लडाखमधील अपयशामुळे जिनपिंग यांचे भवितव्य धोक्यात!

    दिनांक :13-Sep-2020
|
- अमेरिकी साप्ताहिकाचा दावा
- आणखी मोठ्या हल्ल्याची शक्यता
 
वॉशिंग्टन,
कम्युनिस्ट पार्टीच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू करून चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अगोदरच अनेकांचे शत्रुत्व ओढवून घेतले आहे. त्यातच भारताचा भूभाग असलेल्या लडाखमध्ये घुसखोरी करण्याच्या योजनेचे सूत्रधार खुद्द जिनपिंग आहेत. भारतीय लष्कराने पीपल्स लिबरेशन आर्मीला दणका दिल्याने लडाखमध्ये चीन अपयशी ठरला आहे. या अपयशामुळे जिनपिंग यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, असा दावा अमेरिकेतील न्यूजवीक या साप्ताहिकाने केला आहे.
 
 
jinping a_1  H
 
भारतीय सीमेवर आलेल्या अपयशाचे गंभीर परिणाम परिणाम जिनपिंग यांना भोगावे लागणार आहेत. लष्करात असलेले सरकारविरोधी अधिकारी बदलून निष्ठावंतांना नियुक्ती देण्यासाठी जिनपिंग यांना अवधी देण्यात आलेला आहे. जिनपिंग लष्कराच्या मध्यवर्ती आयोगाचे तसेच पक्षाचे अध्यक्ष आहेत. अशा स्थितीत आक‘मक चिनी लष्कर लडाखमध्ये अपयशी ठरले. त्यामुळे ते भारतावर मोठा हल्ला करण्याची शक्यता या लेखात वर्तवण्यात आली.
 
 
मे महिन्याच्या सुरुवातीला चिनी लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दक्षिणेकडून घुसखोरी केली. येथे सीमांकन झालेले नाही. त्यामुळे चिनी लष्कर या भागात कित्येक वर्षांपासून घुसखोरीचा प्रयत्न करीत आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये जिनपिंग यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारल्यापासून हा प्रकार वाढला आहे. गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसक संघर्षात चीनचे 43 सैनिक मारले गेले, असा अंदाज वर्तवला जात असला, तरी प्रत्यक्षात 60 पेक्षा जास्त जवान ठार झाले आहेत, असा दावा फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमॉक्रसीचे स्लीओ पास्कल यांनी केला. त्यानंतर जवळपास पाच दशकांनंतर भारताने चीनविरोधात आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आणि चीनने बळकावलेल्या मोक्याच्या जागा ताब्यात घेणे सुरू केले. भारतीय लष्कराच्या या वेगवान कृतीमुळे चिनी सैनिक आश्चर्यचकीत झाले आहेत. भारतीय लष्कराला रोखण्याचे केले जाणारे सर्वच प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
 
 
सातत्याने येणार्‍या अपयशामुळे पीपल्स लिबरेशन आर्मी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दक्षिणेकडे नवी आघाडी उघडण्याची शक्यता आहे. पण, प्रत्यक्ष युद्धात ही योजना कितपत यशस्वी ठरेल, याबाबत अमेरिकी साप्ताहिकाने शंका व्यक्त केली. चीनच्या भूदलाला प्रत्यक्ष युद्ध लढण्याचा अनुभव नाही. 1979 साली लहानशा व्हिएतनामसोबत झालेल्या युद्धात चीनला नामुष्कीचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर चीनने भूदलाचे आधुनिकीकरण केले तसेच सैनिकांना प्रशिक्षणही दिले. पण, प्रत्यक्ष युद्धात चिनी सैनिक प्रभावी ठरणार नाहीत, असे या लेखात म्हटले आहे.