्या उतरणीवर या अनुभवांची बेरीज-वजाबाकी करीत आणि त्यांचा ल. सा. वि./म. सा. वि. काढत आपण, आपली ओंजळ किती भरलेली आणि किती रिकामी आहे याचा हिशोब मांडत असतो. वय उतरणीकडे जात असते. हाताशी वेळ कमी असतो. यासाठीच तर देवाने हा अधिकाचा महिना आपल्या पदरात टाकला नसेल ना? ‘घे आता आपल्या साफल्याचा आणि वैफल्याचा शोध. वेळ दिलाय तुला,’ असे तर त्याचे सांगणे नसेल ना? कसा घायचा जीवनाच्या साफल्याचा शोध? अधिकाच्या वाणात मिळालेल्या अनारशासारखे आयुष्य हे सच्छिद्र असते. ही छिद्रे म्हणजेच अनुभवाचे गवाक्ष असतात. त्या जाळीतून बघायचे असते जीवनाकडे. तेही अनारशांबरोबर मिळालेल्या निरांजनाच्या प्रकाशात. परंतु, तेहत्तीस अनारसे कशाला? मी काही शास्त्रवेत्ता नाही, की रूढिग्रस्तही नाही. पण, मला कुठेतरी असे वाटते या तेहत्तीस अनारशांचा संबंध तेहत्तीस कोटींच्या देवांशी आहे. हा आपला माझा कयास. शास्त्रात किंवा पंचांगात असे असेलच, असे नाही. आपले एकूण देव संख्येने तेहत्तीस कोटी नाहीत. येथे ‘कोटी’ हा शब्द संख्यावाचक नाही, तो गुणवाचक आहे. आदित्य कोटीचे बारा. रुद्रकोटीचे अकरा आणि वसुकोटीतील आठ, शिवाय दोन अश्विनीकुमार असे आपले तेहत्तीस कोटींचे देव आहेत, तेहत्तीस कोटी नाहीत. पुरुषोत्तमाच्या या तेहत्तीस कोटींपैकी निदान एकातरी कोटीत आपण समाविष्ट व्हावे, या हेतूने तर पुरुषोत्तम मासात तेहत्तीस अनारसे मिळत नसतील? प्रत्येक रूढीची थट्टा करून ती कालबाह्य झाली आहे, असा निरर्थक विचार करण्यापेक्षा त्यातून होकारात्मक अर्थ आपण काढला, तर निदान विचार भरकटत नाहीत आणि योग्य दिशेने जातात. आणि आपल्या विचारांना योग्य वळण देण्याचे कार्य करणारे अनेक ग्रंथ आपल्या पूर्वसुरींनी आपल्या पदरात टाकलेले आहेत. या सर्व ग्रंथांमध्ये अर्थातच गीता हा अर्थातच सर्वश्रेष्ठ ग्रंथ! ते श्रेष्ठत्व प्रत्ययाला यायला त्या ग्रंथावर आणि त्यातील विचारांवर श्रद्धा हवी, निष्ठा हवी. आपल्या अत्यंत निखळ अशा तत्त्वप्रतिपादनावर आणि वैचारिक भूमिकेच्या बळावर भारतीयाच्या जीवनात गीतेने एक अढळ स्थान निर्माण केले...
 
 
येत्या शुक्रवारपासून अधिकचा महिना सुरू होतोय् म्हणून ही वर सांगितलेली, नंदूची आठवण आली. आता या अधिक महिन्याला कुणी ‘मलमास’, कुणी ‘पुरुषोत्तम मास’, तर कुणी चक्क ‘धोंड्याचा महिना’ म्हणतात. अजूनही काही नावे असतीलच. आपल्या पंचांगात हा अधिकाचा महिना कसा येतो, त्याचे ज्योतिर्गणितीय कारण काय, त्याचे भौगोलिक कारण काय, ही सर्व माहिती दिलेली असतेच. 33 या अंकाचे पंचांगीय महत्त्वही दिले असते. आपल्या पूर्वसुरींचे खरोखरच आपण उपकार मानायला हवे. त्यांच्या विचारशक्तीला आणि द्रष्टेपणाला साष्टांग दंडवतच घालायला हवा. निसर्गात घडणार्‍या प्रत्येक घटनेचा माणसाच्या जगण्याशी संबंध जोडून त्याचे आणि निसर्गाचे केवळ एकरूपत्वच त्यांनी दाखविलेले नाही, तर त्याला आध्यात्मिकतेची जोड देऊन मानवी जगण्याचे उन्नयन केले. अधिकाचा महिना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. संवत्सरात आलेला हा तेरावा महिना परमेश्वराच्या अनुसंधानासाठी सर्वोत्तम काळ आहे. हा ‘पुरुषोत्तम’ मास आहे. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र ही केवळ आमची दैवते नाहीत, तर आमच्या संस्कृतीची अविनाशी प्रतीके आहेत. प्रभू रामचंद्र ‘मर्यादा पुरुषोत्तम’ आहेत, तर भगवान श्रीकृष्ण ‘पूर्णपुरुष’ आहेत. या अधिक मासाचे अधिष्ठान योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत. यदुकुळातील एक श्रेष्ठ नेता, कुशल योद्धा, चतुर मुत्सद्दी, पांडवांचा म्हणजेच सत्याचा आधार, चिंतनशील तत्त्वज्ञ... अशा विविध नात्यांनी श्रीकृष्ण महाभारतात दिसतो. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता हे तर त्याचेच स्वतःचे शब्दरूप आहे. आज कित्येक शतके उलटून गेली. गीतेतील विचारवैभव एकाच जागी थांबून राहिलेले नाही. जसजसा काळ पुढे गेला तसतसे हे गीतातत्त्व अधिकाधिक उज्ज्वल आणि विशाल होत गेले. त्याने हिंदुधर्माचीही कक्षा ओलांडली आणि जगाच्या पाठीवरील सर्व विचारवंत, तत्त्वज्ञ, समाजमनीषी यांच्या चिंतनाचा, कुतूहलाचा आणि अभ्यासाचा तो विषय झाला. बुद्धी, तर्क आणि विशुद्ध वैचारिकता याचे व्यापक असे अधिष्ठान या गीताविचारांना लाभलेले आहे.
 
गीतेत वर्णन केलेल्या तत्त्वज्ञानाकडे किती अंगांनी बघता येते, हे गेल्या अनेक वर्षांत प्रसिद्ध झालेल्या गीतेवरील ग्रंथांनी सिद्ध झालेले आहे. आपणाला आवडेल तर ज्ञानाचा मार्ग अनुसरावा, जमल्यास भक्तीचा मार्ग धरावा किंवा कर्ममार्गाचा आश्रय घ्यावा. आपली आध्यात्मिक आणि प्रापंचिक प्रगतीसुद्धा साधण्यासाठी आपल्याला हवे असलेले विचारधन गीतेतच आजही सापडते. म्हणून ती आणि तिच्यावरील ग्रंथ नित्यनूतन आहेत. आपल्या जीवनाला एक दिशा देण्याचे अदम्य असे सामर्थ्य या ग्रंथात आहे आणि या सामर्थ्याची खरी ओळख होते म्हणा वा प्रचीती येते ती, गीतेच्या पंधराव्या अध्यायात- पुरुषोत्तमयोगाच्या अध्यायात! महाभारतातील रणधुमाळीत भगवान श्रीकृष्ण एक मानव म्हणूनच वावरला. परंतु, आपल्या कर्तृत्वाने तो परमेश्वरपदापर्यंत पोहोचला आणि पुरुषोत्तम ठरला. यासाठी भगवंताने सांगितलेल्या गीतेमधील ‘पुरुषोत्तम’योगाचे सहजच स्मरण होते. पुरुषोत्तम मासात पुरुषोत्तमयोगाचे स्मरण होणारच.
 
ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थम प्राहुरव्यम्।
छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्॥
 
या भगवंताच्या वचनाने प्रारंभ होणारा भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय म्हणजेच पुरुषोत्तमयोग. अनेक विद्वानांचे आणि अभ्यासकांचे मत आहे की, हा पुरुषोत्तमयोग हाच खरा गीतेचा शेवट होय. कारण अर्जुनाला किंवा अर्जुनाच्या मिषाने आपल्या सर्वांना, भगवंताला जे सांगायचे होते ते आतापर्यंत सांगून झालेले होते. याची एक खूण या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सापडते.
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मायानघ।
एतदबुद्द्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत॥
‘इति गुह्यतमं’ या शब्दांनी हा अंतिम श्लोक सुरू होतो. एकदा ज्ञानमार्ग सांगून झाल्यावर गीता संपली, असे आचार्य विनोबांनीही म्हटलेले आहे. म्हणून हा पंधरावा अध्याय केवळ पठनापुरता मर्यादित न ठेवता त्याचे सारतत्त्व समजून घ्यायला हवे. हा पुरुषोत्तमयोग नामक अध्याय किती महत्त्वाचा आहे, हे प्रत्यक्ष माउलीनेच सांगितले आहे. केवळ याच अध्यायात नव्हे, तर प्रथमपासूनच सांगितलेले गूढ तत्त्वज्ञान म्हणजे उपनिषदरूपी कमलांमधील ज्ञानरूपी पराग. भगवान वेदव्यासांच्या परास्पर्शी प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कार म्हणजेच पुरुषोत्तमयोग. पुरुषोत्तमयोगाच्या शेवटच्या श्लोकावर भाष्य करताना माउली म्हणते-
एवं कथिलयादारभ्य। जें हें सर्व शास्त्रैकलभ्य।
उपनिषदा सौरभ्य। कमळदळा जेवीं॥
हें शब्दब्रह्माचें मथितें। व्यासप्रज्ञेचेनि हातें
मथूनि काढिलें आयितें। सार आम्ही॥
जे ज्ञानामृताची जान्हवी। जे आनंदचंद्रींची सतरावी।
विचारक्षीरार्णवींची नवी। लक्ष्मी जे हे॥
म्हणोनि आपुलेंनी पदे वर्णे। अर्थाचेनि जीवेप्राणें।
मीवांचोनि हों नेणें।आन कांही॥
क्षारक्षरत्वे समोर जालें। तयांचें पुरुषत्व वाळिलें।
मग मज सर्वस्व दिधलें। पुरुषोत्तमीं॥
संसाराचे मिथ्यत्व दाखवून जिवाला आत्मस्वरूपाची ओळख करून देणे, हा या पंधराव्या अध्यायातील एकूण प्रतिपादनाचा मूळ उद्देश आहे. म्हणूनच याची सुरुवात, वरच्या दिशेला मुळे आणि खाली फांद्या असलेल्या वृक्षाच्या वर्णनाने केलेली आहे. माउलीला नुसते कोरडे विचार नको आहेत. त्याची रसपूर्ण अनुभूती त्यांना हवी असते. अशी ही रसपूर्ण अनुभूती पुरुषोत्तमयोगात येते.
 
 
करूनि संसार वावो। स्वरूपी अहंते ठावो। होआवया अध्यायो। पंधरावा हा॥
 
असे प्रत्यक्ष माउलीचे विधान आहे. सध्या सगळे विश्व मृत्यूच्या छायेत वावरते आहे. एका अनामिक भीतीने सार्‍या मानवजातीला पछाडले आहे. जीवनाच्या क्षणभंगुरतेचा प्रत्यय येतोय्. सर्वत्र एका उदासीनतेची गडद छाया पसरलेली आहे. मनाला कुठे उभारी मिळेल, कुठे शांती मिळेल, कशाने मनाची अस्थिरता नष्ट होईल, याचा शोध आपण घेत आहोत, परंतु मनाची उदासीनता जात नाहीये. येथे म. म. देशपांडे यांच्या ओळी आठवतात-
अंतरिक्ष फिरलो, पण गेली न उदासी, गेली न उदासी
लागले न हाताला काही अविनाशी;
क्षितिज तुझ्या चरणांचे, दिसते रे दूर, दिसते रे दूर,
घेऊन मी चालू कसा, भरलेला ऊर, भरलेला ऊर,
जरि वाटे जड कळले, तळ कळला नाही :
जड म्हणते ‘माझा तू’, क्षितीज म्हणे ‘नाही’,
क्षितिज म्हणे ‘नाही’
अंतरिक्ष फिरलो पण...
अशा उदासवाण्या अवस्थेत आपले ‘सुखधाम’ शोधण्यासाठी ‘आहारनिद्राभयमैथुनंच’ या शब्दांनी वर्णन केलेल्या विषयसुखाचे विचार आयुष्यात केव्हातरी मागे टाकावेच लागतात. त्याशिवाय जीवनाच्या साफल्याचा शोध लागत नाही. जे जे शाश्वत आणि व्यापक आहे, ते ते अंगीकारायचे असेल, तर जे म्हणून नाशवंत आणि मर्यादित आहे त्याचा त्याग करायला हवा. आपल्या रोजच्या व्यवहारातही तात्पुरत्या आणि टाकाऊ गोष्टी दूर सारल्याशिवाय कायम टिकून राहणार्‍या बाबी प्राप्त होत नाहीत. ऐंद्रिय विषय मागे टाकल्याविना ‘अतींद्रिय’ हाती लागत नसते. प्रपंचात गुरफटलेल्या आपल्यासारख्या सामान्य साधकाला, स्वतःकडे बघण्याचा हाच काळ आहे- पुरुषोत्तम मासाचा आहे. आत्मशोध हा फार मोठा शब्द आहे. पण, आपली ओळख स्वतःशीच करून घ्यायला काही पार्थीव गोष्टींचा त्याग करावा लागतो. ‘आत्मार्थे पृथ्वी त्यजेत’ ही खूप वरची पायरी आहे. निदान पाऊल टाकायला काय हरकत आहे? शरीराची अनुभूती असते तशीच, अंतरीच्या चैतन्याची अनुभूती आली पाहिजे. सत्यासत्याच्या पलीकडे पोचता यायला हवे. पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आपण भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करतो, करायला हवे. भगवंताचे व्यक्तित्व अतुलनीय आहे. मानुषतत्त्वापासून देवत्वापर्यंतची त्याची वाटचाल म्हणजे जीवन जगण्याचा आदर्श आहे. गोकुळ-मथुरेपासून ते द्वाऱका-हस्तिनापुरापर्यंत तो सर्वांमध्ये वावरला, सर्व नाती कसोशीने सांभाळली, वाट्याला आलेले प्रत्येक कर्म त्याने कौशल्याने पार पाडले, परंतु कुठेच गुंतला नाही. अलिप्त होता अवतार संपवताना! हा खरा योग, पुरुषोत्तमयोग!! हा पुरुषोत्तमयोग आपल्यालाही सहजतेने जमायला हवा. या योगाच्या साधनेसाठी पुरुषोत्तम मासासारखा दुसरा मुहूर्त नाही...!
                                                                                                                                                                   - 9822222115